१९९३-९४ची गोष्ट असावी. मी नुकता चाली द्यायला लागलो होतो. काही मित्र आणि घरातली मंडळी सोडून फार कुणी त्या ऐकलेल्याही नव्हत्या. मी संगीतरचना करातोय याचं, माझा मित्र आणि गुरू चेतन दातार, याला मात्र प्रचंड कौतुक होतं. चेतनला जे ओळखतात, त्यांना त्याच्या कौतुकाची किंमत लगेचच कळेल! अर्थात चेतनची कौतुक करण्याची पद्धत जरा वेगळी होती.
“बऱ्या करतोस तू चाली.” असं वाक्य त्याच्याकडून आलं की समजावं की त्याला आपलं संगीत आवडलंय. पण मग तो तेवढ्यावर थांबायचा नाही. त्याला काही चांगलं वाटलं की तो शेअर करायचा. “हे तू ऐकायला हवंस,” असं आवर्जून सांगायचा.
तर चेतनने मला एकदा लोकप्रभाचा अंक आणून दिला.
“या अंकात महेश केळुसकरांची एक फार मस्त कविता आहे. मीटर मजेदार आहे. तू या कवितेला चाल दे.”
मी कविता वाचली. कोकणातल्या रानातलं गर्द, गूढरम्य पावसाळी वातावरण. कोकणातल्या वळणदार वाटांसारखंच कवितेचंही नागमोडी वृत्त. अर्थाच्याही पलीकडे जाऊन स्वर-व्यंजनांच्या ध्वनींचा ऊन-पावसाचा खेळ. ती कविता माझ्यात चांगलीच भिनली!
बरेच दिवस लोटले तरी चाल मात्र सुचली नाही. रचना करणं कठीण नसतं; परंतु कवितेतल्या वातावरणाची अनुभूती मिळेल अशी रचना करणं कठीण असतं. चाल सुचत नसतानाही शब्द मात्र मनात सतत रुंजी घालत होते.
रानात झिम्म पाऊस । उन्हाला फूस ।
तुझ्या पिरतीची ॥
मज भीती वाटते मनातल्या भरतीची ॥
गाण्यात नुसता पाऊस येता कामा नये तर ‘झिम्म’ पाऊस आला पाहिजे! घनघोर पाऊस पडतानाही बाहेरच्या पावसाची भीती न वाटता मनातल्या भरतीची भीती वाटते आणि ही भीतीच असली तरी तिची छटा वेगळी आहे.
मध्ये एक-दीड वर्ष गेलं असेल. मी पं. सत्यशील देशपांडेंकडे गेलो होतो. ते भैरव गात बसले होते. गाता गाता सत्यशीलजी ते देवासला कुमार गंधर्वांकडे शिकत असतानाच्या काही आठवणीही सांगत होते. एकदा ते आणि मुकुलजी तानांचा रियाज करत बसले होते आणि कुमारजींच्या घराच्या ओसरीवर एक निर्गुणी भजनं गाणारा गोसावी येऊन बसला. तो गाऊ लागला आणि गाता गाता एकच अशी मींड घेतली की बस्स! सत्यशीलजी म्हणाले की त्याच्या त्या एका मींडमुळे आमची तानही फिकी पडावी. सत्यशीलजींनी मला त्या निर्गुणी भजनाच्या दोन ओळी गाऊन दाखवल्या.
दिमी दिमी बाजत मंदिलरा
गाइये बजाइये रिझाइये मन को
नाचत ता दिर दिर ता थैय्या…
दिमी दिमी बाजत मंदिलरा
सत्यशीलजींना त्या निर्गुणी भजनात देवास दिसत होतं आणि मला का कोणास ठाऊक पण महेश केळूसकरांच्या कवितेतला कोकणातला ‘झिम्म पाऊस’ दिसत होता. घरी आलो तरी मला एका बाजूने ही निर्गुणी धून आणि दुसऱ्या बाजूने केळूसकरांचे शब्द खेचत होते. मी विचार केला या मनःस्थितीला विराम द्यायचा असेल तर या दोन्ही गोष्टी एकत्र आणल्या पाहिजेत!
