मन मोहरले – छंद ओठांतले – भाग १७

Man Moharale Thumbnail

‘पितृऋण’ चित्रपटाचं संगीत करणं हा माझ्यासाठी एक आनंददायी आणि समाधान देणारा अनुभव होता. नितीश भारद्वाज यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट. या चित्रपटातली प्रमुख भूमिका तनुजा यांची होती. तनुजा अनेक वर्षांनी मराठी चित्रपटही करत होत्या आणि एखाद्या चित्रपटात प्रमुख भूमिकाही साकार करत होत्या. त्याची एक छोटीशी गंमत आहे ती सांगतो आणि मग पुढे या गाण्याबद्दल बोलतो.

काशिनाथ धुरू मार्ग आणि तनुजा

माझं बालपण मुंबईच्या दादर या भागात गेलं. दादरच्या कीर्ती महाविद्यालयाच्या जवळ तेव्हा मी राहत असे. या कीर्ती महाविद्यालयाच्या बरोबर समोर एक ‘उमा’ नावाची इमारत होती. या इमारतीत थोर संगीतकार, स्नेहल भाटकर रहायचे. तनुजांचा पहिला चित्रपट, ज्यामध्ये त्यांनी लहान मुलीची भूमिका केली होती, तो होता ‘हमारी बेटी’. या चित्रपटाचं आणि तनुजांचा नायिका म्हणून पहिल्या चित्रपटाचं (हमारी याद आयेगी) संगीत होतं स्नेहल भाटकरांचं. ‘उमा’च्या शेजारी वळणावर एक अहमद मॅन्शन नावाची चाळ होती. या चाळीत पूर्वी लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडगोळीतले प्यारेलाल रहायचे. तनुजांचं चित्रपटातलं करिअर सर्वात उंचीवर असताना आलेला चित्रपट – ‘हाथी मेरे साथी’ – याचं संगीत होतं लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचं. या अहमद मॅन्शनच्या शेजारी ‘अमेयानंद’ नावाची एक इमारत आहे जिथे माझं बालपण गेलं आणि अनेक वर्षांनंतर तनुजा ज्या चित्रपटाद्वारे प्रमुख भूमिकेत पुन्हा येत होत्या तो होता ‘पितृऋण’ आणि त्याचं संगीत करण्याची जबाबदारी होती माझ्यावर. तनुजांच्या कारकीर्दीच्या महत्त्वाच्या टप्प्यांचं संगीत एका रस्त्याच्या एका वळणावर होतं!

फ्लॅशबॅक

या चित्रपटाची गाणी करताना मी आणि नितीश अनेक विषयांवर गप्पा मारायचो. त्यात आमचा एक समान आवडीचा विषय म्हणजे जुनी हिंदी-मराठी गाणी. या चित्रपटात एक फ्लॅशबॅकचा प्रसंग होता जिथे कथा साठ-सत्तरच्या दशकात जाते. नितीशने सुचवलं की या प्रसंगासाठी एक जुन्या पद्धतीचं रोमॅन्टिक गाणं करावं. मला ही कल्पना तर आवडलीच पण नुसतं जुन्या पद्धतीचं गाणं करण्याऐवजी माझ्या काही आवडत्या संगीतकारांची वैशिष्ट्यंही यात यावीत अशी कल्पना माझ्या मनाला चाटून गेली. मी ही कल्पना नितीशना आणि श्रीरंग गोडबोलेंना सांगितली. गोडबोलेंनी त्यांच्या शीघ्रकवी नावाला जागून अक्षरशः पाच ते दहा मिनिटांत गाणं लिहून दिलं. या गाण्यात ‘मन मोहरले’ अशी एक हुक-लाइन होती. ज्याची पुनरूक्ती होते आणि एका अर्थाने गाण्याचं सांगितिक तात्पर्य म्हणजे हुक-लाइन असं म्हणता येईल.

माझे आवडते संगीतकार

या गाण्यात प्रामुख्याने चार संगीतकारांच्या खासियत घेतल्या. शेवटच्या कडव्यात श्रीनिवास खळेंच्या रचनेत जशी एक सुंदर अशी गुंतागुंत असते ती घेतली. पहिल्या दोन कडव्यांतलं चौथं स्वरवाक्य नीट ऐकलंत तर त्यावर सुधीर फडकेंची मुद्रा आहे. कडव्याच्या पहिल्या दोन स्वरवाक्यांत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांची शैली वापरली आहे. पण संपूर्ण रचना ही आर.डी.बर्मन यांच्या एका खास शैलीवर बेतली आहे.

