खिडकीएवढे आभाळ

(हा लेख ‘सकाळ’ मध्ये ‘गुड मॉर्निंग’ या सदरात दि. ३० जून रोजी छापून आला आहे.)

हे सगळे लेख मी माझ्या खोलीत संगणकावर लिहितो. समोर संगणकाचा स्क्रीन आणि उजव्या हाताला एक खिडकी असं एकंदर नेपथ्य या सगळ्या लेखनप्रक्रियेला लाभलेलं आहे. जरा कंटाळा आला किंवा सुचेनासं झालं की मी या खिडकीबाहेर एक नजर टाकतो. तिथे एक पारंब्या असलेलं झाड आहे. ते वडाचं नाही इतकंच मला त्या झाडाबद्दल ठाऊक आहे. त्या झाडापलिकडे एक इमारत आहे आणि या इमारतीच्या काही खिडक्यांतली दुनिया मला बसल्या जागीच अनुभवता येते.

खरं तर माझ्या खोलीतली ही खिडकी म्हणजे इंग्रजी चित्रपटातल्या जिप्सी बायकांकडे जसा एक क्रिस्टल बॉल असतो तशीच मला भासते.

आज मी लिहायला बसलो पण काहीच सुचेना म्हणून मी खिडकी बाहेर बघत बसलो आणि त्या खिडकीबाहेरच्या जगात रमलो. पुन्हा एकदा नजर संगणकाकडे वळवली पण पुन्हा काहीच सुचेना आणि मग पुन्हा तोच उद्योग! घड्याळाचे काटे फिरत राहिले पण आज कशावर लिहावं असा एक विषय सुचेना. आणि खिडकीच्या बाहेर एकदा नजर गेली की त्याबरोबर मन कुठे कुठे फिरून यायचं. मग वाटलं की कशाला एक ठराविक विषय घ्यावा? मनाच्या हातात बोट द्यावं आणि ते नेईल तिथे फिरून यावं… तेच या संगणाकाच्या स्क्रीनवर टिपून घ्यावं.

खिडकीबाहेरच्या झाडाला या दिवसात नवीन पालवी फुटते आणि ते पुन्हा एकदा हिरवं गार होतं. मग या दिवसात पक्ष्यांचे आवाजही एरवीपेक्षा अधिक जवळ ऐकू येतात. दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरांमध्ये या झाडाच्या पानांवरचा प्रकाश बदलत जातो आणि पानांच्या रंगांच्या नानाविध छटा पाहायला मिळतात. रात्री मात्र अंधाराबरोबर आकारांचं जग नाहिसं होतं आणि खिडकीबाहेर सावल्यांचं एक निराकार जग निर्माण होतं.

अनेकदा रात्री या खिडकीतून बाहेर बघतांना मला कुसुमाग्रजांची ‘झाड’ ही कविता आठवते.

एकदा

मध्यरात्रीच्या नीरवतेतून

मी ऐकला होता एक भयानक चीत्कार

पलिकडच्या परसात असलेल्या

एका वृक्षाच्या काळ्याशार पानघुमटातून

उफाळलेला….

देव जाणे काय घडले असेल त्या पानांच्या दुनियेमध्ये…

खरंच… देव जाणे काय घडत असतं त्या पानांच्या दुनियेमध्ये. सावल्या हलतांना सगळा परिसर रात्री जागा झालाय असं वाटू लागतं. पण पुन्हा सकाळ होते आणि खिडकीबाहेरचं जग सगुण-साकार होतं. समोरच्या इमारतीच्या खिडक्याही उघडतात. माणसांचे दिवसभराचे व्यवहार सुरू होतात आणि हीच खिडकी ऍल्फ्रेड हिचकॉकच्या ‘रियर विंडो’चे रूप धारण करते. समोरच्या घरातल्या सामान्य माणसांचे व्यवहारही नाट्यमय भासू लागतात!

या खिडकीबाहेर मी तासन्‍ तास बघत बसू शकतो. जितकं अवकाश या खिडकीतून दिसतं, त्यातूनच एक नवीन जग निर्माण होतं… अशी ही जादूची खिडकी. खिडकीला गज आहेत तरी ते मनाला विहार करण्यापासून रोखू शकत नाहीत. विखुरलेले विचार, आठवणी, गाणी, कविता यांची एक माळ गुंफली जाते आणि अशात शांताबाई शेळकेंचे शब्द आठवतात…

तसे सारेंच रोजचे ऋतू फुलती फुलती

रंग रंग ओलसर निळ्या आभाळावरती…

आज खिडकी एवढे मला पुरते आभाळ

शुभ्र कळ्या मूठभर आणि गुंफिलेली माळ!

कौशल श्री. इनामदार

ksinamdar@gmail.com

4 Comments

  1. santosh joglekar says:

    कौशल लेख खुप छान आहे. खिडकी एवढे आभाळ प्रत्येकाच्या मालकीचे असते…. फ़क्त खिडकी किती लहान मोठी ते प्रत्येकाने ठरवायचे…छान.. अंतर्मुख करणारा लेख. मजा आली…
    असेच सुंदर लिहीत जा.
    धन्यवाद,
    संतोष जोगळेकर

  2. सुंदर लेखन

    अमोल केळकर

  3. गणेश says:

    mast aahe

What do you think?