लता मंगेशकर हा विषय लेखाचा नाही, गाथेचा आहे.
मी नुकता चाली द्यायला लागलो होतो तेव्हा माझ्या दैनंदिनीमध्ये मी एक नोंद करून ठेवली होती –
“एक नवोदित कलाकार नक्कल करतो, एक उत्तम कलाकार स्वतःची शैली निर्माण करतो पण एक अलौकिक कलाकार शैली सोडतो!”
खरं तर ज्या वयात हे वाक्य लिहिलं, त्या वयात ते समजण्याची कुवत नव्हती आणि मी स्वतः पहिल्याच पायरीवर होतो. कुणाचं काहीही चांगलं ऐकलं की ते माझ्या चालींमध्ये उतरायचं. त्यामुळे स्वतःची शैली तयार होण्यापासून मी कोसो मैल दूर होतो. पण तरीही मी हे लिहिलं कारण मी लता मंगेशकर यांचं गाणं ऐकलं होतं!
लता मंगेशकरांनी शैली सोडली म्हणजे नेमकं काय केलं हे मी पुढे सांगेनच पण आधी मला लताबाईंच्या एक्याण्णव्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देऊन एक रसिक या नात्याने ऋण व्यक्त करायचं आहे. शांताबाई शेळके यांनी लिहिलं आहे आणि लताबाईंनीच हे गीत गायलं आहे –
“सूर येती, विरून जाती… कंपने वाऱ्यावरी..”
परंतु एरवी वाऱ्यावर विरून जाणारे हे सूर आमच्यात मात्र भिनले आणि कायमस्वरूपी आमच्या डीएनएत सामावून गेले कारण ते सूर लता मंगेशकरांचे आहेत. परीसाने लोखंडाचं सोनं व्हावं त्याप्रमाणे लताबाईंच्या गाण्याने श्रोत्यांचे ‘रसिक’ झाले. त्यांच्या सुरेलपणाने श्रोत्यांचा ‘म्युझिकल कोशंट’ वाढवला. आणि सहज सवंगतेकडे वळू शकणारं चित्रपटसंगीत लताबाईंच्या सुरांच्या संस्काराने अभिजात झालं.
रसिक म्हणून लताबाईंच्या गाण्याने आपण दिपून जातो, भारावून जातो. दिव्यत्व काही ‘ॲनलाइज’ करण्याची गोष्ट नाही, अनुभूती घेण्याची बाब आहे. पण एका संगीतकाराच्या भिंगातून त्यांच्याकडे बघितलं तर लता मंगेशकर संगीताचं एक विश्वविद्यालय आहेत. त्यांच्या काळातल्या संगीतकारांनी लताबाईंच्या आवाजाचा कसा उपयोग केला? पार्श्वगायनाचं तंत्र त्यांनी कसं परफेक्शनला नेलं? तीन मिनिटांच्या गाण्यात आयुष्य ढवळून टाकणारी अनुभूती कशी निर्माण केली? हे आणि असे अनेक प्रश्न माझ्या मनाचा ठाव घेतात.
एका लेखात काही लताबाईंच्या संपूर्ण कारकीर्दीचा वेध घेता येणार नाही, पण त्यांच्या सर्जनशीलतेचं गमक नेमकं कुठे दडलं आहे असा विचार करता येऊ शकतो.
एक प्रसिद्ध असा किस्सा आहे. बडे गुलाम अलि खाँसाहेब एकदा रेडिओ लावून बसले होते आणि लता मंगेशकरांचं गाणं लागलं होतं. गाणं ऐकून खाँसाहेब बेचैन झाले आणि म्हणाले – “कम्बख़्त बेसुरी नहीं होती!”
