सगळी वाद्य आणि यंत्र लावून होईपर्यंत तोवर संध्याकाळचे ५ वाजले होते आणि उन्हं उतरायला सुरुवात झाली होती. तापस सरांनी लिहिलेली पहिली कविता पाहिली. शब्द होते –
दिवस ओसरत चालला तरी श्रीकृष्ण रुक्मिणीच्या प्रासादात आला नाहीए. रुक्मिणीच्या मनाला एक अनामिक बेचैनी जाणवत आहे. एकांताच्या उंबऱ्याबाहेर कुण्या अनोळखी माणसाची चाहूल लागली तर तो एकांत उरत नाही, एकाकीपणा होतो! संध्याकाळची वेळ आणि रुक्मिणीला जाणवणारी ती उदास असुरक्षितता मला चालीत बांधता येईल? कोहिनूर मिल कंपाउंडमध्येही दिवस कलताना मनाला एक प्रकारची उदासी यायचीच. कोहिनूर मिल कंपाउंडच्या अगदी दारात एक चहावाला असायचा. (अजूनही असेल कदाचित). मी त्याच्याकडून एक चहा घेऊन तिथेच बसलो. पश्चिमेकडे सूर्य कलत गेला तशी क्लांत सूर्यकिरणं समोरच्या झाडांच्या पानांतून झिरपत होती. दिवसभर काम करून कोहिनूर मिल कंपाउंडमध्ये राहणारे थकलेले लोक घराकडे परत येत होते. माझा एक आवडता छंद म्हणजे लोकांच्या मनात आत्ता काय चाललं असेल याचा अंदाज लावत बसायचं. प्रत्येक चेहर्याच्या मागे एक कहाणी तर नक्कीच असते.
एकीकडे गाण्याचे शब्द पुन्हा पुन्हा वाचत होतो. जो प्रश्न येणाऱ्या-जाणाऱ्यांबद्दल माझ्या मनात उमटत होता, तोच प्रश्न रुक्मिणीच्या बाबतीतही उठत होता. काय चाललं असेल रुक्मिणीच्या मनात? तिची घालमेल आपण गाण्यातून कशी दाखवू शकतो? एरवी कृष्णाची आठवण म्हणजे सुखाचा दरवळ, मग आजच त्याची आठवण आल्यानंतर ही बेचैनी का? मला सूफ़ी तबस्सुमचा एक शेर आठवला –
यूँ तिरी याद से जी घबराया
तू मुझे भूल गया हो जैसे!
बस्स! हीच आहे रुक्मिणीच्या मनाची वीण! साधारण पूरिया धनाश्रीच्या सुरांमध्ये एक सुरावट बांधली. पुढच्या पाच मिनिटात धुन तयार झाली. समीरला म्हणून दाखवली. त्यालाही ती आवडली.
या एकांकिकेतली गोष्ट संध्याकाळी सुरू होते आणि पहाटे संपते. पहिली धुन पूरिया धनाश्रीमध्ये बांधल्यानंतर मी ठरवलं की पुढची गाणीही साधारण रागांच्या वेळांवर बांधू. खरं तर एरवी मी असं करत नाही कारण मी रागसंगीत शिकलेलो नाही. आपण एखाद्या नाटक किंवा चित्रपटाचं संगीत करतो, तेव्हा त्या त्या गाण्याचा आकृतिबंध तर महत्त्वाचा असतोच पण त्या नाटकातल्या अथवा चित्रपटातल्या संपूर्ण संगीतालासुद्धा एक आकृतिबंध यावा लागतो.
‘ओसरला दिनमणी’ या गाण्यात शब्दांत चाल निहीत होती. गाण्यातल्या क्रियापदांमध्ये ते दिसून येतं. ‘ओसरला’, ‘फुंकरली’, ‘घणघणला’, ‘अवतरली’ या शब्दांमध्ये तुम्हाला ते आढळेलही. प्रश्न असतो की वातावरण निर्मिती ही केवळ शब्दांमधून नाही तर इतर संकेतातूनही होत असते. उदाहरणार्थ, गाण्याची लय. इथे, ‘क्लांत’ हे विशेषण मला या गीताचा ‘कीवर्ड’ वाटतो. त्या एका शब्दाने या चालीचा मूड ठरवला; या गाण्याची लय ठरवली. एकांकिकेतलं हे सुरुवातीचं गाणं होतं आणि म्हणून महत्त्वाचं गाणं होतं. संपूर्ण एकांकिकेचाच सूर लावून देण्यात या गाण्याची भूमिका महत्त्वाची होती.
‘कशी पाहू तुजकडे?’ यातला प्रश्न चालीतही आलाय आणि म्हणून ‘पुढे काय?’ याची उत्सुकता तयार होते.
ज्या बेचैनीने रुक्मिणीच्या मनाचा ठाव घेतला आहे, ती बेचैनी आधी मी, आणि मग तुम्हीही अनुभवली पाहिजे – हीच या गाण्याची भूमिका!
© कौशल इनामदार