रसिक नेहमी गाणं पूर्णत्वाला गेलं की मगच ऐकतात. पण संगीतकाराकडून फक्त पेटीवर चाल ऐकणं ही एक वेगळीच अनुभूती असते. तयार, ध्वनिमुद्रित गाणं गायकाकडून ऐकणं म्हणजे ट्रिव्हागोवर जाऊन जागेची माहिती घेण्यासारखं आहे आणि संगीतकाराकडून थेट चाल ऐकणं म्हणजे लोकल गाइड घेऊन तीच जागा पाहण्यासारखं आहे. गायक तुम्हाला एक पॉलिश्ड अनुभव नक्कीच देऊ शकतो. संगीतकाराचा आवाज जरा ओबडधोबड असला तरी त्याला गल्ल्या माहित असतात!
माझ्या मनात अनेक दिवस असं चाललं होतं की माझ्या चाली आणि तुम्ही – अशी एक घरगुती मैफल रंगवावी. आजपासून दर आठवड्याला दोन चाली मी तुम्हाला माझ्या आवाजात ऐकवणार आहे. माझ्या फेसबुक पानावर आणि यूट्यूब वाहिनीवर. जर आपण सदस्य झाला नसाल तर जरूर व्हा.
पहिलं गाणं हे आशेचं गाणं असावं या हेतूने ‘छंद ओठांतले’ या मालिकेतलं पहिलं गीत मी मंगेश पाडगांवकरांचं – ‘आता उजाडेल’ हे निवडलं. ही कविता त्यांच्या ‘जिप्सी’ संग्रहातली आहे. माझ्या पहिल्या पहिल्या चालींपैकी ही असल्यामुळे यात एक कच्चेपणा आहे. पण तरीही माझी ही लाडकी चाल आहे. ही चाल करताना माझ्या मनात होतं की एका अर्थानं हे गाणं मला ‘घाईसाठी ॲंटिडोट’ म्हणून बनवायचं आहे. म्हणून या चालीत मी ‘वेळ’ निर्माण करायचा प्रयत्न केला आहे.
कधीकाळी या गाण्याचं अजित परब आणि शिल्पा पै यांच्या आवाजात ध्वनिमुद्रणही केलं होतं पण ती मास्टर टेपच तुटली. नंतर हे गीत ध्वनिमुद्रित करण्याचा मूहूर्त काही लागला नाही. पण आज या गाण्याची पुन्हा एकदा आठवण आली. ॲलेग्झॅंडर पोप म्हणतो – “Hope lies eternal in the human breast.” या गाण्यातलीही आशा चिरंतन आहे.