संगीतक्षेत्रात मी पाऊल ठेवलं तेव्हां वेगवेगळ्या निमित्ताने अनेक दिग्गज कलाकारांच्या भेटीचा योग आला. हे सगळेच कलावंत थोर होते पण क्वचितच एखादा कलावंत मला समाधानी दिसला. बहुतेकजण अतृप्त, बेचैन… सुरुवातीला मला या दृश्याची भीति वाटायची. इतकी वर्ष काम करून… उत्तम काम करून हाताला इतकंच लागतं का? बेचैनी? असमाधान?अतृप्तता? वैफल्य? तरी हे लोक हेच का करत राहिले? कधी या क्षेत्रातली असुरक्षितता सोडून एक सुरक्षित मार्ग पकडून चालत राहावं असं का नाही वाटत यांना?
मग जसाजसा मी या क्षेत्रात स्थिरावलो (म्हणजे या अस्थिरतेची सवय झाली) तेव्हां मला एका क्षणाच्या वरदानाचं मोल काय असतं ते हळूहळू उमजायला लागलं. एक उत्तम चाल सुचते, किंवा एक उत्तम कविता सुचते त्याचा आनंद क्षणाचा असतो आणि मग इतकंच उत्तम आपल्याला का सुचत नाहिये याची पीडा पुढचा अनेक काळ पाठ सोडत नाही! कधीकधी ही अवस्था ‘पुन्हा डाव लागेल’ या प्रतीक्षेत असलेल्या एका जुगार्यासारखीच वाटते. आपल्याच वरदानाचा शाप वागवणारे कितीतरी यक्ष आजूबाजूलाच आढळतात.
परवा चार्ली चॅप्लिनचा ‘लाइमलाइट’ चित्रपट पाहात बसलो होतो. वयस्क चार्ली चॅप्लिन आणि अतिशय तरूण क्लेअर ब्लूम ही नटी! चार्ली चॅप्लिनने अतिशय कमी बोलपट केले. त्यातला मला सगळ्यात भावलेला म्हणजे ‘लाइमलाइट’. ‘लाइमलाइट’, अर्थात प्रकाशझोत. कार्व्हालो (चॅप्लिन) हा प्रसिद्धीच्या प्रकाशझोतापासून दूर झालेला, प्रतिभा संपलेला मद्यपी विनोदवीर एका विमनस्क अवस्थेतल्या, उमेद संपलेल्या बॅले नृत्यांगनेला आत्महत्येच्या प्रयत्नापासून वाचवतो आणि पुन्हा जगण्यासाठी बळ देतो अशी ही कथा आहे.
परवा चित्रपट पुन्हा एकदा पाहतांना त्या चित्रपटामधल्या दोन वाक्यांनी लक्ष वेधून घेतलं आणि काही कोडी उलगडली. एका दृश्यामध्ये कार्व्हालो त्या तरूण बॅले डान्सरला सांगतो की त्याला रंगभूमीचा तिटकारा वाटतो. मग दुसर्या एका दृश्यात तो याच रंगभूमीबद्दल भरभरून बोलतो आणि ती म्हणते –
“I thought you hated the theatre.”
त्याच्यावर तो म्हणतो – “I hate the sight of blood, but it runs in my veins.”
अनेक वैफल्यग्रस्त, असमाधानी कलाकारांनीच कदाचित या समाजाला शहाणं आणि सुरक्षित ठेवण्याचं काम केलं आहे. या सर्व शापित यक्षांना माझा सलाम!
© कौशल इनामदार २०१७