सूर आणि संस्कृती

कुठूनसे
भटियारचे सूर कानावर आले आणि मला जाग आली. पडदे लावलेलेच होते, पण भटियारमुळे
सकाळचं वातावरण तयार झालं होतं. मग पडदे उघडले आणि सूर्याची कोवळी किरणं खोलीत
सांडली.
आपल्या
रागसंगीतामध्ये प्रहराप्रमाणे राग गायले जातात याचं मला अगदी पहिल्यापासून कुतूहल
आहे. भैरव, ललत, सकाळीच का? मारवा, पूर्वी संध्याकाळीच का? असे अनेक प्रश्न मला
सतत भेडसावत राहतात आणि तरीही हे सगळं किती नेमकं आणि योग्य आहे याबद्दल विस्मयही
वाटत राहतो.
ग्रेस यांची एक
संध्याकाळची कविता मी संगीतबद्ध केली होती. चाल लागल्यावर मी चमकलो – कारण त्या
संध्याकाळच्या कवितेला चाल साधारण अहिर-भैरवच्या सुरावटीत लागली होती. मी विचार
केला की असं का झालं असेल? संध्याकाळ्च्या वातावरणाला सकाळचा राग का? विचाराअंती
याचं उत्तरही मला सापडलं. ग्रेसांच्या कवितेमध्ये मला एक अनामिक, गूढ बेचैनी
जाणवली होती. सकाळचे राग संध्याकाळी ऐकले की मला अशीच बेचैनी येते. ही बेचैनी का
आहे त्यावर बोट ठेवता येत नाही म्हणून ती गूढ वाटते – अगदी ग्रेसांच्या
कवितेसारखी!
यातली एक गंमत
अशी जाणवते की हे सगळं अत्यंत कल्चर-स्पेसिफ़िक आहे. इंग्लंड किंवा फ्रान्समधल्या
कुणाला भैरव ऐकवला तर त्या लोकांना या सुरावटीचा आणि पहाटेचा काही संबंध आहे, हे
जाणवतही नाही!
जसं रागांच्या
सुरावटीचं आहे तसंच वाद्यांबद्दल आहे.
मध्यंतरी एका
हॉलिवुडच्या चित्रपटामध्ये एका साहसदृश्यात सनईचा वापर केला होता. मला त्याची फार
मोठी गंमत वाटली. सनई आणि पाठलागाचं दृश्य! गाड्या एकमेकांवर आदळताहेत, मारामारी
सुरू आहे, आणि पार्श्वसंगीत म्हणून चक्क सनई!
आपल्याकडे सनईचं
आणि लग्नाचं इतकं सूत जमलंय की सनई वाजली की आपल्याला ‘लग्न’ आठवतं. आमच्या एका मित्राच्या
लग्नात – केवळ त्या गाण्यांमध्ये सनई वाजली आहे म्हणून – तिथला सनईवादक
‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’ आणि ‘दिल का खिलौना हाय टूट गया’ ही गाणी
अत्यंत तन्मयतेने पुन्हापुन्हा वाजवीत होता! सनई आणि लग्न हेच समीकरण त्याच्या
मनात इतकं फिट्ट बसलं होतं की आपण अत्यंत दु:खी गाणी लग्नप्रसंगी वाजवीत आहोत याचं
भानही त्याला नव्हतं!
आपण सूर ऐकतो
तेव्हां फक्त सूर ऐकत नसतो – त्यां सुरांना संस्कृती आणि परंपराही चिकटली असते.
संस्कृतीच्या अवकाशातून आणि परंपरेपराच्या पंखावर आरूढ होऊन आपल्या मनात भिनत
असतात.
(‘क्षितिज जसे दिसते’ या माझ्या पुस्तकातून)
पुस्तक विकत घ्यायचं असेल तर इथून घेऊ शकता – 
© कौशल श्री. इनामदार, २०१४

2 Comments

  1. Bhakti Parab says:

    खूप सुंदर पुस्तक आहे. मी वाचलं आहे. मी आकाशवाणीच्या साहित्यसौरभ या कार्यक्रमात या पुस्तकाचं पुस्तक परीक्षण माझ्या आवाजातून सादर केलं होतं. अतिशय सुंदर पुस्तक. धन्यवाद कौशल सर.

What do you think?