गणपतीचे कान

काल रस्त्याने जात असतांना एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासमोर गणरायाची फारच देखणी मूर्ति आढळली. त्या मूर्तिचं दर्शन घेण्याकरिता मी क्षणभर तिथे थांबलो. एक स्त्री आपल्या ४-५ वर्षाच्या मुलाला घेऊन तिथे आली आणि माय-लेक माझ्या शेजारीच उभे राहून ती मूर्ति न्याहाळू लागले. आई मुलाला सांगत होती – “बघ! किती छान आहे बाप्पाची मूर्ति!”
त्या लहान मुलाने मात्र आपले दोन्ही कान आपल्या चिमुकल्या हातांनी घट्ट बंद केले आणि म्हणाला –
“आई, चल न इथुन… मला बाप्पाची भीति वाटते.”
त्या वाक्याने मी चपापलो. मी पुन्हा त्या मूर्तिकडे पाहिलं. गणरायाच्या मुद्रेवर एक अलौकिक शांत भाव होता. मग या बाळाला का बरं बाप्पाची भीति वाटली असेल असा विचार माझ्या मनात आला. मी त्या निरागस मुलाकडे पाहिलं. अजूनही त्याचे चिमुकले हात त्याच्या कानावरच होते. आणि माझे कान आणि डोळे एकदमच उघडले. गणपतीसमोर अत्यंत कर्कश आवाजात एक गाणं लागलं होतं. आता त्या गाण्याच्या प्रचंड आवाजाच्या पार्श्वभूमीवर गणपतीच्या मुद्रेवरचा शांत भाव खरोखरच भीतिदायक होता.
मला माझ्या असंवेदनशीलतेची लाज वाटली. त्या मुलाला जे पहिल्या झटक्यात जाणवलं ते जाणवायला माझ्यासारख्या संगीतामध्ये राहणार्याला इतका वेळ का लागावा या विचाराने मी अस्वस्थ झालो. इतके का आपण कोडगे होतो?
आज संध्याकाळी ‘वाजत गाजत’ या गणरायाला निरोप देण्यात येईल. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या मनात आज काय बरं आलं असतं? आपण पाडलेल्या प्रथेला काय वळण लाभलंय हे पाहून बहुतेक पश्चात्तापच झाला असता. प्रचंड गर्दी आणि बेभान भक्तगण पाहून त्यांना धडकी भरली असती. लोकमान्यांना हे असे लोक मान्य असते का? सुमधुर गाणं ऐकून नारायणराव राजहंसांना ‘बालगंधर्व’ उपाधी देणाऱ्या टिळकांनी बहुतेक नासिक ढोल आणि फटाक्याच्या आवाजाला संगीत मानणाऱ्या लोकांना ‘हाल’ गंधर्व अशी उपाधी दिली असती!
मागच्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी मला गणेशोत्सवात “आवाज” जास्त वाटला. आमच्या समोर एक सार्वजनिक गणपती मंडळ आहे. या मंडळात या वर्षी सिनेमाच्या गीतांवर तयार केलेल्या गणेशगीतांचा सुळसुळाट होता. रोज संध्याकाळी एका कर्कश आरतीच्या सीडी नंतर फटाके फोडले जायचे.
गिरगांव किंवा दादर चौपाटीपर्यंत जाणाऱ्या या ‘भक्तीमार्गावर’ आपल्याला पोलिस बंदोबस्ताची गरज पडते हे कलियुगाचे द्योतक आहे! दोन लागोपाठच्या मिरवणुकींमध्ये एकमेकांशी सुतराम संबंध नसलेलं संगीत लागलेलं असतं. ते एकमेकांमध्ये मिसळून जो कोलाहल तयार होतो तो विलक्षण असतो. कानाचे पडदे फाटेपर्यंत हा गोंगाट सुरू राहतो. या आवाजाचं काय प्रयोजन? गणपतीचे कान आपल्यापेक्षा मोठे असतात हे खरंय पण म्हणून या गोंगाटाचा नैवेद्य त्याला देणं हे भक्तीचं कुठलं रूप?
© कौशल श्री. इनामदार
(क्षितिज जसे दिसते या माझ्या पुस्तकातून)

4 Comments

 1. गणपतीची आपण प्रतिष्ठापना करतो, याचा अर्थ त्याला त्या मूर्तीमध्ये वास्तव्य करायचे आवाहन करतो. तेव्हा ती फक्त एक मातीची मूर्ती आहे असा भाव असेल तर काय उपयोग? गणपती साक्षात तिथे आहे असा भाव असेल तर गणपतीला आपल्या कर्कश गाण्याचा त्रास होईल हा विचार होईल. नुसती दगडाची मूर्ती आहे असा भाव असेल तर मग तिची पूजा करून आपणच मूर्ख ठरत नाही का?

 2. Gurudatta says:

  Very true Sentimental sensations are already vaporized and are replaced with commercial showbazi.

 3. अगदी वास्तव कौशल !
  खरंच असं घडत असताना आपण काहीच करू नाही शकत याचा खंत करण्याखेरीज हाती काही नाही.

 4. Asmita says:

  "गिरगांव किंवा दादर चौपाटीपर्यंत जाणाऱ्या या ‘भक्तीमार्गावर’ आपल्याला पोलिस बंदोबस्ताची गरज पडते हे कलियुगाचे द्योतक आहे!"
  या वाक्याला दादही दिली पण त्यातील वास्तवाचा दाहही जाणवतो.

What do you think?