‘कळ्यांचे दिवस फुलांच्या राती’ – छंद ओठांतले – भाग ५

संगीतकार म्हणून माझ्या कारकि‍र्दीच्या अगदी सुरुवातीला मंगेश पाडगांवकरांनी मला एक सल्ला दिला होता – “कवितांना तू चाली देतो आहेस हे ठीकच आहे, पण तू गाणं explore कर.” तेव्हा ते नेमकं काय सांगत आहेत ते मला नीटसं समजलं नव्हतं पण घरी आल्यावर शांताबाई शेळके यांचा गीतसंग्रह – ‘कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती’ उघडला आणि शांताबाईंची गीतं पाहायला लागलो. गीत आणि कविता यात नेमका फरक काय आहे यावर अनेक चर्चा, वाद झडले आहेत आणि त्यात मला आत्ता पडायचं नाही. इतकंच सांगतो की शांता शेळकेंचा संग्रह वाचू लागलो आणि मंगेश पाडगांवकर काय सांगू पाहत होते ते माझ्या हळूहळू ध्यानात येऊ लागलं होतं.

कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती’ हा शांताबाईंच्या अशा गीतांचा संग्रह आहे की ज्यातली बरीचशी गाणी संगीतबद्ध किंवा ध्वनिमुद्रित झाली होती; पण या गाण्यांना फारशी प्रसिद्धी मिळाली नव्हती. काही गाणी चित्रपटांसाठी लिहिली होती पण ते चित्रपटच प्रदर्शित झाले नाहीत किंवा काही गाणी एखाद दुसऱ्या वेळेला रेडिओवर लागली; पण नंतर लोकांसमोर आली नाहीत.

याच संग्रहातल्या ‘कळ्यांचे दिवस फुलांच्या राती’ या गीतावर माझी नजर खिळली.

कळ्यांचे दिवस फुलांच्या राती

येती नि जाती!

असा त्याचा मुखडा होता. कविता म्हणून लिहिलेल्या पद्यामध्ये असा छंद सापडणं अंमळ कठीणच आणि मला उमजू लागलं की पाडगांवकरांना मला काय सांगायचं असेल. गीतामध्ये केवळ अर्थ आपल्याशी संवाद साधत नाही; तर ध्वनी, लय, नाद आणि त्या गीतकाव्यातले निहीत सूरही आपल्याशी संवाद साधत असतात. संगीतकार खरं तर शब्द ‘संगीतबद्ध’ करत नसतो गोठलेल्या शब्दांना सुरांचं आकाश मोकळं करून देत असतो.

पुरूष संगीतकार गाण्यातून ‘स्त्री’ची अभिव्यक्ती कशी साकार करतात याचं मला पहिल्यापासून कुतुहल राहिलेलं आहे. माझे गुरू कै. कमलाकर भागवत यांची रचना आहे – ‘घाल घाल पिंगा वाऱ्या’. शब्द आहेत कृ.ब. निकुंब यांचे. कुणाला सांगून खरं वाटणार नाही की हे गीत एका पुरूषाने लिहिलेलं

Shubhra Kalya Moothbhar

Shubhra Kalya Moothbhar

आहे आणि त्याची चालही एका पुरुषाने बांधलीए.

शांताबाईंचं हे गीत करताना माझ्या मनामध्ये हजार प्रश्न होते. एका स्त्रीचं अंतरंग खरेपणाने आपल्याला आपल्या रचनेत मांडता येईल? त्यासाठी काय करायची गरज आहे? खूप वेळ झाल्यानंतर हे सगळे प्रश्न मी बाजूला ठेवले आणि सरळ शब्द गुणगुणू लागलो. गातागाता तंद्री लागली आणि एका ओघात या गाण्याची चाल मनातून ओठांपर्यंत वाहत आली. एक साक्षात्कार झाला – ‘स्त्रीसारखं’ असं काही नसतं. आतून स्त्रीच होता आलं पाहिजे. त्याची प्रक्रिया काय हे सांगणं फारच कठीण आहे कारण ते स्वाभाविकपणे, अतिशय सहजगत्या होतं. एवढंच सांगू शकतो की चाल करत असताना मी कौशल इनामदार नव्हतो.

बाकी चाल तर शब्दातच होती.  तारुण्याच्या उंबरठ्यावरच्या एका स्वप्नवत क्षणाचं हे गीत आहे. पहिलं स्वरवाक्य झालं ते ‘येती नि जाती’. या ओळीनेच गाण्याचा ताल आणि लय ठरवली. ‘येती नि जाती’ मध्ये एका लंबकाची किंवा एका झोपाळ्याची लय आहे. तुम्ही पाहिलं असेल तर लंबक किंवा झोपाळ्याचे तीन बिंदू आहेत जिथे एक आभासी ‘ठहराव’ आहे. दोन दिशांच्या दोन टोकांना – आणि एक मध्यभागी. म्हणून तीन मात्रांचा वॉल्ट्झ – १-२-३ – १-२-३  असा जाणारा ताल या गाण्यासाठी निवडला. अर्थात ‘निवडला’ म्हणजे तो त्या गाण्यातच निहीत आहे. आणि मग शब्द नेतील तसा मी ते गीत गात गेलो. ‘क्षणात उंच नेतसे मला’ या ओळीतल्या ‘उंच’ शब्दावर वरचा ‘सा’ गाठला तर ‘येते ती घटिका सुंदर आहे’ ही ओळ दोन वेळा घेऊन ‘घटिका’ शब्द दोन्ही वेळेला वेगवेगळ्या सुरांवर घेतला ज्यामुळे ‘येणारा प्रत्येक क्षण सुंदर आणि वेगळा आहे’ असं प्रतीत होईल.

ह्या गाण्याची आणखी एक आठवण अशी की ‘शुभ्र कळ्या मूठभर’ या माझ्या पहिल्या ध्वनिमुद्रिकेतलं हे पहिलं गायलेलं गीत आहे. माझी मैत्रीण भाग्यश्री मुळे हिने ते गायलं. तिने गायलेलं गीत तुम्हाला माझ्या संकेतस्थळावर विकत घेता येईल.

https://kaushalsinamdar.in/shop/kalyanche-divas/

शांताबाईंचे शब्दच खरं तर या चालीसाठी प्रेरणा ठरले. माझा त्यावेळच्या वयाचा निरागसपणाही या चालीत आहे. तुम्हाला हे आवडेल अशी आशा आहे!

What do you think?