कुणीतरी म्हटलंय की पुस्तकं म्हणजे नुसते कागद एकत्र बाइंड केले नसतात, तर साक्षात माणसांची जिवंत मनं आपल्यासमोर ठेवली असतात. आणि माझ्या वडिलांनी अनेक जिवंत मनं आपल्या संग्रहात जोडली. “आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने…” हे आमच्या घराबाबतीत शंभर टक्के खरं होतं. आज मला वाचनाची आवड लागण्यात माझ्या वडिलांच्या पुस्तकं जमवण्याच्या छंदाचंच श्रेय आहे. कारण ज्या क्षणी तुम्हाला वाचायची ऊर्मी येते तो क्षण जिवंत असतांना तुमच्या हातात पुस्तक पडण्याची फार गरज असते.
मी ७ वर्षांचा असतांना माझे वडील मला दिल्लीला घेऊन गेले होते. ते वय असं होतं की लाल किल्ल्यापेक्षाही कॅनॉट प्लेस ही अधिक भारावून टाकणारी वास्तू वाटे! कॅनॉट प्लेसचं ते भव्य रूप, तिथली अगणित दुकानं, गर्दी, लोक, या सगळ्याकडे मी विस्फारलेल्या डोळ्यांनी बघत होतो. बाबा पुढे चालले होते आणि त्यांच्या मागे मी इकडे तिकडे बघत बघत चाललो असतांनाच माझी नजर अचानक फुटपाथवरच्या एका पुस्तक विक्रेत्यावर पडली… विक्रेत्यावर म्हणण्यापेक्षाही त्याच्या पुस्तकांवर पडली. त्या सगळ्या पुस्तकांच्या मांदियाळीत ज्या एका पुस्तकाच्या मुखपृष्ठावर माझी नजर खिळून राहिली होती ते होतं – अमर चित्र कथेतल्या सदरातलं एक कॉमिक – अभिमन्यु! मी थांबलेला पाहून
बाबाही थांबले आणि माझ्या विस्फारलेल्या डोळ्यांकडे पाहून हसले…
“आवडलंय का तुला काही?”
मी फक्त मान डोलावली.
“कुठलं हवंय?”
मी सगळी अमर चित्र कथांची कॉमिक्स चाळली आणि ‘अभिमन्यु’ आणि ‘तानाजी’ अशी दोन पुस्तकं घेतली. ती माझी खरेदी केलेली पहिली दोन पुस्तकं. त्या पुस्तकांकडे आकर्षित व्हायचं खरं कारण हे त्या कॉमिक्सच्या मुखपृष्ठांवरची अत्यंत आकर्षक चित्र! घरी जाऊन पुस्तक उघडून पाहिलं आणि सर्वात आधी त्या चित्रकाराचं नाव वाचलं. दोन्ही पुस्तकांवर एकच नाव होतं – प्रताप मुळीक.
साधारण दोन वर्षांनी माझ्या आजोळी, संध्याकाळी खेळून आल्यावर मी घरात शिरलो आणि माझ्या आजोबांच्या खोलीत एक रूपेरी केस आणि मिशी असणारे गृहस्थ आजोबांशी गप्पा मारत बसलेले मला आढळले. माझ्या आजीने सांगितलं त्यांचं नाव प्रताप मुळीक! तानाजीची गोष्ट चित्रांमधून इतक्या प्रभावीपणाने सांगणारे हेच ते प्रताप मुळीक हे कळल्यावर माझा आनंद गगनात मावेना.
अमर चित्र कथांचे माझ्यावर झालेले संस्कार आज अनेक प्रकारे मला उपयुक्त ठरत आहेत. प्रताप मुळीक, नांगरे, राम वाईरकर, सुरेन रॉय यांच्यासारख्या चित्रकारांची ओळख मला अमर चित्र कथांमुळे झाली. तानाजी म्हणजे प्रताप मुळीकांनी रंगवला तसाच दिसत असणार यावर माझी श्रद्धा होती तशीच ती आज ही आहे! राम वाईरकरांच्या व्यंगचित्रांमध्ये एक अजब व्यक्तिमत्त्व असतं. मला काही चेहरे पाहिले की असं वाटतं की प्रकृतीने ते राम वाईरकरांच्या चित्रांवरून प्रेरणा घेऊन निर्माण केले असतील… उदा. अभिनेता प्राण यांचा चेहरा! चित्रकला मी कधी शिकू शकलो नाही आणि मला त्यात फार गतीही नव्हती पण अमर चित्र कथांमुळे या कलेचं महत्त्व काय हे अगदी लहानपणापासूनच मनात रुजलं. ह्या चित्रांमुळे त्यातून सांगितलेल्या गोष्टी मनावर इतक्या ठसल्या की आज ही जयदेव म्हटलं की आधी सुरेन रॉय यांनी काढलेला जयदेवच आठवतो.