‘घर’ चित्रपटातलं ‘तेरे बिना जिया जाए ना’ किंवा ‘तिसरी मंज़िल’मधलं ‘तुमने मुझे देखा होकर मेहरबाँ’ या गाण्यांचं एक खास वैशिष्ट्य आहे. ते असं की या दोन्ही गाण्यांत कडव्याची सुरूवात बेमालूमपणे एका वरच्या पट्टीत होते. तुम्ही हे कडवं धृवपदाच्याच पट्टीत गायलात तर दरवेळी धृवपद आलं की तुम्ही खालच्या पट्टीला सरकाल! हेच तत्त्व मी या गाण्याच्या पहिल्या दोन कडव्यांत वापरलं आहे.

कुठेही चाल जशीच्या तशी न घेता एखाद्या संगीतकाराचा केवळ ‘ल.सा.वी.’ शोधून तो वापरणं हे मला फार एक्सायटिंग वाटलं.

या गाण्यात एका वर्षभराचा काळ कव्हर केला आहे. त्यामुळे या गाण्याच्या तिसऱ्या कडव्याची रचना पहिल्या दोन कडव्यांसारखी न करता वेगळी केली. हे गाणं शेवटी गायलं हृषिकेश रानडे आणि हम्सिका अय्यरने. हृषिकेश आणि हम्सिका या दोघांच्याही आवाजाची जातकुळी मला व्हिंटेज वाटते. हृषिकेशच्या गाण्यात बाबूजींच्या गाण्याचे सुवर्णकण आढळतात आणि हम्सिका अय्यरचं गाणं मला नेहमी गीता दत्तची आठवण करून देतं.

संगीतसंयोजक आणि वादक

पण या गाण्यात जी खरी कमाल केली आहे ती या गाण्याच्या संगीत संयोजकाने अर्थात सुस्मित लिमये याने. गाण्याच्या कडव्यापर्यंतचा जो पूल आहे जिथे गाणं आपली पट्टी बदलतं तो बदल सुस्मितने त्याच्या संगीत संयोजनाने इतका बेमालूमपणे अंतर्भूत केलाय की बोलता सोय नाही. सत्यजित प्रभूची ॲकॉर्डियन, विजू तांबेची बासरी, मनीष कुलकर्णीची गिटार, नेव्हिल फ्रॅन्को यांचा स्ट्रिंग सेक्शन या सगळ्यांच्या प्रतिभेचा स्पर्श या गाण्याला झाल्यामुळे हे माझं अत्यंत लाडकं गाणं आहे. या शिवाय आदित्य ओक या माझ्या हरहुन्नरी मित्राने या गाण्याचं ध्वनी-आरेखन केलं आहे.

एरवी मी केलेली गाणी मी फार ऐकत नाही. त्यात फार काही मिस्ट्री उरलेली नसते. पण हे गाणं मी खूप ऐकतो. चित्रपटात पुनर्जन्म घेऊन आलेल्या माणसाला जसा जुना काळ आठवतो तसं हे गाणं ऐकून संगीताचा तो सुवर्णकाळ मी जगतोच आहे असा भास मला होतो.

© कौशल इनामदार, २०२०

Chhand Othatale – Episode 17 – Man Moharale – Shrirang Godbole – Kaushal Inamdar

1 Comment

  1. Sundeep Gawande says:

    सुंदरच आहे गाणं, शब्द लाजवाब. किती वेगवेगळी वाद्ये वापरली आहेत. चाल मस्त आहे, मंद लयीत असल्यामुळे डोळे मिटून निवांत अनुभवावी अशी आहे. हृषिकेश आणि हंसिकाने मस्त न्याय दिला आहे चालीला.

    गाण्यात व्हायोलिन सुंदर वापरलेले आहेत. गाण्याच्या शेवटाला वाजलेली व्हायोलिन्स फार आवडली. ‘मोहरले’ शब्दाला जोडून जो आवर्ती पद्धतीने तबला वाजवला आहे त्याला काय म्हणतात माहित नाही पण त्याने फ्लॅशबॅकचा परिणाम व्यवस्थित साधला आहे.

    तनुजा यांच्या कारकीर्दीचे टप्प्यांचे इमारतींशी असलेले सांगीतिक नाते वाचून मजा आली.

Leave a Reply to Sundeep GawandeCancel reply