अख़्तर-उल्-इमान, ज्यांना आपण ‘वक़्त’, ‘कानून’, ‘नया दौर’ सारख्या चित्रपटांचे पटकथाकार आणि संवादलेखक म्हणून ओळखतो, हे उर्दूतील प्रसिद्ध शायर होते. शायर असूनही त्यांनी ग़ज़ल हा काव्यप्रकार कधी हाताळला नाही. त्याबाबत त्यांना एकदा विचारलं असता त्यांनी असं उत्तर दिलं – “मी कधी ग़ज़ल लिहिली नाही कारण ग़ालिबने त्यातल्या सर्व शक्यता संपवल्या आहेत!”
मला ग़ज़ल हा काव्यप्रकार म्हणून आणि संगीतप्रकार म्हणूनही अत्यंत प्रिय आहे परंतु अख़्तर-उल्-इमान म्हणतात त्याच कारणासाठी मी ग़ज़ल हा प्रकार इतका हाताळला नाहीए. ग़ज़ल गायकीच्या प्रामुख्याने दोन शाखा आहेत – पहिली पारंपरीक – बरकत अली खाँ, बेग़म अख़्तर, इक़्बाल बानो, फ़रिदा ख़ानम, मेहदी हसन (मेहंदी नव्हे!) हे या पारंपरीक शैलीचे शिलेदार आहेत. माझं मत आहे की आधुनिक ग़ज़ल रचनेची नवी शाखा ग़ुलाम अली यांच्यापासून सुरू झाली. संगीतकार म्हणून त्यांची प्रतिभा इतकी अगाध आहे की त्यांनी ग़ज़ल रचनेत अनेक शक्यता निर्माणही केल्या आणि संपवल्यादेखील! त्यामुळे काहीही चाल केली तरी त्यात ग़ुलाम अली डोकावल्याशिवाय राहात नाही. माझ्यापुरतं सांगायचं झालं तर माझ्यावर ग़ुलाम अली यांचा खूप प्रभाव आहे.
ग़ज़ल मला आव्हनात्मक प्रकार का वाटतो हे थोडक्यात सांगतो. हा फॉर्म असा आहे की यातला प्रत्येक शेर हा अर्थाला परिपूर्ण असतो. म्हणजे एक शेर हीच एक स्वतंत्र कविता असते. एका ग़ज़लमधले वेगवेगळे शेर वेगवेगळे विषय मांडू शकतात. विषयाचं सातत्य त्यात असलंच पाहिजे अशी अट या काव्यप्रकारात नाही. किंबहुना अनेकदा ते नसतंच. त्यामुळे ग़ज़लेला एक सलग मूड नसतो. त्यामुळे अर्थाप्रमाणे चाल देणं हे कित्येकदा शक्यही होत नाही. प्रत्येक शेर ही वेगळी कविता आहे इथपर्यंत ठीक आहे; पण प्रत्येक शेर हे स्वतंत्र गाणंही झालं तर पंचाईत व्हायची.
दुसरी गोष्ट अशी की ग़ज़लचा शेर हा द्विपदी असतो. गीतासारखी ५-६ ओळींची चैन यात नाही. जे मांडायचं ते अत्यंत नेमकेपणाने मांडायला लागतं. दुसऱ्या ओळीच्या शेवटापर्यंत गाणं परत मुखड्यावर येण्याची वेळ येते. त्यामुळे ग़ज़लची रचना करण्यासाठी कमी जागेत नेमका संसार करणाऱ्या गृहिणीचं चातुर्य लागतं.
तिसरी आणि शेवटची बाब म्हणजे ग़ज़लचा आत्मा हा थ्रिलरसारखा आहे. एखाद्या थ्रिलरमध्ये जसं वाचकांची अथवा प्रेक्षकांची उत्कंठा वाढवत न्यावी लागते आणि ती शिगेला पोहोचली की रहस्याचा उलगडा करावा लागतो तसाच ग़ज़लमध्ये ‘काफ़िया’चा अर्थात यमकाचा करावा लागतो. थ्रिलर पाहतांना जसा पाहणारा गुन्हेगार कोण असेल असा सतत कयास लावत असतो तसंच इथेही श्रोते काफ़िया काय असेल याचा कयास लावत असतात! त्यामुळे एका चांगल्या रचनेला ही थ्रिलरची क्वॉलिटी असते.