तू घालू नको ना शीळ । मनी झिळमीळ । सळसळे वारा
वाऱ्यात मातीचा वास । सुगंधी भास । बरसती धारा
उलघाल उंबऱ्या आड पिशा गरतीची ॥
मला बऱ्याचदा असं वाटतं की आपण कविता संगीतबद्ध करत असतो म्हणजे नेमकं काय करत असतो? तर कविता वाचताना ‘वाऱ्याची सळसळ’ किंवा ‘मातीचा वास’ हे शब्द आपण वाचतो; पण त्यातले स्पर्श आणि गंध जाणवायचे असतील तर त्या त्या इंद्रियाचं काम आपण संगीताकडून घेतो आणि शब्दांचं अनुभूतीत रूपांतर करतो. केळूसकरांच्या नायिकेच्या मनातल्या भरतीमुळे तिचा काळजाचा ठोका चुकत असावा. हा चुकलेला ठोका दाखवण्याकरता मी ‘सळसळे वारा’ या शब्दांनंतर एक पॉज घेतला आहे.
या गाण्यातले सूर हे तसे भैरव – कालिंगडाचेच असले तरी फक्त एकाच ठिकाणी मी शुद्ध निषादाच्या ऐवजी कोमल निषाद लावलाय – ‘पिशा’ या शब्दावर!
या चालीमध्ये ‘दिमी दिमी बाजत मंदिलरा’चे सूर असले तरी मला त्या गाण्यातला निवांतपणा किंवा फुरसत नको होती. त्याउलट एक अस्थिरता, हुरहुर या चालीत आणायचा मी प्रयत्न केला. हे गीत पहिल्यांदा मी कार्यक्रमात घेतलं तेव्हा त्याचं संगीत संयोजन कमलेश भडकमकरने केलं. कमलेशने कडव्याच्या आधीचा तुकडा इतका गाण्याला साजेसा केला की जेव्हा मी ते गाणं रेकॉर्ड केलं तेव्हा जरी सुस्मित लिमये या माझ्या अत्यंत गुणी मित्राने त्याचं संगीत संयोजन केलं असलं तरी कमलेशने केलेला पीस आम्ही तसाच ठेवला. नेहा राजपाल हे गीत गायली.
केळूसकरांच्या कवितेच्या तिसऱ्या कडव्यात शब्द आहेत –
तू गाऊ नको ना गीत । सोडूनि रीत । कशी मी येऊ ?
राहीन जळत दिन रात । चिंब धारात । कशी पण न्हाऊ ?
गातील पाखरे कथा व्यथा झुरतीची ॥
पहिल्या कडव्यात जसा पॉज येतो तसाच याही कडव्यात येतो; पण या वेळी तो एक प्रश्नचिन्ह बनून येतो. ज्याला जे वाटेल ते त्या एका पॉजमध्ये आहे. एका सुराला कोट्यावधी छटा असतात आणि एका क्षणाच्या शांततेला अब्जावधी ! श्रावणातल्या ऊनपावसाच्या खेळाप्रमाणेच हा सूर आणि विरामांचा खेळ सुरू राहतो. केळूसकरांच्याच शब्दांत सांगायचं तर ‘स्वरांना त्या क्षणाच्या विरामाची फूस असते!’
© कौशल इनामदार
2 Comments
कौशलजी, रानात झिम्म पाऊस ऐकलं, खूप आवडलं। शब्द व धुन शेवटपर्यंत मनाला “ओढत ” नेतात.छान जमलंय। मी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहूनच थांबलोशेवटपर्यंतपाहावससा वाटणं हे कुशल रचनाकाराचं मोठंच यश आहे।
जीते रहो कौशलजी.
अतुल फणसे, मुंबई.
धन्यवाद अतुलजी! आपल्यासारख्या जाणकारांकडून दाद मिळते हे विशेष!