नुसतं चित्रांपुरतंच हे मर्यादित नव्हतं. इतिहास, पुराण, यामधल्या अनेक सुरस कथा यांची ओळख झाली. माझ्या आई वडिलांना जेव्हां माझ्या वाचनाची आवड (वयाच्या ९व्या वर्षापर्यंत जी अमर चित्र कथांपुरतीच मर्यादित होती) ओळखून अमर चित्र कथांची वर्गणी भरली आणि दर महिन्याला स्त्री, किर्लोस्कर या बरोबर अमर चित्र कथेचा अंकही पोस्टमन आमच्या घरी टाकू लागला. माझ्या नावावर टपाल येतं हे पाहून जरा मलाही मोठं झाल्यासारखं वाटे!
कालिदास, राणी अबक्का, राणा प्रताप, चाणक्य, सरोजिनी नायडू, सुब्रमण्य भारती यांसारखी इतिहासातली व्यक्तीमत्त्व ते जातक कथा, पंचतंत्र, महाभारतातल्या गोष्टी, अशा बोधकथा या सगळ्यांची ओळख अमर चित्र कथाने अत्यंत सुगम आणि मनोरंजक अशा मार्गाने करून दिली.
मला वाचनाची आवड लागली ती अमर चित्र कथांमुळेच. अमर चित्र कथांमधून संक्षिप्त स्वरूपात रामायण आणि महाभारत वाचून झाल्यानंतर भा.द. खेर यांनी लिहिलेली ‘कल्पवृक्ष’ आणि ‘सेतुबंधन’ या महाभारत आणि रामायणावर आधारित कादंबर्या वाचायची प्रेरणा मिळाली आणि तिथूनच पुस्तकांशी एक लव्ह अफेअर सुरू झालं!
आजच्या कार्टून नेटवर्कच्या तुलनेने अमर चित्र कथांची दुनिया मला अधिक श्रेष्ठ वाटते. भारताच्या प्राचीन परंपरेची ओळख तर त्यांनी करून दिलीच पण गोष्टींमधून आयुष्यात आजही उपयुक्त पडतील असे बोध दिले. वाचनाचा छंद मला जडला आणि तो मी जोपासू शकतोय हा मला मिळालेला सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. मला गुरू, शिक्षकही असे भेटत गेले की त्यांनी मला वाचायची प्रेरणाच दिली. मी कॉलेजमधे असताना माझी पहिली एकांकिका लिहिली आणि त्याला एका स्पर्धेत बक्षीस मिळालं. त्या एकांकिकेचं दिग्दर्शन केलं होतं चेतन दातारने. दुसऱ्या दिवशी चेतनने मला एन.सी.पी.ए.मधे बोलावून घेतलं, जिथे तो तेव्हा कामाला होता. मला समोर बसवून त्याने विचारलं –
“आता बक्षीस मिळालं म्हणजे आपण लेखक झालो असं वाटतंय का तुला? पण लेखन करायचं असेल तर परंपरा माहित हवी.”
तिथल्या तिथे चेतनने मला शंभर-स्व्वाशे नाटकांची यादी डिक्टेट केली. खाडिलकरांच्या ‘कीचकवधा’पासून तेंडुलकरांच्या ‘सखाराम बाइंडर’ पर्यंत, बादल सरकारच्या ‘पगला घोडा’ पासून मोहन राकेशच्या ‘आधे अधुरे’पर्यंत, ब्रेख्तच्या ‘थ्री पेनी ऑपेरा’पासून इब्सेनच्या ‘डॉल्स हाउस’ पर्यंत आणि पिंटरच्या ‘डंब वेटर’पासून ऑस्बऑर्नच्या ‘लुक बॅक इन अॅन्गर’पर्यंत अशी जागतिक रंगभूमीवरची श्रेष्ठ नाटकं त्याने या यादीत समाविष्ट केली होती. चेतन म्हणाला या सुट्टीत ही नाटकं वाचून झाली पाहिजेत. त्याने माझ्यासमोर एन.सी.पी.ए च्या लायब्ररीचं कार्ड ठेवलं. त्यावर माझं नाव लिहिलं होतं.
