नवे गीत गाऊ

gudhi padwa

gudhi padwa

चैत्राची चाहूल लागली आणि मन आपोआप नवीन होऊन गेलं. मला अचानक आठवलं ते सुधीर फडकेंचं गीत –

नवीन आज चंद्रमा, नवीन चैत्र यामिनी…

या गाण्यातही चैत्राचा उल्लेख आहे आणि त्यामुळे रोजचा चंद्रमाही का नवीन वाटत असेल हे कोडं उलगडतं.
मला प्रत्येक नवीन वर्षाची ही गंमत वाटते. खरं तर काय असं बदलंत असतं? तरीही एक नवं चैतन्य, नवा उत्साह दाटून येतो. नवीन होत राहाणं ही एक आंतरिक गरज असते. नवे संकल्प, नव्या आशा, नवी उमेद!
असं हे नवीन होणं वर्षातून अनेकदा होत असतं. गुढी पाडवा, १ जानेवारी, आपापला वाढदिवस, लहान असताना – शाळा किंवा महाविद्यालयाचा पहिला दिवस, (काही लोकांसाठी १ एप्रिलसुद्धा!) संपूर्ण विश्वाच्या संदर्भात क्षणांच्या अविरत साखळीत या नवीन क्षणांना कदाचित काहीच स्थान नसेल, पण आपल्या मनात मात्र दर वेळी एका नव्या पर्वाची सुरुवात होत असते. आणि हेच नवीन होत राहाणं आपल्या मनाची उमेद वाढवत राहातं.
मी पाहिलेली अनेक यशस्वी माणसं रोजच आपल्या आयुष्यात हे नाविन्य निर्माण करत राहतात.  कदाचित म्हणूनच ते यशस्वी असतात. प्रत्येक दिवस हे एक नवीन पर्व आहे असं समजून आपण चालावं ही जगातल्या अनेक गुरंची, धर्मगुरूंची, आणि तत्त्वज्ञांची शिकवण आहे. ख्रिस्ती लोकांची प्रार्थना म्हणते – “God, give us our DAILY bread!” प्रार्थनेमध्येही ‘रोजचीच’ पोळी देवाकडे मागितली आहे. महिन्याचा किंवा वर्षाचा साठा नाही! गौतम बुद्धाने सांगितलं आहे की मेणबत्तीची ज्योत एकच असली तरी ती प्रत्येक क्षणी नवीन असते. हेरॅक्लिटस म्हणाला की आपण नदीच्या त्याच पाण्यात दोनदा पाय ठेवत नाही! नाविन्याचा उत्सव जगभरातच साजरा केला जातो. आणि या नाविन्याची ओढ लोकांना असते म्हणूनच आपलं आयुष्य रोज सुखद आणि समृद्ध होत जातं. कवी नवीन कविता करतात, संगीतकार नव्या चाली त्या कवितांना देतात, नवीन शोध लागत राहतात, आणि क्षणांच्या अविरत साखळीतला प्रत्येक क्षण नव्या तेजाने उजळून निघतो.
जाता जाता शांताबाई शेळके यांची एक त्यांच्याच आवडीची कविता आठवतेय.

मला वाटते ग नवा जन्म घेऊ
नवे श्वास गुंफू, नवे गीत गाऊ
जुना गाव राही कुठे दूर मागे
नव्या पावलांना नवा मार्ग देऊ

© कौशल श्री. इनामदार

9 Comments

  1. Deepak Agwan says:

    The best

  2. Utpal Madane says:

    Wah!! Uttam

  3. Ravi Upadhye says:

    अतिशय सुंदर

  4. Yogeshri Bapat says:

    असं रोज नवीन होत जाणंच आपल्याला समृद्ध करत जातं……very well expressed…

    • Kaushal S. Inamdar says:

      धन्यवाद योगेश्री! असाच लोभ असू द्या!

  5. Prasaad Joshi says:

    कालचे पान आजवर उलटताना थांबलो मी
    आजमध्ये कालची शिल्लक पुढे ओढताना बरे वाटले होते ….
    कौशलदा… तुझं वाचताना माझ्या ओळी खोट्या वाटू लागल्या रे
    आणि शांताबाईंच्या ओळींनी तर मनावरचं पण स्वच्छ केलं
    सलाम !!!

    • Kaushal S. Inamdar says:

      धन्यवाद प्रसाद! वाचत रहा आणि कळवत रहा! तुझ्या प्रतिसादामुळे हुरूप येतो!

What do you think?