मातीवर चढणे एक नवा थर अंती…

२ ऑगस्ट २००८ची संध्याकाळ विसरणं अशक्य आहे. त्या दिवशी चेतन गेला. पण त्याहून अधिक अशक्य आहे ते त्या दिवशीची संध्याकाळ ‘आठवणं’.

चेतनचा मृतदेह जमीनीवर ठेवलेला आठवला की त्या वेळी मनात आलेला विचार पुन्हा मनात येतो. मी ज्याला चेतन म्हणून ओळखत होतो, तो हा नव्हता. मग मी इथे कुणासाठी आलो होतो? त्या मृतदेहाकडे पाहून मी बेचैन झालो. आणि मी नुसताच बेचैन होतोय आणि दुःखी होत नाहीये, या विचाराने अधिक बेचैन झालो. स्वप्नात बर्‍याच वेळा असं होतं. एखादा ओळखीचा चेहरा असतो. पण त्याला आपण स्वप्नात वेगळ्याच नावाने हाक मारतो. ज्याला हाक मारतो तोही माणूस आपल्या ओळखीचा असतो, पण हा त्याचा चेहरा नसतो. समजा स्वप्न अर्धवट आठवण्याच्या स्थितीतच आपल्याला जाग आली तर बराच वेळ दोन्ही लोकांच्या नावाची आणि चेहर्‍याची सांगड आपल्याला घालता येत नाही. त्यावेळी जसं आपल्याला बेचैन वाटतं तसं मला वाटत होतं.

एकीकडे मी त्या मृतदेहाकडे बघण्याचं टाळत होतो आणि दुसरीकडे हा चेतनच आहे का याची खात्री करून घेत होतो. आता मात्र परिस्थिती बिकट होत चालली होती. मला डायरेक्ट दुःख वाटलं असतं तर किती बरं झालं असतं! आपल्याला नेमकं काय वाटतंय हे कळत नाही हे भितीदायक असतं.

चेतन दातार: (1964 – 2008)

मृत्यू अटळ आहे. प्रत्येकाला तो येतो. आपल्यालाही तो चुकणार नाही.
आपल्या आप्तांना कधीतरी मरताना पहावंच लागतं. हे सगळं खरं असलं तरी
मृत्यूशी जमवून घेणं कठीणच. चेतनच्या मृत्यूचं आणि माझं अजूनही जमत नाही
आणि जमेल असं वाटतही नाही. मी चेतनच्या अंत्यविधीला थांबलोही नाही. त्या
दिवशी चालत बांद्र्याहून गोरेगांवपर्यंत गेलो. बाहेर मळभ होतं तसंच ते आतही
होतं. न रडू येत होतं, न चेतनबरोबर घालवलेले क्षण स्मृतीपटलावरून सरकत
होते, न दु:ख होत होतं, न कुठलीही संवेदना जाणवत होती. कदाचित चेतन बरोबरच
माझ्या आतही काही मेलं असावं.

आता चेतनची आठवण येते ती काही तारीख पाहून येत नाही. खरं तर आठवण ‘येत’ नाहीच. ती असतेच.

वो उन्हें याद करे जिसने भुलाया हो कभी
हमने उनको न भुलाया न कभी याद किया।

पण दर २ ऑगस्टला मात्र मला त्या २००८ सालच्या २ ऑगस्टच्या संध्याकाळची आठवण येतेच येते. ती आठवण चेतनच्या मृत्यूची जशी असते तशी ती त्या दिवशीच्या ‘माझी’ही असते. ती संध्याकाळ काही पाठ सोडत नाही.  गुलजारच्या या कवितेसारखंच.

जाने क्या सोचकर नहीं गुजरा
एक पल रातभर नहीं गुजरा ।

© कौशल इनामदार, २०१४

1 Comment

  1. काही वेळा न बोलणं किंवा स्वतःशीच मूकपणे गप्पा मारणं सांगत होतास कौशलदा …

What do you think?