लताबाईंच्या गाण्याचं एका शब्दात वर्णन करायचं झालं तर ‘सूर’ हाच तो शब्द आहे. निर्मळ, निर्दोष, निखालस सूर हाच लताबाईंच्या गाण्याचा प्राण आहे. आता कुणी म्हणू शकतं यात नवीन ते काय? प्रत्येकाच्याच गाण्याचा प्राण सूर नाही का? किंबहुना गाण्याचाच प्राण सूर नाही का? तर याला उत्तर असं आहे की इतर गायक सुरांइतकाच इतर काही गोष्टींवरही भर देतात. उदाहरणार्थ – भाव किंवा एक्स्प्रेशन देणं. लताबाईंच्या आवाजात भाव नाही असं कुणीही म्हणणार नाही तरी एक्स्प्रेशन ही ‘देण्याची’ गोष्ट नसून ‘असण्याची’ गोष्ट आहे हे त्यांच्या गाण्यातून जाणवतं. इतर उत्तम गायकांच्या आवाजात सूर आणि भाव समांतर चालले असतात, पण लता मंगेशकरांच्या गाण्यात सूर हेच भाव आहेत. त्यात द्वैत नाही. जेव्हा सूर अचूक लागतो तेव्हा भाव पोहचवण्याकरता इतर कुठलंही माध्यम लागत नाही यावर लताबाईंची श्रद्धा असावी. मग ‘नीज माझ्या नंदलाला’ गाताना ‘पाखरांचा गलबलाही बंद झाला रे’मधल्या ‘रे’ वर त्या समेवर येतात तेव्हा निव्वळ त्या षड्जाच्या शुद्धतेमुळे आपल्याला नीरव शांततेचा भास होतो. स्वर आणि भावाचं अद्वैत म्हणजे लता मंगेशकरांचं गाणं!
लता मंगेशकरांच्या गाण्याची आणखी एक खासीयत म्हणजे त्यांचा आवाज. त्या ज्या काळात गाऊ लागल्या, तेव्हा त्यांचा आवाज त्यांचं बलस्थान न ठरता त्याकडे दोष म्हणूनच पाहिलं गेलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आवाजाचं ‘प्रोजेक्शन’ याला असाधारण महत्त्व असल्याच्या काळात लताबाई संगीताच्या क्षितिजावर अवतरल्या. गाताना सोडा पण बोलतानाही कमालीचा मृदु आणि सौम्य असणारा लताबाईंचा आवाज ‘माइक्रोफोन’ नावाच्या यंत्राने आपलासा केला आणि त्यांच्या आवाजातलं खरं सौष्ठव उलगडून दाखवलं. त्यांच्या आवाजाला ‘पिकोलो व्हॉइस’ (पिकोलो ही एक उंच पट्टीत वाजणारी बासरी असते) का म्हणतात हे जाणून घ्यायचं असेल तर आर.डी. बर्मन यांचं संगीत दिग्दर्शन लाभलेलं मुकेश आणि लताबाईंनी गायलेलं, ‘फिर कब मिलोगी’ या चित्रपटातलं ‘कहीं करती होगी वो मेरा इंतज़ार’ या गाण्यातला लताबाईंचा आलाप ऐका, किंवा ‘हाफ टिकट’ या चित्रपटातलं सलील चौधरींच्या संगीत दिग्दर्शनाखाली किशोर कुमारबरोबर गायलेलं ‘वो इक निगाह क्या मिली’ या गाण्याच्या अंतऱ्यांमधल्या संगीताच्या तुकड्यांमधले लताबाईंचे आलाप ऐका. हा मानवी आवाज आहे की उंच पट्टीतली बासरी वाजतेय असा भ्रम आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही. बहुतेक गायिका काळी-४ काळी-५ मध्ये गात असताना लताबाईंचा उंच पट्टीतला आवाज हा चित्रपटगीतांना सर्वार्थाने सुयोग्य ठरला कारण पुरुष गायकांबरोबर त्यांची पट्टी जुळायची.
लताबाईंचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भाषेवरची त्यांची पकड आणि साहित्याबद्दल त्यांच्या मनात असलेली आस्था आणि समज.
