सारेगमप लिट्ल चॅम्प्सची निवड करण्यासाठी आणि मराठी अभिमानगीताच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने नागपूरला जायची संधी मिळाली. उन्हाळ्यात नागपूरला जाणं याला ‘संधी’ म्हणण्यावर बर्याच वाचकांचा आक्षेप असू शकतो! पण नागपूरचा या खेपेचा दौरा इतका श्रीमंत आणि समृद्ध करणारा ठरला की उन्हाची ‘झळ’ लागली तरी अनिलांची ‘केळीचे सुकले बाग’च आठवायची.
बर्याच अर्थाने नागपूरचा हा दौरा पुस्तकमय होता. नागपूरला जाऊ तेव्हां ‘वाडा चिरेबंदी’कार महेश एल्कुंचवारांची प्रत्यक्ष भेट घेण्याचं माझं अनेक दिवसांपासून बाळगलेलं स्वप्न पूर्ण झालं. वेळेचे काटेकोर असलेल्या एल्कुंचवारांचं घर एका
शिस्तबद्ध लेखकाला शोभून दिसणारंच होतं. दिवाणखान्यात ठळकपणे उठून दिसणारी गोष्ट म्हणजे पुस्तकांचं एक अत्यंत सुबक असं कपाट. कपाटामध्ये मराठी, इंग्रजी अशी व्यवस्थित लावलेली पुस्तकं होती. मला मार्क ट्वेनची एक गोष्ट आठवली.
मार्क ट्वेनच्या घरात सगळीकडे विखुरलेली पुस्तकं पाहून त्याच्या एका मित्राने विचारलं – “तू ही पुस्तकं नीट कपाटात लावून का नाही ठेवत?” त्यावर मार्क ट्वेनने उत्तर दिलं – “कारण कपाटं कुणी उसनी देत नाहीत!”
कार्यक्रमाला कवी अनिल यांचे चिरंजीव श्री. शिरीष देशपांडे आणि सून सौ. आशावती देशपांडे उपस्थित होत्या.दुसर्या दिवशी सकाळी त्यांच्या घरी जाण्याचा योग आला. माझ्या सोबत कवी अशोक बागवे आणि माझा मित्र उन्मेष जोशी हे ही आले होते. अनिलांचं घर म्हणजे एक सुंदर, टुमदार, कौलारू अशी बंगली आहे. या बंगलीला ९७ वर्ष झाली अशी माहिती आम्हाला शिरीष देशपांडे यांनी दिली. कौलारू बंगली असल्यामुळे आत छान गारवा होता. आशावतीताईंनी आम्हाला भेट म्हणून अनिलांचे ‘फुलवात’ आणि ‘सांगाती’ हे दोन संग्रह दिले. प्रत्यक्ष साहित्यिकाकडून किंवा त्याच्या / तिच्या कुटुंबीयांकडून पुस्तक भेट मिळण्याचा प्रसंग किती आनंददायी असतो याचं वर्णन शब्दांत करणं खरोखर कठीण आहे.
|
विंदा करंदीकरांकडून मिळालेली अनमोल भेट |
माझ्या अनेक गाण्यांचं त्या बाबतीत नशीब खूप बलवत्तर आहे. विंदा करंदीकरांची ‘पर्वतांनो दूर व्हा रे’ ही कविता संगीतबद्ध करून त्यांना ऐकविली तेव्हां त्यांनी ‘मृद्गंध’ हा त्यांचा संग्रह भेट दिला होता. मंगेश पाडगांवकरांनी ‘संथ निळे हे पाणी’ ऐकून मला ‘कबीर’ हा संग्रह भेट दिला, आणि पु.लं.चं ‘बिल्हण’ पुनरुज्जिवित केलं तेव्हां सुनीताबाई देशपांडेंनी अतिशय प्रेमाने पुलंच्याच ‘वटवट वटवट’ या कार्यक्रमाची ध्वनिफीत भेट म्हणून दिली होती. कमावलेलं यश आणि पैसा एकीकडे आणि थोरामोठ्यांकडून मिळालेले पुस्तकरूपी आशीर्वाद एकीकडे!
आमच्या गप्पा रंगल्या आणि अनिल आणि कुसुमावती देशपांडे यांच्या त्या घरातल्या अनेक आठवणी आम्हाला शिरीष देशपांडे आणि आशावती देशपांडे यांनी सांगितल्या. त्या
बंगलीच्या बाहेरच्या भिंतीवर एक सुंदर चित्र होतं. माझ्या नजरेतलं कुतुहल पाहून शिरीष देशपांडे म्हणाले की ‘कुसुमानिल’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच्या द. ग. गोडसे यांच्या चित्राची ती प्रतिकृती आहे. ‘कुसुमानिल’ या पुस्तकाविषयी मला कुतुहल होतं पण दुर्दैवाने त्याची प्रत आता उपलब्ध नाही हे मी सांगितलं तेव्हां देशपांडे कुटुंबीयांनी प्रेमाने अनिल आणि कुसुमावती यांच्यातल्या पत्रव्यवहाराच्या या पुस्तकाची फोटोकॉपी मला भेट दिली. लेखकाकडून पुस्तक भेट मिळणं याचं मोल फार आहेच पण अशा एका दुर्मिळ पुस्तकाची फोटोकॉपी मिळणं तर केवळ अन्मोल आहे!
Like this:
Like Loading...