आज कार्तिक वद्य त्रयोदशी. म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी दिन. त्या निमित्ताने आत्ता संध्याकाळी ६:१५ वा. यूट्यूबला माझ्या वाहिनीवर त्यांची एक विरहिणी! या चालीची एक मजा अशी आहे की ज्या दिवशी ही चाल केली त्याच दिवशी सकाळी सचिन देव बर्मन यांचं ‘ठंडी हवाएँ’ या गीताचा मुखडा घेऊन किती चाली झाल्या यावर एक व्हिडिओ मला कुणीतरी पाठवला होता. त्यात रोशनच्या ‘रहें ना रहें हम’ पासून मदन मोहनच्या ‘यही है तमन्ना’ ते आरडी बर्मनच्या ‘सागर किनारे’ पर्यंत असंख्य गाणी होती. यातली प्रत्येक रचना ही त्याच मुखड्यापासून सुरू होऊनसुद्धा प्रत्येक संगीतकाराचं व्यक्तीमत्त्व त्या त्या संगीतकाराच्या रचनेत उतरलंय. दुसरीकडे संतांची रचना करणं म्हणजे महाकर्मकठीण काम कारण आपला इगो सोडला तरच रचना प्रामाणिक होते असा माझा तरी अनुभव आहे. मग त्याच मुखड्यापासून मी उठलो तर ज्ञानदेव मला कुठली निळाई दाखवतात? हे पहायला ही रचना करायला घेतली आणि ज्ञानदेवांच्या शब्दांच्या हातात आपलं बोट दिलं. जे झालं ते सादर करतोय.