नवे गीत गाऊ – छंद ओठांतले – भाग १९

Nave Geet Gau

मला वाटते गं नवा जन्म घेऊ
नवे श्वास गुंफू, नवे गीत गाऊ

अशी वाहते मी स्वरांच्या प्रवाही
मिळो तीर किंवा तळी खोल जाऊ

किनारे बुडाले जळी आज दोन्ही
मुक्या आठवांचा कसा भार वाहू

जुना गाव राही कुठे दूर मागे
नव्या पावलांना नवा मार्ग देऊ

नवे चित्र साकारुनी ये समोरी
उभी स्वागता मी उभारून बाहू

चैत्राची चाहूल लागते आणि मन नवीन होऊन जातं. मला प्रत्येक नवीन वर्षाची ही गंमत वाटते. खरं तर काय असं बदलत असतं? तरीही एक नवं चैतन्य, नवा उत्साह दाटून येतो. नवीन होत राहाणं ही एक आंतरिक गरज असते. नवे संकल्प, नव्या आशा, नवी उमेद!

संपूर्ण विश्वाच्या संदर्भात क्षणांच्या अविरत साखळीत या नवीन क्षणांना कदाचित काहीच स्थान नसेल; पण आपल्या मनात मात्र दर वेळी एका नव्या पर्वाची सुरुवात होत असते. आणि हेच नवीन होत राहाणं आपल्या मनाची उमेद वाढवत राहातं.

मी पाहिलेली अनेक यशस्वी माणसं रोजच आपल्या आयुष्यात हे नाविन्य निर्माण करत राहतात. कदाचित म्हणूनच ती यशस्वी असतात. प्रत्येक दिवस हे एक नवीन पर्व आहे असं समजून आपण चालावं ही जगातल्या अनेक गुरूंची, धर्मगुरूंची, आणि तत्त्वज्ञांची शिकवण आहे. ख्रिस्ती लोकांची प्रार्थना म्हणते – “God, give us our daily bread!” प्रार्थनेमध्येही ‘रोजचीच’ पोळी देवाकडे मागितली आहे. महिन्याचा किंवा वर्षाचा साठा नाही! गौतम बुद्धाने सांगितलं आहे की मेणबत्तीची ज्योत एकच असली तरी ती  प्रत्येक क्षणी नवीन असते. हेरॅक्लिटस म्हणाला की आपण नदीच्या त्याच पाण्यात दोनदा पाय ठेवत नाही! नविन्याचा हा उत्सव साजरा जगभरातच केला जातो. कुणी गुढीपाडव्याला करतो, कुणी १ जानेवारीला, तर कुणी पतेतीला आणि कुणी चक्क १ एप्रिललासुद्धा! पण या नाविन्याची ओढ लोकांना असते म्हणूनच आपलं आयुष्य रोज सुखद आणि समृद्ध होत जातं. कवी नवीन कविता करतात, संगीतकार नव्या चाली त्या कवितांना देतात, नवीन शोध लागत राहतात आणि क्षणांच्या अविरत साखळीतला प्रत्येक क्षण नव्या तेजाने उजळून निघतो.

१९९६ सालच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी शांताबाई शेळके यांची निवड झाली. समस्त मराठी लोकांसाठी हा आनंदाचा क्षण होता आणि मराठी रसिकांनी या घटनेचं स्वागत केलं. अशातच मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघाच्या वसंतराव (दादा) केतकरांचा मला फोन आला. ते मला म्हणाले की महाराष्ट्र सेवा संघातर्फे शांताबाईंचा एक आगळा सत्कार करण्याचं त्यांच्या मनात आहे. या सत्कार समारंभासाठी शांताबाईंच्या कवितांना नव्याने स्वरबद्ध करावं आणि अशा नवीन गाण्यांचा कार्यक्रम करावा असं त्यांनी मला सुचवलं. ही जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवणं ही माझ्यासाठी फार महत्त्वाची पावती होती कारण संगीतकार म्हणून मी अगदीच नवखा होतो. मी त्वरित माझा होकार कळवला.