चंद्रशेखर सानेकर या माझ्या मित्राच्या अनेक ग़ज़लांनी मला संगीतकार म्हणून अनेकदा भुरळ घातली आहे. त्याच्या या ग़ज़लमध्ये माझ्यातल्या संगीतकाराला अनेक आव्हानं होती. सानेकरने प्रत्येक शब्दात संगीताच्या इतक्या शक्यता पेरून ठेवल्या आहेत की संगीताच्या अनेक ‘व्हॅन्टेज पॉइंट्स’वरून या शब्दांकडे पाहता येतं.
तुझ्या डोळ्यांमध्ये गहिऱ्या असा मी हिंडतो आहे
जणू त्या सागराचे मी किनारे शोधतो आहे
या मतल्यात (ग़ज़लच्या पहिल्या शेरात) ‘गहिरे डोळे’ ही संज्ञा आली आहे. डोळ्यातलं गहिरेपण अनेक प्रकारचं असू शकतं. रंगामुळे आलेलं एक गहिरेपणा आहेच. पण डोळ्यात कारुण्य असेल तर या गहिरेपणाला एक काळाचं परिमाण लाभतं.
या ग़ज़लमध्ये मी प्रयत्न असा केला आहे की वेगवेगळ्या शब्दांच्या छटा रंगवत जायच्या आणि समग्र डिझाइन जे आपसूक होतंय ते होऊ द्यायचं. म्हणजे कॅलिडोस्कोपमध्ये जसे वेगवेगळे तुकडे टाकले असतात आणि त्यातून काय डिझाइन्स होतात ती कॅलिडोस्कोपलाच आपण ठरवू देतो साधारण तसा प्रयोग आपण संगीताच्या तुकड्यांना घेऊन करायचा.
कळेना मी कुणासाठी मला उमलू दिले नाही
कुणाच्या भोवती माझा ऋतु रेंगाळतो आहे
या शेरामध्ये ‘उमलू’, ‘भोवती’ आणि ‘रेंगाळती’ या शब्दांना संगीताचा अन्वय दिला; आणि संपूर्ण शेराचा अर्थ आपोआप प्रकट होऊ दिला.
या चालीत उपज करायलाही भरपूर जागा आहे असं मला वाटतं. वेगवेगळे गायक ही ग़ज़ल वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळे अन्वयार्थ लावत सादर करू शकतात.
यातल्या तिसऱ्या शेरात ‘टाळतो’ असा शब्द आहे. तिथे मी हा शब्द बीट सोडून गायलोय. नेमका क्षण टाळण्याचं ते प्रतीक आहे!
ही ग़ज़ल म्हणजे एक अनेक जुन्या कापडांची एक गोधडी आहे, जिथे प्रत्येक कापडाची एक कथा आहे! काळाच्या वेगवेगळ्या तुकड्यांना एकत्र शिवलं की आठवणींची ऊब मिळतेच!
© कौशल इनामदार
1 Comment
वा क्या बात है!
ऐकलेली आहे ही ग़ज़ल तुझ्याकडून. आठवत नाही कुण्या मुलाखतीत की एखाद्या ‘लाईव्ह’ मध्ये. उत्तम चाल बांधली आहेस. ‘टाळतो’ ला घेतलेला अवकाश समर्पक वाटला.
ग़ज़ल हा खरोखरच कठीण प्रकारआहे. महाविद्यालयीन दिवसांत ग़ज़ल आयुष्यात आली तेव्हां एखादी ग़ज़ल ऐकतांना खूप आवडायची(मी जगजित सिंह यांच्या गायकीच्या प्रेमात होतो आणि आहे). पण गुणगुणायला जावं तर चालच आठवायची नाही किंवा एका ग़ज़लेला दुसरीचीच चाल तोंडी यायची.
गाण्यासारखी मुक्त स्वरांची उधळण यात नसते तरीही एवढा परिणाम कसा साधते ह्याचंच मला नवल वाटायचं.
शेर फारच मस्त आहेत सानेकरांचे. आणखी काही शेर आहेत का ह्या ग़ज़लेचे?