लताबाईंनी जशी चित्रपटगीतं गायली तशीच चित्रपटेतर गाणीही गायली. यात भावगीतं आहेत, अभंग आहेत, गझला आहेत, अगदी कोळीगीतंही आहेत. मला त्यांच्या चित्रपटेतर गाण्यांबद्दल एक प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे या गीतांनाही लताबाईंनी एक चित्रमयता बहाल केली! ‘श्रावणात घन निळा’ असो किंवा ‘मेंदीच्या पानावर’ असो, या गाण्यांचे म्युझिक व्हिडिओ हे श्रोत्यांच्या मनात तयार व्हायचे!
लताबाईंचे हिंदी, उर्दू उच्चार हे त्यांच्या मातृभाषेइतकेच सहज आणि स्वाभाविक आहेत. चित्रपटाच्या निमित्ताने काही उत्तम काव्य लताबाईंच्या आवाजात बहरलं पण सामान्य गीतांनाही दिव्यत्वाचा स्पर्श लाभला आणि त्या गाण्यांचं आयुष्य वाढलं. मीराबाई, कबीर, सूरदास, ग़ालिब यांचं काव्यही आपल्यापर्यंत त्याच्या संपूर्ण सौंदर्यासहित पोहोचलं ते लताबाईंच्या समृद्ध अशा साहित्याच्या अभिरुचीमुळेच!
मराठीत वसंत प्रभु, श्रीनिवास खळे, हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवापासून तुकारामाच्या गाथेपर्यंत आणि बालकवींपासून सुरेश भटांपर्यंतचं अभिजात काव्य आपल्या घराघरात पोहोचलं.
Picture of Dorian Gray या आपल्या कादंबरीच्या प्रस्तावनेत ऑस्कर वाइल्ड कलेबद्दल एक अत्यंत महत्त्वाचं विधान करतो. तो म्हणतो,
“To reveal art and conceal the artist. That is art’s aim.”
हे वाक्य वाचायला जितकं सोपं वाटतं तितकं आचरणात आणणं सोपं नाही. कला प्रकट व्हायला हवी आणि कलाकार अदृश्य रहायला हवा – ही गोष्ट सहजासहजी साध्य नाही. याला तपस्या लागते. पण लता मंगेशकरांनी ही असाध्य वाटणारी गोष्ट साध्य करून दाखवली.
किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्यासारखे निष्णात पार्श्वगायक नायक अथवा नायिकेला नजरेसमोर ठेवून आपल्या गाण्याच्या शैलीत बदल करीत असत. आपल्या डोळ्यासमोर चित्रही असावं लागत नाही आणि तरीही आपण सांगू शकतो की अमुक अमुक गीत किशोर कुमार यांनी राजेश खन्नासाठी गायलं असेल का देव आनंदसाठी का अमिताभ बच्चनसाठी! आशा भोसले मधुबालासाठी गाताना एक ठेवणीतला आवाज लावायच्या. लताबाईंनी कधीच आपल्या गाण्यात बदल केला नाही तरी त्यांच्या एखाद्या गाण्यावर कुठल्याही नायिकेचा चेहरा डोळ्यासमोर आणा तो त्या नायिकेचाच आवाज वाटतो! पात्र दिसतं, कला दिसते, पण कलाकार नाही! कारण लताबाई शैली सोडून देतात आणि त्यांच्या शुभ्र साडीप्रमाणेच एक शुभ्र, विशाल सर्वव्यापकता नेसतात! यशोदेने कृष्णाच्या उघड्या तोंडात अनुभवलेलं विश्वरूप दर्शन आपल्याला लताबाईंच्या षड्जातच अनुभवता येतं. त्यांचा गंधार हाच ओंकार आणि त्यांचा पंचम हेच पसायदान आहे!
