कौशलने संगीत दिलेले नवीन नाटक – आरण्यक

© Kaushal Inamdar

मराठी रंगभूमीच्या इतिहासात पौराणिक विषय असणाऱ्या नाटकांनी – विशेषत: संगीत नाटकांनी एक काळ गाजवला, एक पिढी त्या आविष्काराने झपाटून गेली.
‘महाभारत’ ही प्रत्येक काळाशी संवाद साधणारी कलाकृती आहे. मानवी भावनांचा महासागर त्यात आहे. त्यामुळे प्रत्येक काळात त्याची गाज तुम्हाला आकर्षून घेणारच.
‘आरण्यक’ च्या निमित्ताने हा अनुभव कलाकार आणि नाट्यरसिक दोघांनीही अनुभवता येणार आहे.

विषयाची भव्यता आणि गांभीर्य लक्षात घेता नाटकाच्या संगीताविषयी कुतूहल निर्माण होणं स्वाभाविक आहे. संगीत परिणामकारक हवं, विषयाला साजेसं हवं या परिमाणांच्या पलीकडे जाऊन ते कलाकृतीशी आणि प्रेक्षकांशी संवाद साधणारं हवं, ही ‘आरण्यक’ च्या संदर्भात फार महत्त्वाची बाब होती. तो संवाद कौशल इनामदार यांच्या संगीताने साधला आहे. पात्रांच्या भूमिकेतून संगीताचा विचार कौशलने केला आणि संगीत हे नाटकातलं एक महत्त्वाचं ‘पात्र’ झालं. जे त्या त्या पात्राबरोबर, घटनाक्रमाबरोबर वाजत असलं तरी ‘श्राव्य’ स्वरूपातलं पात्र ही त्याची भूमिका आहे. म्हणूनच संगीत नाटक नसूनही संगीताशिवाय या नाटकाचा विचारही करता येणार नाही. शब्दांतून, अभिनयांतून जे व्यक्त होतंय त्याला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम हे संगीत करतंच. त्याही पलीकडे कवितेत जसं दोन ओळींच्या मधलं सांगणं असतं, तसं हे संगीत तुम्हाला त्या पात्राच्या मनोवस्थेबद्दल, घटनेबद्दल सांगतं.

या नाटकाची संपूर्ण संगीत टीम –

संगीत – कौशल इनामदार [note]https://mr.wikipedia.org/wiki/कौशल_इनामदार[/note]

संगीत संयोजन – अमित पाध्ये. सतार – उमाशंकर शुक्ला. बासरी – वरद कठापूरकर. सारंगी – दीपक मराठे. पखवाज आणि तालवाद्य – शशांक हडकर. समूहगायक – उमेश जोशी, विजय धुरी, प्रगती जोशी, ऋचा सोमण. ध्वनिमुद्रण – अभिषेक दांडेकर. ध्वनिमिश्रण आणि प्रमाणिकरण – विवेक कांबळी (हार्मनी स्टुडियो). संगीत परिचालक – अतिश कुंभार आणि अभिषेक सरपडवळ

 

– अस्मिता पांडे

 

What do you think?