पाऊस हा फुलांचा – छंद ओठांतले – भाग ९

बाहेर अविरत पाऊस पडतोय. अविरत. Continuously. शाळेत असताना व्याकरणात आपण Present Continuous Tense – अपूर्ण वर्तमानकाळ – शिकलो आहोत. हा अपूर्ण वर्तमानकाळ आपल्याला वाक्यातही आणता येतो आणि काव्यातही! परंतु हा अविरतपणा, अपूर्ण वर्तमानकाळ संगीत रचनेत कसा आणता येईल याचा मी अनेकदा विचार करत असे.

काही वर्षांपूर्वी प्रा. अशोक बागवेंनी मला एक ग़ज़ल चाल लावण्याकरता दिली होती.

Ashok Bagwe & I

अशोक बागवे सर आणि मी

पाऊस हा फुलांचा पाऊस पाकळ्यांचा

डोळे हळूच आता आतून झाकण्याचा

या शब्दांमध्ये Here & Nowचा एक फील होता. हे आत्ता सुरू आहे. कदाचित, ‘पाऊस हा  फुलांचा’ असं म्हटल्यामुळे असेल. हे शब्द माझ्या मनात अनेक दिवस दर्वळत होते पण चाल काही सुचत नव्हती.

मग एक दिवस मी पं. सत्यशील देशपांडेंकडे वाळकेश्वरला त्यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा ते राग झिंझोटीचा रियाझ करत बसले होते. मलाही त्यांनी गायला बसवलं. त्या झिंझोटी रागाच्या आलापीत ते ‘रे’ या स्वरावरून सुरू करत होते आणि शेवट ‘सा’वर करत होते. ‘सा’वर न्यास दिल्यामुळे त्या स्वरवाक्याला पूर्णत्व येत होतं.

रे प म ग सा रे म ग सा रे ऩी ध़ प़ ध़ सा

माझ्या मनात आलं की समजा ‘सा’ ऐवजी ‘रे’वर न्यास दिला तर हा पूर्णत्वाचा फील जाऊन अविरतपणाचा भाव त्यात येईल.

वाळकेश्वरहून दादरपर्यंतच्या प्रवासात माझी ही संपूर्ण चाल झाली. ८३ नंबरच्या बसमध्ये लागलेली ही माझी दुसरी चाल! कविवर्य अनिलांच्या ‘बाई या पावसानं’ या कवितेला अशीच सत्यशीलजींच्या घरून येताना चाल लागली होती. त्याची कथा एका वेगळ्या भागात!

हे गाणं तुम्ही गाऊन पाहिलंत तर तुमच्या ध्यानात येईल की हे कुठेही ‘सा’वर थांबत नसल्यामुळे आपण ते गातच राहतो! न्यासाची जागा ‘रे’वर असल्यामुळे कुठेही थांबलो तरी अपूर्णच वाटतं आणि आपण पुढचं स्वरवाक्य गायला भाग पडतो.

या ग़ज़लमध्ये एकूण मतला (धृवपद) सोडल्यास ६ शेर आहेत. मी प्रयत्न केला की सगळ्या कडव्यांच्या (शेरांच्या) चाली वेगवेगळ्या असतील. याचं एक कारण त्या रचनेतली नवता जपणं – हे होतं. ही ग़ज़ल वाचून माझ्या डोळ्यासमोर एका नवविवाहित दांपत्याच्या श्रृंगाराच्या उत्कट क्षणांचं चित्र उभं राहिलं होतं. फुलं, सनई, मेंदी, चांदणं अशा प्रतिमा वापरल्यामुळे असेल कदाचित.

हळदीतल्या सुरांची सनई अशी पुकारे

मेंदीवरी झुलावा पाऊस चांदण्याचा

या शेरात ‘सनई’ हा शब्द उच्चारताना त्यात सनईच्या ध्वनीचा भास झाला पाहिजे अशी सुरावट बांधली.

बागवे सरांचे शब्द अत्यंत प्रासादिक तर असतातच; पण त्यातली शब्दक्रीडा फार मनमोहक असते.

लगडून घोस आले, भरघोस मोगऱ्याचे

या रचनेतल्या प्रत्येक शब्दाचं चलचित्र व्हावं असा माझा प्रयत्न होता. ‘लगडून घोस आले’ म्हणताना वरून खाली अशी सुरावट आणली आणि ‘भरघोस मोगऱ्याचे’ या शब्दांची सुरावट खालून वर नेली कारण लगडलेले घोस म्हटलं की ते खाली झुकलेल्याची प्रतिमा डोळ्यांसमोर येते पण ‘मोगरा’ म्हटलं की आपल्या मनात गंध दरवळतो आणि गंध वाऱ्यावर पसरतो!

थेंबातल्या सुखाचे ओलावले ऋतु हे

ओलावला जरासा पाऊस पापण्यांचा

हे गाताना अतिशय अलवार, कातर अशी स्वररचना केली. मुख्य म्हणजे स्वर आणि शब्द यांच्यामधलं नातंही एखाद्या नवदांपत्यासारखंच लडिवाळ आणि हळुवार असावं अशी माझी भूमिका होती.

संगीतकार असण्याची सगळ्यात मोठी गंमत मला हीच वाटते. आपण एक अविरत क्षण एका गाण्यात बंदिस्त करून ठेऊ शकतो. कुणीही कधीही ते गाणं ऐकावं आणि तो क्षण तसाच ताजाच्या ताजा अनुभवावा!

© कौशल इनामदार

What do you think?