“ही मेंबरशिप तुला माझ्याकडून बक्षीस. आतापासूनच नाटकं वाचणं सुरू कर.”
मी रोज दुपारच्या सुमारास एन.सी.पी.एच्या ग्रंथालयात जाऊन नाटकं वाचू लागलो. तीन-चार तासात एक नाटक वाचून व्हायचं. तो पर्यंत चेतनचं कामही संपलेलं असायचं. मग मी आणि चेतन एन.सी.पी.ए पासून चर्नी रोड स्टेशनपर्यंत चालत जायचो. वाटेत त्या दिवशी वाचलेल्या नाटकावर चर्चा करायचो.
महाविद्यालयात असतांना प्रा. हिर्लेकर सर हे मला अर्थशास्त्र शिकवायला होते. मार्क्सची थियरी शिकवायला त्यांनी लैला-मजनूच्या कथेचा उपयोग केला होता. मार्क्स आणि ऍडम स्मिथसारख्या अर्थशास्त्रज्ञांमध्येही एक रोमॅन्स आहे याची जाणीव त्यांनी करून दिली आणि त्यामुळे मार्क्सही वाचला गेला आणि लैला मजनूची कथाही!
प्रा. मोइनुद्दिन जिनाबडे हे उर्दूचे प्राध्यापक आणि कथाकार युनिव्हर्सिटीत उर्दू शिकवायचे. प्रेमचंद, अख़्तर-उल-ईमान, ग़ालिब यांचं साहित्य वाचण्याची प्रेरणा त्यांच्याकडून मिळालीच पण ते म्हणायचे –
“तुम्हे लगता है कि रायटर ख़ुद को एक्स्प्रेस करने के लिये लिखता है? ग़लत! रायटर ख़ुद को छुपाने के लिये लिखता है!”
या एका वाक्यामुळे कोण लेखक काय व्यक्त करतोय आणि काय दडवतोय हे सुद्धा पुस्तकांमध्ये शोधायला लागलो.
मी माझ्या क्षेत्रातले अनेक असे लोक पाहिले आहेत – विशेषतः गायक-गायिका ज्यांना वाचन आवडत नाही आणि त्याचा त्यांना अभिमानही आहे.
‘गायकाला त्याचा काय फायदा?’ असा त्यांचा प्रश्न असतो. आणि इथे माझे गुरू पं. सत्यशील देशपांडे यांचे माझ्यावरचे ऋण मला जाणवतात. माझं जवळ जवळ सगळंच संगीतविषयक वाचन त्यांच्यामुळे झालंय. वाचनाच्या आवडीचं फळ मला ‘बालगंधर्व’ चित्रपटाचं संगीत करताना मिळालं.
बालगंधर्वांवरची पुस्तकं आणि लेख तर वाचलेच, पण पं. सत्यशील देशपांडे यांच्या सल्ल्याने तो काळ समजून घेण्यासाठी गोविंदराव टेंबेंची ‘माझा जीवन विहार’ आणि ‘माझा संगीत व्यासंग’ या सारखी पुस्तकंही वाचली. ‘बालगंधर्व’ मधलं ‘परवरदिगार’ हे गीत केवळ बालगंधर्वांवरील रवींद्र पिंगे यांचा लेख वाचून सुचलं. पिंगे यांनी त्यांच्या लेखात असा उल्लेख केला आहे की बालगंधर्व गोहरबाईंना ‘गोहरबाबा’ म्हणायचे आणि गोहरबाई त्यांना ‘परवरदिग़ार’ म्हणायच्या. हा लेख वाचला नसता तर कदाचित परवरदिग़ार हा शब्द मिळाला नसता.
बालगंधर्व चित्रपटानंतर मात्र चरित्र आणि आत्मचरित्र वाचून काढण्याचा सपाटा लावला. चित्रपट क्षेत्राशी निगडित लोकांची अनेक चरित्र-आत्मचरित्र वाचली. विश्राम बेडेकरांचं ‘एक झाड आणि दोन पक्षी’, सी. रामचंद्र यांचं ‘माझ्या जीवनाची सरगम’, लीला चिटणीस यांचं ‘चंदेरी दुनियेत’, मधू पोतदार यांनी लिहिलेली वसंत पवार आणि वसंत प्रभू यांची चरित्र, राजू भरतनने लिहिलेलं लता मंगेशकर यांचं चरित्र अशी अनेक… टाइम मशीनचा शोध लागत नाही तोवर चरित्र आणि आत्मचरित्र हे भूतकाळाचा विहार करण्याचं एक उत्तम वाहन आहे असं माझ्या ध्यानात आलं!