शांताबाईंच्या काही कविता मी स्वरबद्ध केल्याच होत्या; पण आता या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या आणखी काही कविता संगीतात गुंफायचा योग आला. मी चाली केल्या आणि मी, माझे मित्र कंबर कसून कार्यक्रम बसवायच्या तयारीला लागलो.

कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी सकाळी मला दादा केतकरांचा फोन आला.

ते म्हणाले, “शांताबाई पुण्याहून खास या कार्यक्रमासाठी मुंबईत आलेल्या आहेत. दादरला यशोदाबाई भागवतांच्या घरी त्यांचं वास्तव्य आहे. मी त्यांना सत्काराची कल्पना ऐकवल्यावर त्यांनी तुला भेटायची इच्छा माझ्याकडे बोलून दाखवली. आज संध्याकाळी त्यांनी आपल्याला भेटायला बोलावलं आहे. संध्याकाळी ६ वा मला दादर स्टेशनच्या बाहेर भेट.”

शांताबाईंना भेटण्याच्या विचाराने मी हरखूनही गेलो होतो आणि मला दडपणही आलं होतं. संध्याकाळी मी दादांना दादर स्टेशनच्या बाहेर भेटलो. आम्ही दादर स्टेशनला लागून असलेल्या यशोदाबाई भागवतांच्या घरी गेलो. आमच्यासाठी दार उघडल्यानंतर आम्हाला आतल्या एका खोलीत नेण्यात आलं. तिथे शांताबाई होत्या. त्यांना पाहिलं आणि मला जे काही दडपण जाणवत होतं ते क्षणात ओसरलं. आपल्याच एखाद्या आजीला भेटावं असा शांताबाईंचा सगळा वावर होता आणि त्यांनी मला एक क्षणभरही ते दडपण जाणवू दिलं नाही. यात माझ्या आत्मविश्वासापेक्षा त्यांचाच मोठेपणा जास्त होता.

शांताबाईंनी आपुलकीने माझी चौकशी केली आणि नंतर विषय दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाकडे वळला.

शांताबाईंनी मला विचारलं, “कुठल्या कविता घेतल्या आहेस तू माझ्या?”

मी एक-एक करून सगळ्या कवितांची यादी त्यांना सांगितली. त्यावर त्या म्हणाल्या –

“‘कळ्यांचे दिवस फुलांच्या राती’ या संग्रहातच एक कविता आहे जी मला फार आवडते – ‘मला वाटते गं नवा जन्म घेऊ’ – ती घेतली आहेस का तू?”

मी जरा ओशाळूनच नकारार्थी मान हलवली.

“काही हरकत नाही! मी आपलं सहज विचारलं! तू जी गाणी केली आहेस ती ऐकण्याची उत्सुकता आहेच मला.” माझ्या मनावर दडपण आलंय हे पाहून पुन्हा एकदा शांताबाईंनी मला आश्वस्त केलं.

आम्ही तिथून निघालो; पण रस्ताभर शांताबाईंचे तेच शब्द माझ्या मनात घुमत राहिले.

“तू ‘मला वाटते गं नवा जन्म घेऊ’ ही कविता घेतली आहेस का? ती माझी आवडती कविता आहे.”

कार्यक्रम एक दिवसावरच ठाकला होता; पण माझ्या मनात आलं की या कवितेला आपण चाल दिली आणि दुसऱ्या दिवशी खरोखर कार्यक्रमात घेतली तर शांताबाईंना सुखद अशी भेट असेल.

त्या काळात मी दादरला राहत असे. आमच्या घराजवळ मिळणारा अशोकचा वडापाव हा या जगातला सर्वोत्कृष्ट वडापाव म्हणून प्रसिद्ध आहे. तिथे एक वडापाव खावा आणि जरा या कवितेच्या बाबतीत शांतपणे विचार करावा असं मनात आलं. अशोकच्या दुकानात तेव्हा कायम एक रेडिओ लावलेला असे. त्यावर गाणं सुरू होतं –

‘सूरज की गर्मी से जलते हुए तन को मिल जाए तरुवर की छाया
ऐसा ही सुख मेरे मन को मिला है मैं जब से शरण तेरी आया - मेरे राम!’

