डिस्क्लेमर – हा सल्ला नाही.
संदीप खरेची कविता आवडणं म्हणजे मागासलेपणाचं लक्षण असून त्याला जातीनिहाय लेबल लावणं किंवा महेश काळेच्या गाण्याची टिंगल करणं या गोष्टी मी वाचतो, पाहतो. कलाकार एकदा प्रकाशझोतात आला की त्याला या सगळ्या टीकेला, टिंगलीला आणि अनेकदा हिणकस शेऱ्यांना सामोरं जावंच लागतं. हे occupational hazard आहे. याला उतारा म्हणून रसिकांचं (कधीकधी अतर्क्य आणि प्रमाणाबाहेर) प्रेमही मिळतं. मग टीका करणारे लोक म्हणतात की प्रेम मिळताना आनंद होतो तर मग टीकेचाही स्वीकार हसतमुखाने करता आला पाहिजे. प्रतिवाद म्हणून हे अगदी तर्कनिष्ठ आणि योग्यही आहे. परंतु माणसाचं मन कौतुक आणि टीका तर्काच्या लेन्समधून न पाहता भावनेच्या लेन्समधून पाहात असतं. आणि आपण ज्यांचं कौतुक करतो किंवा ज्याची टीका करतो तो तुमच्यामाझ्यासारखाच तर्काचा चौकोन नसून भावनांचं कडबोळं आहे ही बाब आपण विसरतो.
कौतुक आणि टीका प्रत्येक बऱ्या, चांगल्या कलाकाराच्या वाटेला येतेच.
कलाकार म्हणून मला कौतुक आवडतं. खरंतर अवास्तव कौतुकही कलाकाराला घातकच आहे या मताचा मी आहे.
टीका मला आवडत नाही. (ती आवडून घ्यायचीही नसते. टीकेने तुम्ही uncomfortable होता आणि म्हणूनच त्याबद्दल काही न काही करता.) पण म्हणजे प्रत्येक टीकाकार तुमचा शत्रुच असतो असं नाही. अनेकदा टीकाकार तुमचे सुहृद असतात आणि तुमचं चांगलं चिंतत असतात. पण टीका न आवडण्याचे दोन प्रकार असतात. टीका विधायक असेल तर ती आपण ऐकून घेतो आणि त्यावर काम करतो. अशी टीका मी स्वत:वरही करत असतो. तो माझ्या शिक्षणाचा एक भाग आहे. परंतु हिणकस शेरेबाजीचा मला त्रास व्हायचा. असा एखादा हिणकस शेरा कुणी मारला की ते माझ्या डोक्यात फिरत रहायचं. आता ते बऱ्याच अंशी कमी झालंय. इंटरनेट यायच्या अगोदर या हिणकस टीकेला एक फिल्टर होता. पण आता तो नाहीए.
इंटरनेट आलं आणि जग बदललं. माणूस बदलला. आता कुठलीही टीका पटकन amplify होते. जहरी टीका तर जास्तच.
महेश आणि संदीप हीसुद्धा टीका पचवतील, तिला सामोरे जातील, तिला पूर्णपणे नजरेआड करतील किंवा कदाचित प्रचंड त्रास करून घेऊन आपल्या कोषात जातील. मला त्यांची इतकी चिंता नाही जितकी चिंता मला जहरी टीका करणाऱ्यांची वाटते. तो एक फार मोठा ट्रॅप आहे. या टीकेला positive reinforcement समाजमाध्यमांवर चटकन् मिळते. माणूस एका नकारात्मकतेच्या आणि कडवटपणाच्या गर्तेत कधी जातो त्याचं त्याला कळत नाही.
या कडवटपणाचं ॲडिक्शन होतं. सुरुवातीला मस्त वाटतं. त्याचाही एक कैफ असतो. उपरोध हुशारीच्या शेतातलं पीक आहे. पण ते एक narcotic आहे. त्याचं प्रमाण व्यस्त झालं की उपरोध कटू होतो.
या कडवटपणाला मी शिवून आलोय. ती एक भयंकर, सृजनहीन स्थिती आहे.
तर या सगळ्या परिस्थितीकडे मी कसं पाहायचं? पाहतो?
मला उपरोध आवडतो जसा मला चहा आवडतो. त्यात गंमत आहे आणि प्रमाणात घेतला तर तो तजेलाही आणतो. पण अतिरेक झाला तर त्याचं ॲसिड होतं. मी उपरोधाचा उपयोग व्यक्तींबद्दल जमेल तितका टाळतो. एखादं स्वभाववैशिष्ट्य किंवा विचार, विचारसरणी त्यावर बोलतो. भाषा कायम सभ्य वापरायची हे कटाक्षाने पाळतो. कधीकधी उत्तम खोचक सुचलं तरी सोशल मिडियावर ते लिहायचं टाळतो. वाहवत जायचं नाही असं स्वत:ला बजावत राहतो.
जरा निर्मळ राहिलं की मला जास्त सुचतं. जास्त चांगलं सुचतं. लोकांच्या चिंतेमुळे, समाजाच्या कल्याणासाठी, जग बदलण्याकरता वा अन्य कुठल्याही उदात्त हेतूने – या हलाहलात उडी घेण्याआधी या नकारात्मकतेपासून स्वतःचं रक्षण करणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे. विमानातल्या सूचनेप्रमाणे –
“आधी स्वतः मास्क लावा मग दुसऱ्याला घाला!”
डिस्क्लेमर – पुन्हा एकदा – हा सल्ला नाही.
© कौशल इनामदार