काही दिवसापूर्वी मी असंच मजेत एक स्फुट लिहिलं होतं. त्यात वेगवेगळ्या गायकांच्या आवाजाची तुलना वेगवेगळ्या पेयांशी केली होती. ती तुलना करताना खूप गंमत वाटली पण लताबाईंचा विचार केला तेव्हा मनात आलं – लताबाई या पाणी आहेत. नितळ, पारदर्शक, स्वच्छ, शुद्ध! तहान लागली तर ती इतर कुठल्याही पेयाने भागत नाही. प्राण वाचवू शकणारं हे एकमेव पेय!
आपल्या सुदैवाने लताबाईंचं गाणं म्हणजे एक अव्याहत वाहणारा चांदण्याचा झरा आहे. म्हणूनच ग्रेसांचे शब्द थोडे बदलण्याचा प्रमाद करून लता मंगेशकरांच्या गाण्याबद्दल म्हणावंसं वाटतं – हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्वरांचे!
© कौशल इनामदार २०२०
छायाचित्र सौजन्य – फिल्मफेअर
15 Comments
एक्स्प्रेशन ही ‘देण्याची’ गोष्ट नसून ‘असण्याची’ गोष्ट आहे. हे वाक्य 1000% पटलं.
संगीतातले बरेच बारकावे कळाले.
अतिशय सुंदर लेख. अतिशय सोपी भाषा तरीही प्रभावी.
धन्यवाद श्रीनिवासजी!
लतादिदींवरचा लेख खूपच छान 👍👌🙏❤️🌈🌈🌈
अप्रतिम!! लतादीदी किती उंच आहेत हे सांगणारा एक सुंदर लेख…
लतादीदींचा आवाज जसा ‘नितळ पाणी’ तसाच कौशल तुझा लेख ‘ पारदर्शी ‘.
धन्यवाद संपदा! किती मस्त दाद दिलीस!
अप्रतिम.अतिशय अभ्यासपूर्ण लेख. सर्वांनी आवर्जून वाचावा आणि यातून काही तरी शिकावे ..असा लेख.
साधारण तीन वेळा हा लेख वाचला. खूपदा काय होतं, शब्दांनी फार भारावून जायला होतं.. इतकं की आपल्याला काय वाटलं ते वाचून ने सांगताच येत नाही नक्की.. या लेखात तुम्ही जे लिहीलं आहे नं.. एक्स्प्रेशन ही ‘देण्याची’ गोष्ट नसून ‘असण्याची’ गोष्ट आहे किंवा
हे जे वाटणं आहे नं.. ते तुम्ही शब्दात कमाल पकडलं आहे.. नेमक्या भावना असं शब्दात गोठवणं.. हे तुमच्या लेखणीकडून थोडं फार तरी कधी मला शिकता यायला हवं असं वाटून गेलं हे वाचतांना…
ऑस्कर वाईल्डचं ते वाक्य… कोरून ठेवावं असं आहे..यायला हवं ते सुद्धा.. पाणी होता येणं.. किती अवघड काम आहे नाही.. लाजवाब लिहीलं आहे तुम्ही.. लताबाईचं गाणं न ऐकता, तुमच्या लेखणीतून त्यांचं गाणं पोहोचलं आणि मन शांत झालं आहे आता..
कम्बख़्त बेसुरी नहीं होती – अश्याच आशयाचं वाक्य भारतरत्न बिस्मिल्ला खान ह्यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं – NDTV च्या – आहे ती youtube वर
फार सुंदर … लता मंगेशकर हे व्यक्तिमत्व शब्दात उभं करणं खरोखर कठीण काम आहे पण आपण ही गोष्ट ‘कौशल्याने’करून दाखवली आहे ‘कौशल’जी…
धन्यवाद संतोषजी!
khupach sunder,””सहज सवंगतेकडे वळू शकणारं चित्रपटसंगीत लताबाईंच्या सुरांच्या संस्काराने अभिजात झालं.”agdi kharay
धन्यवाद किरणकुमारजी!