माझ्या घरी टी. व्ही. नाहिये पण पुस्तकांचा प्रचंड संग्रह आहे. एकांतामध्ये पुस्तकासारखा दुसरा सखा नाही. आता डिजिटल स्वरूपातही पुस्तकं मिळतात. पण माउसच्या क्लिकने उलटणाऱ्या पानांपेक्षाही पुस्तक वाचण्याचा अनुभव जास्त अस्सल वाटतो. याचं कारण आहे की पुस्तक पंचेन्द्रियांना अनुभव देणारं साधन आहे. नेत्रांनी तर वाचनाचा अनुभव आपण घेतोच पण पानं उलटतानाचा स्पर्श हा सुद्धा या अनुभवाचाच भाग आहे. पुस्तकांचा वास हा सुद्धा आपल्याला एका वेगळ्या अनुभवविश्वाचं दर्शन घडवतो. नवीन पुस्तकांचा वास आपण एका नवीन अनुभवाच्या उंबरठ्यावर उभे असल्याचं सुचवतो तर जुन्या पुस्तकांना आठवणींचा गंध असतो!
हा असाच अनुभव गुलज़ार यांनी आपल्या एका कवितेतून मांडला आहे.
किताबें झांकती है बंद अलमारी के शीशों से
बड़ी हसरत से तकती है
महीनों अब मुलाकातें नही होती
जो शामें इनकी सोहबत में कटा करती थी अब अक्सर
गुजर जाती है कंप्युटर के परदों पर
बड़ी बेचैन रहती है किताबे ….
इन्हे अब नींद में चलने की आदत हो गई है
बड़ी हसरत से तकती है ..
जो कदरें वो सुनाती थी
की जिन के सैल कभी मरते थे
वो कदरें अब नज़र आती नही घर में
जो रिश्ते वो सुनाती थी
वह सारे उधडे उधडे हैं
कोई सफहा पलटता हूँ तो एक सिसकी निकलती है
कईं लफ्जों के माने गिर पड़े हैं
बिना पत्तों के सूखे टुंडे लगते हैं वो सब अल्फाज़
जिन पर अब कोई माने नही उगते
बहुत सी इसतलाहे हैं
जो मिटटी के सिकूरों की तरह बिखरी पड़ी है
गिलासों ने उन्हें मतरुक कर डाला
जुबान पर जायका आता था जो सफहे पलटने का
अब उंगली क्लिक करने से बस इक झपकी गुजरती है
बहुत कुछ तह बा तह खुलता चला जाता है परदे पर
किताबों से जो ज़ाती राब्ता था ,कट गया है
कभी सीने पर रख कर लेट जाते थे
कभी गोदी में लेते थे
कभी घुटनों को अपने रिहल की सूरत बना कर
नीम सजदे में पढ़ा करते थे ,छूते थे जबीं से
वो सारा इल्म तो मिलता रहेगा बाद में भी
मगर वो जो किताबों में मिला करते थे सूखे फूल
और महके हुए रुक्के
किताबें मँगाने ,गिरने उठाने के बहाने रिश्ते बनते थे
उनका क्या होगा
वो शायद अब नही होंगे !!
© कौशल श्री. इनामदार, 2015
8 Comments
मस्त जमलाय लेख कौशल!
Chaan kaushal sir vatchaan manasala samrudha banvate.
मस्त लेख…. पुस्तके कशी प्रेरणास्पद ठरू शकतात त्याचे स्वानुभव फार काही सांगून जातात…!
सुंदर लेख कैशलजी, प्रत्येक शब्दात तुमच्यातला प्रामाणिक कलाकार डोकावतो. एवढ्या वाचनाशिवाय थोडिच "डोळ्यांना डसले पहाड इथले" मधल काव्य समजावून घेऊन चाल लावता येते…
सुंदर लेख कैशलजी, प्रत्येक शब्दात तुमच्यातला प्रामाणिक कलाकार डोकावतो. एवढ्या वाचनाशिवाय थोडिच "डोळ्यांना डसले पहाड इथले" मधल काव्य समजावून घेऊन चाल लावता येते…