मराठी अभिमानगीतामध्ये शेवटच्या चार ओळी का नाही घेतल्या ?

यंदाच्या २७ फेब्रुवारीला – मराठी भाषा दिनी मराठी अभिमानगीताच्या प्रकाशनाला ३ वर्ष पूर्ण झाली आणि पुन्हा एकदा यूट्यूबवर असलेल्या मराठी अभिमानगीताकडे लोकांचा ओघ वाढला. मराठी लोकांचा या गीताला भरभरून प्रतिसाद मिळाला. कौतुकाचा वर्षाव जसा या गीतावर झाला तसेच काही प्रश्नही उपस्थित केले गेले.
त्यातला वारंवार विचारला जाणारा प्रश्न म्हणजे मराठी अभिमानगीतामध्ये शेवटच्या चार ओळी का नाही घेतल्या? त्या ओळी खालीलप्रमाणे आहेत.
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
आता मराठी अभिमानगीतात या ओळी न घेण्याचं कारण समजावून घेण्याकररता या कवितेचा इतिहास तपासणं आवश्यक आहे. मूळ कविता संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या दरम्यान कधीतरी कविवर्य सुरेश भटांनी लिहिली होती. ‘रूपगंधा’ या त्यांच्या पहिल्या संग्रहात ही कविता प्रथम छापून आली होती. तेव्हां या चार ओळी लिहिल्याच गेल्या नव्हत्या.
त्यामुळे इथे पहिला ठळक मुद्दा लक्षात घेण्यासारखा हा आहे की मूळ कवितेमध्ये या ओळी नव्हत्या !
पुढे १९८०च्या दशकात सुरेश भटांच्या एका कायाक्रमात (ज्या कार्यक्रमाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उपस्थित होते) या चार ओळी भटांनी म्हटल्या. आज आपल्याला सुरेश भटांच्या आवाजात ज्या ओळी ऐकू येतात त्या याच कार्यक्रमातल्या आहेत असा माझा अंदाज आहे. म्हणजे मूळ कवितेनंतर साधारण २० वर्षांनी या ओळी सुरेश भटांनी लिहिल्या !
पण त्यानंतरच्या ‘रूपगंधे’च्या कुठल्याही, अगदी, शेवटच्या आवृत्तीतसुद्धा या ओळी आपल्याला आढळत नाहीत. याचं कारण काय असावं ?
खुद्द सुरेश भटांनीसुद्धा या ओळी छापील स्वरूपात जनतेसमोर का येऊ दिल्या नाहीत ?
मला असं वाटतं की ‘लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी’ ते ‘येथल्या चराचरात राहते मराठी’ (म्हणजे जी मूळ कविता आहे) ती अत्यंत चिरंतन आहे. पण ‘आपुल्या घरीच हाल सोसते मराठी’ ही परिस्थिती काही चिरंतन नाही. आणि ती तशी असावी असं आपल्याला खचितच वाटत नाही ! ‘आपुल्या घरीच हाल सोसते मराठी’ हे आज जरी सत्य असलं तरी ते सत्य चिरकाल टिकणारं नाही आणि ते आपण तसं राहू देता कामा नये. ही परिस्थिती आज न उद्या बदलेल, पण ‘येथल्या चराचरात राहते मराठी’ हे सत्य चिरंतन आहे अशी माझ्या मनाची धारणा आहे. मराठी अभभमानगीत हा मराठीचा ऍन्थम (स्फूर्तिगीत या अर्थी) आहे आणि कुठल्याही ऍन्थममध्ये क्षणिक सत्याला वाव नाही. उदाहराणाथा, ‘जन गण मन’ किंवा ‘वंदे मातरम’ मध्ये ‘भारत किती गरीब देश आहे आणि भ्रष्टाचार कसा विळखा घालून भारतवासीयांच्या मानगुटीवर बसलाय’ असं आपण म्हणू का ?
मराठी ‘अभिमान’गीत म्हणायचं आणि मग ‘आपुल्या घरीच हाल सोसते मराठी’ असंही म्हणायचं हे माझ्या मनाला पटलं नाही. म्हणून मी फक्त मूळ कवितेचंच ध्वनिमुद्रण केलं.
‘रूपगंधा’ची नवीन आवृत्ती काढून पाहिलीत तरी तुम्हाला या चार ओळी दिसणार नाहीत की इयत्ता सहावीच्या पुस्तकात या ओळी आपल्याला आढळणार नाहीत. खुद्द कविवर्य सुरेश भटांनाही या ओळींमध्ये दर्शवल्या गेल्या क्षणिक परिस्
थितीची कल्पना होती आणि म्हणूनच त्यांनी त्या ओळी म्हटल्या पण कधीही छापू दिल्या नाहीत !
आणि याच कारणासाठी मी या चार ओळींना चाल दिली. काही कार्यक्रमांतून मी या चार ओळी म्हणतो देखिल पण त्या ओळी ध्वनिमुद्रित केल्या नाहीत. मराठी भाषा चिरकाल राहणार आहे पण मराठीवर आलेली बिकट परिस्थिती ही आपल्या सर्वांच्या प्रयत्नांनी क्षणिक आणि तात्कालिकच राहिल – या माझ्या विश्वासातून हा निर्णय घेतला गेला !
© कौशल श्री. इनामदार

12 Comments

  1. Neel says:

    Vichar aavadala. sahamat aahe.

  2. Santosh says:

    Amazing!!! 🙂

  3. Aditya Sathe says:

    कौशलजी हे स्पष्टीकरण खूप आवश्यक होतं 🙂

    • हे आधीही दिले होतं. पण अनेक लोक पुन्हा पुन्हा मागतात म्हणून शेवटी डॉक्युमेन्ट केलं ! 🙂

  4. त्या चार ओळी जोडल्या असत्या तर गीत अभिमान गीत नसून गर्वगीत झाले असते

  5. आपुल्या जेवणात जेवण… मराठी..,
    आपुल्या देशभरात राहतो… मराठी..,
    आपुल्या हक्कास लडतो… मराठी…,
    आपुल्या अहंकारास जिंकतो मराठी..,

    शालि-वाहन मराठी.., लक्ष्मी-बाई मराठी..,
    राष्ट्र-पति मराठी, तर छत्र-पति मराठी..,

    देव-भुमि मराठी.., संत-भुमि मराठी…,
    भक्तिमान मराठी.., तर शक्तिमान मराठी..,

    लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी..,
    जाह-लो खरेचं धन्य एकतो मराठी…,
    धर्म-पंथ जात एक जाणतो मराठी..,
    एवढ्या जगात माय मानतो मराठी…,

    बोलतो मराठी.., एकतो मराठी…,
    जाणतो मराठी.., मानतो मराठी…,

    मराठी पाऊल पडते पुढे…

  6. kaushal da…. very thoughtful… U had already put forth this thought when u recorded the song I guess…. 🙂

  7. umesh joshi says:

    क्या बात है…!!! इतकाच म्हणेन……. Thoughts Clear असणे म्हणजे काय….. ते तुझे विचार पाहून कळत…….. हे गाणे स्वरबद्ध केलेस…..त्यासाठी खूप खूप धन्यवाद…..

What do you think?