कसे कण्हते शब्दांत माझ्या मनीचे काहूर

कसे कण्हते शब्दांत माझ्या मनीचे काहूर…

रुक्मिणीच्या अनामिक हुरहुरीला नाव मिळालं. ‘राधा’. आणि हुरहुरीचं रूपांतर मनाच्या कोलाहलात झालं. आपली सर्वात प्रिय गोष्ट आपल्या हातातून गेली… पण ती जाण्याअगोदरचा नेमका क्षण तुम्हाला आठवतो आहे? तो कोलाहलाचा क्षण. पराभवाच्या क्षणाच्या आधीचा एक क्षण… तो कोलाहलाचा क्षण. तेच काहूर.

तो क्षण जाता जात नाही असं वाटत असताना तो कधी हातातून सटकतो हे कळत नाही. कृष्णाला इतक्या वर्षांनी ही राधा का भेटायला आली असेल? या विचारानं रुक्मिणीचे विचार सैरावैरा धावत सुटलेले आहेत.

कधीकधी चाल सुचते ते केवळ एका शब्दामुळे. कधी कधी शब्दही लागत नाही. एक रंग दिसतो आणि चाल त्यातून उगवते.

कसे कण्हते शब्दांत माझ्या मनीचे काहूर
कृष्ण माझा कृष्ण तुझा कसा सोसू झंझावात
नको नको मला सई कुंकवाचा हा वाढवा
माझा मला प्राणसखा नको सांडु माझा चुडा
रितेरिते झाले सारे पैठणीस लागे धस
राधे,तुझे कृष्णपण डोले कालिया होऊन

खरं तर विजय तापसांनी या सहा ओळींमध्ये इतक्या प्रतिमा वापरल्या आहेत की प्रत्येक प्रतिमेपासून एक वेगळी चाल सुचू शकते. परंतु माझ्या मनात राहिलेली प्रतिमा म्हणजे कुंकवाची. कुंकवाचा थाळ उधळलाय आणि लाल रंग सर्वत्र पसरलाय हे दृश्य माझ्या डोळ्यासमोरून काही केल्या जाईना. ते पुन्हा वेचताही येत नाही…

समीरने याचं संगीत संयोजन केवळ अप्रतिम केलं आहे. Synthetic Bass आणि झांजांचं असं खालच्या आणि वरच्या frequencyच्या आवाजांचं रसायन मनाची कालवाकाल करतं. म्हटलं तर तशी वाद्य फार नाहीत या गाण्यात; पण त्यामुळेच ‘रिते रिते झाले सारे’ या ओळीला अर्थ प्राप्त होतो.

गाण्याची सुरुवात संजीवच्या आलापाने केली जो हवेत विरून जातो आणि मग ominous (अनिष्ट सूचक) म्हणावा असा खालच्या सप्तकातला चेलोचा एक तुकडा वाजतो. आता खालच्या सप्तकात का? तर भीती आपल्याला अपरिचिताची वाटते. वरच्या सप्तकातले सूर ठसठशीत असतात. खालच्या पट्टीत संदिग्धता निर्माण करता येते. संगीताचा हा पॅटर्न तुम्हाला भयपटांच्या पार्श्वसंगीतात नेहमी आढळेल. जोवर धोका आहे असा संशय आहे किंवा धोक्याचा नुसता इशारा आहे, तोवर खालच्या पट्टीतलं संगीत वाजतं. धोका स्पष्ट झाला अथवा त्याचं कारण समोर आलं – की मग मात्र उंच पट्टीतलं संगीत वाजू लागतं!

संध्याकाळ आणि रात्रीच्या उंबऱ्यावरचाच हा क्षण आहे, त्यामुळे चालीत मी संध्याकाळचंच वातावरण सुरू ठेवलं. या गाण्यात थोडी गौरी रागाची अस्फुट झलक आहे. परंतु भावसंगीतात रागाला चिकटून राहणं हे अनिवार्य नसतं. त्या रागाचं आपल्या मनात जे असोसिएशन आहे, त्याचा गोष्ट सांगण्याकरता उपयोग करणं – इतकंच रागसंगीताचं भावसंगीततलं प्रयोजन आहे. गाण्याच्या शेवटीही रुक्मिणीच्या मनातल्या भीतीचं निराकरण झालेलं नाही. म्हणूनच गाण्याचा शेवट षड्‍जावर (‘सा’-वर) न करता वरच्या कोमल रिषभावर (‘रे’-वर) केला आहे. त्यामुळे गाणं एका निलंबित अवस्थेत संपतं. गाणं संपलं तरी त्यातलं वातावरण तुमच्या मनात संपू नये, असा प्रयत्न आहे.

हम्सिका ही माझी अतिशय लाडकी गायिका आहे. हे गाणं तिच्या आवाजात ध्वनिमुद्रित झालं तेव्हा रात्रीचे १२:३०-१ वाजले असतील. पण तिची कधीही या बाबत तक्रार नसते. ती त्या गाण्याने झपाटून जाते. ती मराठी नीटसं बोलत नाही; तरीही भाषेचे सूक्ष्म विभ्रम (nuances) ती इतकी चपखल तिच्या गाण्यात पकडते की ती हा शब्द कसा गाईल याच्या कुतुहलापोटी मी तिला अनेक गाणी गायला दिली आहेत. या पदात तिचे काही शब्द तुम्ही पुन्हा ऐका – ‘कण्हते’, ‘नको नको’, ‘सांडू’ – हे शब्द पुन्हा ऐकून पाहा. शिवाय एकसंध जो अर्थ येणं अपेक्षित आहे, तोही तिच्या गाण्यातून उलगडतोच.

मला आजही वाटतं की या चालीत पूर्ण गाण्याचं पोटेन्शियल होतं. सहा ओळीत ते संपतं याची एक हुरहूर जिवाला लागूनच राहते. परंतु एकांकिकेच्या दृष्टीने पूर्ण गाणं होऊन चालणारच नव्हतं. कधी कधी मोह टाळावा लागतो आणि काही मिळवण्याकरिता त्याग करावा लागतो. रुक्मिणीलाही, राधेलाही आणि आपल्यालाही!

(क्रमशः)

© कौशल इनामदार

View Preview

What do you think?