शर्मा बंधूंचं हे गीत चांगलंच लोकप्रिय होतं आणि मी ते गुणगुणतच घराच्या वाटेला लागलो! आश्चर्य म्हणजे त्या गीतातून कधी माझ्या ओठांवर – ‘मला वाटते गं नवा जन्म घेऊ’ हे शब्द आले हे माझं मलाच कळलं नाही. घराचे दोन मजले चढेपर्यंत माझी या कवितेच्या पहिल्या ओळीला चाल लागली होती!

घरी पोहोचताच पुस्तकाच्या कपाटातून शांताबाईंचा ‘कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती’ हा संग्रह काढला आणि ही कविता ज्या पानावर होती ते पान काढलं. पुढची रचना अवघ्या दहा मिनिटांत झाली. तेव्हा माझ्या ध्यानातही आलं नाही; परंतु एकूण रचनेवर ‘सूरज की गर्मी से’ या गाण्याची पुसटशी का होईना पण छाया होती.

मी तत्क्षणी भाग्यश्री मुळे या माझ्या मैत्रिणीला फोन लावला आणि म्हटलं की उद्याच्या कार्यक्रमासाठी एक नवीन गाणं केलं आहे. क्षणाचाही विलंब न लावता भाग्यश्री म्हणाली, “मी आत्ता तुझ्या घरी येते; मला चाल शिकव!”

भाग्यश्रीला चाल सांगितली आणि दुसऱ्या दिवशी तिने तयारीने ते गीत शांताबाईंसमोर सादरही केलं. त्यांच्या भाषणात शांताबाईंनी फार मायेने या गाण्याचा उल्लेख केला. गंमत म्हणजे या गाण्याची जन्मकथा सांगताना त्यांनी सांगितलं की याच कवितेला किशोरीताई आमोणकरांनी एका नाटकासाठी चाल दिली होती. शांताबाईंची ही प्रतिक्रिया खाली दिलेली आहे.

चाल देताना संगीतकार नेमकं काय करत असतो तर तो गीतातल्या शब्दांना संदर्भ देत असतो. कवयित्री जेव्हा म्हणते ‘मला वाटते गं नवा जन्म घेऊ’ तेव्हा या विधानाकडे अनेकविध दृष्टिकोनांतून पाहता येतं. हे विधान केवळ उत्सवी आहे की नव्या जन्माच्या आधीच्या जुन्या जन्मात काही वैगुण्य आहे? नव्या जन्माची अपरिहार्यता नेमकी कशासाठी आहे? आणि पुढच्या एका कडव्यात तसा सुगावा आहे देखील –

जुना गाव राही कुठे दूर मागे
नव्या पावलांना नवा मार्ग देऊ

ह्या जुन्या गावात असं नेमकं काय घडलं की तो गाव सोडावा लागला? एखाद्या गाण्याला चाल देणं म्हणजे ह्या संदर्भांच्या शक्यतांची कवाडं उघडून देणं! नको त्या इतिहासाकडून हव्या त्या वर्तमानाकडे जाताना भविष्यावर या प्रवासाची छाया पडते का? ती छाया सुरांतून दाखवणं म्हणजेच चाल देणं होय!

आता हा सगळा इतका तपशीलवार विचार, इतक्या तर्कशुद्ध पद्धतीने, संगीतकार चाल देण्याच्या क्षणी करत असतो का? तर याचं उत्तर ‘नाही’ असंच आहे. चाल देणं म्हणजे एक उत्स्फूर्त, भावनिक हुंकार आहे; परंतु जसं मर्ढेकर म्हणतात – “भावनेला येऊ दे गा शास्त्रकाट्याची कसोटी” तसंच या भावनिक हुंकाराला तर्काच्या कसोटीवर खरं उतरावं लागतं. म्हणूनच “मला वाटते गं नवा जन्म घेऊ” हे एक ‘लोडेड’ विधान आहे असं मानलं तर चाल करताना ह्याचा विचार व्हायला हवा.

