इट्स ब्रेकिंग न्यूज

गेल्या आठवड्यात संगीतकार आणि गीतकार म्हणून माझा पहिला हिंदी चित्रपट भारतभर प्रदर्शित झाला. इट्स ब्रेकिंग न्यूज हे त्या चित्रपटाचं नाव. महाराष्ट्र टाईम्स, सकाळ इत्यादि वर्तमानपत्रांनी, तरण आदर्श, कोमल नहाता यांच्यासारख्या ‘ट्रेडगुरूं’नी या सिनेमाला आपली पावती दिली. तरी काही इंग्रजी दैनिकांनी या चित्रपटावर खूप वाईट शेरे मारले. खलिद महम्मद, ज्यांनी खुर्च्यांना खिळवून ठेवणारे दोन चित्रपट ‘तहज़ीब’ आणि ‘फ़िज़ा’ बनवले (म्हणजे खुर्च्या थिएटरला खिळून राहिल्या, लोक मात्र बिचारे उठून गेले), त्यांनी चित्रपट न पाहताच त्यावर समीक्षा लिहिण्याचा विश्वविक्रम ही केला. या चित्रपटामुळे काही पत्रकार दुखावले जाणार याची आम्हाला पहिल्यापासून खात्री होती. राजीव मसंद यांनी सीएनएन-आयबीएन वर केलेल्या समीक्षेत म्हटलं की दिग्दर्शकाने सिनेमात स्टिंग ऑपरेशन चित्रित करून तोच गुन्हा केलाय्‍ जो स्टिंग ऑपरेशन करणारे पत्रकार करतात. हे म्हणजे एका चित्रपटात एका अभिनेत्रीने वेश्येचं काम केलं तर ती ही वेश्याच आहे, असं म्हटल्यासारखं झालं.

सामान्य लोकांना हा चित्रपट आवडला आहे, हे जाहिर आहे. Yahoo.com, sulekha.com, bharatstudent.com, या संकेतस्थळांवर ही चित्रपटाचे चांगले रिपोर्ट्स आले आहेत. माझ्या इंग्रजी ब्लॉगवर मी या चित्रपटाची गाणी आणि त्याच्या मागची कथा लिहिली आहे. आपण ही गाणी ऐकून प्रतिक्रिया कळवल्यास मला खूप आनंद होईल.

https://kaushalsinamdar.in//2007/10/its-breaking-news-second-song/

https://kaushalsinamdar.in//2007/10/its-breaking-news-first-song/

https://kaushalsinamdar.in//2007/10/it-breaking-news-trailers/

2 Comments

  1. अदिती says:

    कौशल,
    तुमचं अभिनंदन. 'इट्स ब्रेकिंग न्यूज' बद्दल कालच वर्तमानपत्रात वाचलं. चित्रपट पहाण्याची उत्सुकता आहे.
    सारेगमप पासून मी तुमची फॅन आहे आणि मराठीतून आता हिंदी चित्रपटसंगीताच्या विशाल क्षितिजाकडे तुमची घोडदौड सुरू झाली आहे हे वाचून मला खूप आनंद झाला. हिंदी संगीतजगतातही आपण आपली नाममुद्रा उमटवावी आणि मराठीचा ध्वजही उंच उंच न्यावा ही सदिच्छा आहे.
    तुमची गाणी ऐकायचा योग अजून आला नाही पण सारेगमप मधे तुम्ही लोकांना कसं मार्गदर्शन करता हे नीट पाहता आलं. विशेषतः मधुराणीकडून 'कशाला उद्याची बात' बसवून घेण्याची तुमची कल्पना आणि तिने केलेलं त्याचं सादरीकरण मला फार आवडलं.
    तुमचं बोलणं अतिशय मृदू आणि बंगाली मिठाईसारखं आहे. ब्लॉगविश्वात तुमची अप्रत्यक्ष गाठ पडेल असं कधी वाटलं नव्हतं त्यामुळे हे कॉम्प्लिमेन्ट्स दिल्यावाचून राहवलं नाही. थोडं विषयांतर झालं याबद्दल क्षमस्व…
    –अदिती

  2. कौशल, तुमच्या या चित्रपटाबद्दल अभिनंदन. इटस ब्रेकिंग न्यूजबाबत मी ऐकलं ते कौतुकाचंच ऐकलं. मी दै. सकाळमध्ये काम करतो. तुमच्या या अनुभवाबद्दल एखादा लेख तुम्ही लिहू शकलात तर बरं होईल. (मराठी आणि इंग्रजीतील एकत्रित रितीने.) यासंदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास माझ्याशी इ-मेलद्वारे संपर्क साधू शकता.

What do you think?