दर वर्षी या दिवशी मला पुलंची ही भेट आठवते. चांगलं दोन अडीच तास पुलंच्या सहवासात घालवलेला हा वेळ मला आयुष्यभर पुरेल!
‘कवितेला चाली देऊन त्यांचा कार्यक्रम का करावासा वाटला?’ या त्यांच्या प्रश्नाला माझ्यातल्या नवख्या, अतिउत्साही आणि त्यांच्या कौतुकाने हुरळून गेलेल्या संगीतकाराने – “मला काहीतरी वेगळं करायचं होतं” असं त्या वेळी भारी वाटणारं पण अतिसामान्य असं उत्तर दिलं तेव्हा त्यांनी अतिशय प्रेमाने खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले – “तू चांगलं कर. वेगळं आपोआप होईल.” हा मंत्र मी आयुष्यात विसरलो नाही.
याच भेटीत त्यांनी ‘बाई या पावसानं’ या अनिलांच्या कवितेला मी दिलेली चाल ऐकून भरभरून दाद दिली. मला माहीत होतं की याच कवितेला त्यांचीही चाल आहे. मी हिम्मत करून विचारलं – “तुम्हाला कुठली चाल जास्त आवडली?”
क्षणभर ते शांत होते, मग पुलंच्या डोळ्यांत एक मिस्किल चमक आली आणि ते म्हणाले – “माझी!”
आम्ही सगळेच यावर मनमुराद हसलो.
पुढच्याच वर्षी दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे पुलंच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या साहित्यावर आणि संगीतावर आधारित पुलोत्सव करायचं ठरलं. नाटककार सुरेश खरे यांनी पुलंच्या गाण्यांवर आधारित कार्यक्रमाची जबाबदारी माझ्यावर सोपवली. पण जेव्हा ते पुण्याला पुलं आणि सुनिताबाईंना कार्यक्रमाची माहिती द्यायला गेले तेव्हा सुनिताबाईंनी त्यांना सुचवलं की पुलंची नेहमीची गाणी घेण्यापेक्षा रेडिओसाठी मंगेश पाडगांवकरांनी लिहिलेली आणि पुलंनी संगीत दिलेली ‘बिल्हण’ ही संगीतिका सादर करावी.
खरे काकांनी सुनिताबाईंची इच्छा माझ्याजवळ बोलून दाखवली. मी लगेच आव्हान स्वीकारलं! आणि खरोखर ते आव्हानच ठरलं कारण ५०च्या दशकात आकाशवाणीसाठी केलेल्या ‘बिल्हण’ला आता ५० वर्ष होऊन गेली होती आणि त्याचं स्क्रिप्ट कुणाकडेही नव्हतं, अगदी खुद्द पाडगांवकरांकडेही! पाडगांवकरांकडे चौकशी केली असता ते मला म्हणाले – “तुला स्क्रिप्ट मिळालं तर मलाही दे. माझ्याकडे नाहीये!”
लालजी देसाईंकडे मूळ ‘बिल्हण’चं ध्वनिमुद्रण होतं पण त्याची प्रत इतकी सदोष होती की एका स्पीकरमधून फक्त ‘हिस्स’ असा आवाज येत होता. त्यामुळे शब्द नीट कळत नव्हते. चार चार वेळा एक ओळ ऐकायची आणि संदर्भाप्रमाणे शब्द काय असेल असा अंदाज लावायचा, असा सगळा प्रकार सुरू होता. शेवटी आम्ही एकदा ते स्क्रिप्ट लिहून पूर्ण केलं. या सर्व प्रकारात खूप गमतीशीर गोष्टी उलगडल्या. उदा. ‘शब्दावाचून कळले सारे’ हे मूळ ‘बिल्हण’मधलं गाणं जेव्हा पं. जितेंद्र अभिषेकींनी ध्वनिमुद्रित केलं तेव्हा ते-
“आठवते पुनवेच्या रात्री
लक्षदीप विरघळले गात्री”असं गायले. पण मूळ संगीतिकेच्या ध्वनिमुद्रणात (आणि मंगेश पाडगांवकरांच्या पुस्तकात) शब्द आहेत –
“आठवते पुनवेच्या रात्री
लक्षचंद्र विरघळले गात्री!”
मूळ संगीतिका आकाशवाणीत सादर झाल्यानंतर जवळजवळ ५० वर्षांनी आम्ही ती प्रथमच दादर माटुंगाच्या त्या सोहळ्यात सादर केली. लोकांना ती प्रचंड आवडलीसुद्धा!
याच कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आम्ही पुलंना आवडणाऱ्या कवींच्या मी केलेल्या रचना सादर केल्या. अर्थात यात अनिलांचं ‘बाई या पावसानं’ही होतं आणि आम्ही या कवितेच्या दोन्ही चाली सादर केल्या. आधी पुलंची आणि पाठोपाठ माझी.
खरे काकांनी या संपूर्ण कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण पुलं आणि सुनिताबाईंना ऐकवलं.
पुन्हा एकदा ‘बाई या पावसानं’ची माझी चाल जेव्हा पुलंनी ऐकली तेव्हा ते खरेकाकांना म्हणाले – “ही चाल (कौशलची) मी आधी ऐकली असती तर या गीताला मी चाल केलीच नसती!”
हे मी ऐकलं तेव्हा अंगावर रोमांच उभे राहिले. एवढ्या मोठ्या माणसाकडून मिळालेली ही केवढी मोठी दाद!
दोन दिवसांनी मला सुनिताबाईंचा फोन आला आणि त्या म्हणाल्या –
“तू ‘बिल्हण’ केल्याबद्दल – आणि नुसतं केल्याबद्दल नाही तर उत्तम केल्याबद्दल मला आणि भाईला तुला बक्षीस द्यायचं आहे. तू घरी येऊन जा.”
मी पुण्याला गेलो. पुलं आणि सुनिताबाई यांनी अगदी प्रेमाने माझं स्वागत केलं. ‘वटवट वटवट’ या पुलंनी लिहिलेल्या आणि संगीत दिलेल्या दुसऱ्या संगीतिकेची ध्वनिफीत त्यांनी मला भेट दिली.
टेपचं तंत्रज्ञान कालबाह्य होऊन सीडी आली आणि आता तीही कालबाह्य होऊन अनेक वंर्ष लोटली. पण तरीही माझ्या कपाटाच्या एका कप्प्यात ‘वटवट ’ची बरीच घासलेली टेप अजूनही आहे. टेप जुनी असली तरी पुलंच्या या आठवणी अगदी ४के अल्ट्रा एचडी मध्ये ताज्या आहेत आणि दर ८ नोव्हेंबरला माझ्या मनाच्या प्रोजेक्टरवर त्या प्रक्षेपित होतातच होतात.