या गाण्याच्या निमित्ताने आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. हे गीत एका स्त्रीच्या दृष्टिकोनातून लिहिलेलं आहे. कुमार गंधर्व म्हणायचे, की “शोभा गुर्टू ठुमरी गाताना स्वतःच ठुमरी व्हायच्या.” चाल देताना संगीतकाराला स्त्री होता आलं पाहिजे. म्हणजे नेमकं त्यासाठी काय करायला हवं हे शब्दात मांडणं फार कठीण आहे परंतु इतकंच सांगेन की हे गीत पुरुषाचं असतं तर चाल वेगळी झाली असती. इथे वरवरचा फरक अपेक्षित नाही की गाणं बाईच्या आवाजात गावं किंवा स्त्रैण लकबी वापरून शब्दांचे उच्चार करावे. गाण्याचा अक्ष बदलायला हवा. नुसता ‘प्रोग्रॅम’ ‘ट्वीक’ करून उपयोग नाही तर त्या काळापुरती तुमची ‘ऑपरेटिंग सिस्टम’ बदलली पाहिजे. हा वर्णनाचा प्रांत नसून अनुभूतीचा प्रांत आहे!

१९९६ साली आम्ही शांताबाईंच्या गाण्यांची एक ध्वनिमुद्रिका प्रकाशित केली – ‘शुभ्र कळ्या मूठभर’ याच नावाने. त्यात हे गीत सुप्रसिद्ध गायिका शोभा जोशी यांनी गायलं. या गाण्याचा दुवाही खाली दिला आहे. हे माझं पहिलंच ध्वनिमुद्रण होतं हे रसिक श्रोत्यांनी ध्यानात ठेवावं आणि यातल्या नवखेपणाकडे मोठ्या मनाने दुर्लक्ष करावं!

माझ्या सुरुवातीच्या सगळ्याच गाण्यांप्रमाणे या गाण्याचं संगीत संयोजनही कमलेश भडकमकरने केलं आहे. कमलेशचं संगीत संयोजन माझ्याच गाण्यांपासून सुरू झालं असं म्हटलं तरी हरकत नाही. कमलेशने संगीतसंयोजन अतिशय संयत केलेलं आहे. शांताबाईंच्या लिखाणाचा साधेपणा पण थेटपणा त्याने वाद्यमेळातून इतक्या प्रभावीपणे मांडला आहे की शब्द, चाल आणि संगीत संयोजन या तिन्ही गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या काढताच येत नाहीत. यात तबला आणि तालवाद्य अनुपम घटकने, व्हायोलिन हेमंत पंडित यांनी तर सतार सुप्रसिद्ध सतारवादक अरविंद मयेकर यांनी वाजवली आहे.

हे गाणं जितकं आशेचं आहे तितकंच ते निर्धाराचं आहे. तो निर्धार एका सक्षम स्त्रीचा आहे. यातली शक्ती सुप्त आणि आंतरिक आहे, उघड आणि बटबटीत नाही. थोडक्यात काय, तर मला शांताबाईच या गाण्यातून दिसत राहतात!

© कौशल इनामदार, २०२१

टीपया वेळच व्हिडिओ लाइव्ह केल्यामुळे त्याची कालमर्यादा जास्त आहे. तरी नक्की पाहून प्रतिक्रिया द्या.

5 Comments

  1. Narendra Pathak says:

    प्रिय कौशल,
    वसंत ऋतूच्या प्रारंभी तू खूप छान भेट दिली , शुभ्र कळ्या मूठभर ही तुझी पहीली ध्वनिफीत आहे अ तू म्हणतो, पण तसे अजिबात वाटत नाही, ऐकताना जाणवतही नाही.
    शांताबाईंनी दिलेली शाबासकी ही तुझ्या आयुष्याची एक मोठी पुंजीच आहे.तुझ बोलणं आणि लिहिणं हे एक प्रकारचे ललित लेखना असते. त्या मुळे ते मनाला भावते आणि लगेच समजते . शुभेच्छा

    • ksinamdar says:

      धन्यवाद सर! आपल्याकडून दाद मिळाली आनंद झाला!

  2. वर्षा तोडमल says:

    शब्द ,चाल,संगीत संयोजन तिन्ही गोष्टी …..वा!
    खूप आनंद देऊन गेल्या.

  3. Sagar says:

    फारच सुरेल चाल आहे! शांताबाईंचा आशीर्वादच मिळाला म्हणायचं!

What do you think?