प्रार्थना

मी आस्तिक आहे की नास्तिक, या निष्कर्षापर्यंतचा रस्ता सोपा नाही पण रंजक आहे. मी त्यावर चालतो, कधी भलत्याच पायवाटेने जातो, कधी विसावून एका जागी बसतो, कधी उलटा वळून चालू लागतो, कधी एका निष्कर्षापर्यंत पोहोचलोय म्हणून सुस्कारा टाकतो तर पुढे वळणावळणाचा घाटच सुरू झालाय असं आढळतं, तर अनेक वेळा या निष्कर्षापर्यंत पोहोचायचा हा रस्ताच नाही असं वाटतं! कधी असंही वाटतं की निष्कर्षापर्यंत पोहोचलंच पाहिजे असं काही नाही! हा रस्ताच गूढरम्य आहे आणि त्यावर चालण्याचीच मजा आहे. कधी उबग येतो… वाटतं हे चालणं फार कठीण आहे… जणू रस्त्याच्या त्या टोकाला उभा असणारा साक्षात्कार मला म्हणतोय –

इन्हीं पत्थरों पे चल के, अगर आ सको तो आओ ।
मेरे घर के रास्ते में कोई कहकशाँ नहीं है ॥

तात्पर्य असं की या प्रवासातच इतकी मौज आहे की आत्ता मला या निष्कर्षापर्यंत पोहोचायची अजिबात घाई नाही! पण देवावर विश्वास जडो-न जडो, या रस्त्यावरून चालता चालता ज्या एका तत्त्वावर माझा ठाम विश्वास बसला आहे, ते म्हणजे – प्रार्थना.

लहानपणी आई देवासमोर “शुभं करोती”  म्हणायला लावायची आणि अर्थ न कळतासुद्धा त्याच्या नादामध्ये गुंगून जायचो. पुढे पुढे प्रार्थना म्हणजे एक मागणं आहे असं वाटू लागलं. मग अजून मोठा झालो आणि वाटू लागलं की आपण मागत जावं पण त्या मागण्याचं काही उत्तर येऊ नये! एक मोठा लेखक म्हणालाय –

“Prayers should never be answered; for once they are answered they remain simply correspondences.”

प्रार्थनेचा आणि गाण्याचा आंतरिक संबंध आहे. प्रार्थना गाण्यात आली आणि मला जाणीव झाली की प्रार्थनेचं एक देवाच्या अस्तित्वापासून वेगळं, स्वत:चं, स्वतंत्र असं अस्तित्व आहे. “हमको मन की शक्ति देना” किंवा “इतनी शक्ति हमें देना दाता” या हिंदी चित्रपटांच्या प्रार्थनांपासून  “गगन सदन तेजोमय” या मराठी चित्रपटांमधल्या प्रार्थनांपर्यंत अनेक प्रार्थनांनी माझ्या मनाचा गाभारा उजळून टाकलाय. मराठीमधल्या कवींनाही प्रार्थना लिहिण्याची गरज टाळता आली नाही. “गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दे” असं सुरेश भटांनी म्हटलंय, तर “भंगू दे काठिण्य माझे” असं मर्ढेकरांना म्हटल्याशिवाय राहवलं नाही.

काही वर्षांपूर्वी मुंबई फेस्टिवलच्या निमित्ताने मंगेश पाडगांवकरांनी लिहिलेली प्रार्थना – “तुझा सूर्य उगवे आम्ही प्रकाशात न्हातो” याला चाल दिली आणि गेटवे ऑफ इंडियावर ६३ लहान मुलांनी ती सादर केली हा क्षण मी आयुष्यात विसरू शकणार नाही. वेळोवेळी प्रार्थनेने मनाला गर्तेतून वर खेचून काढलं आहे.

ए. आर. रेहमानने म्हटलेलं एक वाक्य माझ्या मनात घर करून राहिलं आहे. तो म्हणतो – “नियतीवर माझा विश्वास आहे, पण प्रार्थना नियती बदलू शकते यावरही ठाम विश्वास आहे!”

© कौशल श्री. इनामदार

What do you think?