एक विचार मनात आला. कुणाला वायफळही वाटू शकतो. गायक आणि पेयांमध्ये साधर्म्य शोधयचा प्रयत्न केला तर कुठला गायक कुठलं पेय असेल?
तर मुकेश हे लिंबू सरबत आहेत. जरा आंबटसर चव आहे त्यांच्या अनुनासिक आवाजाची.
मन्ना डे हे दूध आहेत. पौष्टिक आणि शक्तिवर्धक.
गीता दत्त कडक फिल्टर कॉफी आहेत. झोप उडवतात.
तलत महमूद शहाळ्याचं पाणी आहेत. गोड आणि मलईदार!
महेन्द्र कपूर – हे पंजाबी लस्सी आहेत. लस्सी प्यायल्यानंतर जशी एक आकर्षक खर आवाजात येते तशी त्यांच्या आवाजाला आहे.
हेमंत कुमार बियर आहेत. थंड, हळुवारपणे स्वाद घ्यावा असा रविवार दुपारचा आवाज.
आशा भोसले या अतिशय उंची वाइन आहेत. जिभेवर आवाज रेंगाळत ठेवावा आणि नशा अनुभवावी.
महम्मद रफ़ी हे स्कॉच व्हिस्की आहेत. सोनेरी, उत्तम दर्जा आणि ॲडिक्टिव्ह.
किशोर कुमार चहा आहेत – कधीही, कसाही अनुभवावा. दुधात, दुधाशिवाय, तल्ल्फ येते म्हणून, जाग येते म्हणून, सवय म्हणून, तजेला येतो म्हणून, कामात, रिकाम्या वेळात, घरचा, इराण्याचा, टपरीवरचा. कुठल्याही रुपात तो मस्तच वाटतो. (शिवाय माझं आवडतं पेय आहे!)
आणि शेवटी लता मंगेशकर. त्या पाणी आहेत. नितळ, पारदर्शक, स्वच्छ, शुद्ध! तहान लागली तर ती इतर कुठल्याही पेयाने भागत नाही. प्राण वाचवू शकणारं हे एकमेव पेय.
© कौशल श्री. इनामदार