होऊनिया पार्वती मळिते मी गणपती…

होऊनिया पार्वती मळिते मी गणपती

Mithilesh & I at the recording of Sankasur

महाराष्ट्रात संगीतकार म्हणून मान्यता मिळवायला जे तीन प्रकार ‘मॅन्डेटरी’ समजले जातात ते म्हणजे – भावगीत, लावणी, आणि गणपतीचं गाणं! संगीतकार म्हणून १९ वर्षाच्या माझ्या कारकीर्दीत मी या तीन प्रकारातला भावगीत सोडला तर इतर दोन प्रकार हाताळले नव्हते. नाही म्हणायला ‘बालगंधर्व‘ या चित्रपटात ‘नेसली पितांबर जरी’ या पारंपारिक लावणीचा पुनर्निर्माण करण्याचा योग आला होता. अर्थात या लावणीची चाल पारंपारिक होती. याच लावणीच्या चालीवरून अण्णासाहेब किर्लोस्करांनी ‘वद जाऊ कुणाला शरण’ची चाल बांधली. या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळी एक गंमत अशी झाली की पहिल्या आणि तिसर्‍या कडव्याची चाल आम्हाला मिळाली पण दुसर्‍या कडव्याची चाल काही शोधूनही सापडली नाही!आशा खाडिलकर (ज्यांनी हे गीत ‘बालगंधर्व’साठी गायलं) मला म्हणाल्या तूच चाल दे दुसर्‍या कडव्याला. मूळ चालीच्या बाजाला कुठेही धक्का न लावता मला चाल बांधता येत्ये का नाही हे तपासून पाहणं माझ्यासाठीही आव्हानात्मक होतं. त्यामुळे मुळात पारंपारिक असली तरी या लावणीच्या मधल्या कडव्याला चाल नव्याने दिली आहे!

गणपतीचं गाणंही मी कधी केलं नव्हतं. मुळात मी फार धार्मिक प्रवृत्तीचा नाही. गणेशोत्सव हा माझ्यासाठी धार्मिक उत्सव नसून एक सांस्कृतिक उत्सव कायमच होता. गणेशोत्सवातल्या वेगवेळ्या कार्यक्रमातूनच माझ्यासारख्या अनेक मराठी कलाकारांची जडणघडण झाली. पण गणपतीच्या वेगवेगळ्या दिसणार्‍या मूर्तींचं आकर्षण मात्र मला लहानपणापासून होतं. त्यामागे एखाद्या मूर्तिकार सौंदर्यदृष्टी आणि घोर मेहनत असते हे त्यावेळी ध्यानीही नसायचं.

पेणचे मूर्तिकार देवधर आपल्या गणपतीच्या मूर्तींसाठी प्रसिध्द होते. त्यांचा कारखाना पाहतांना मी पहिल्यांदा साच्यातले गणपती पाहिले होते. मग ते पूर्ण रंगवून झाले की असं वाटायचं की मूर्तिकार दगडाला चैतन्य प्राप्त करून देतोय! देवाने घडवलेला माणूस पुन्हा देव घडवतोय!  त्यांच्या चिरंजीवांनी मला त्यांच्या कारखान्यातली एक मूर्ती भेटही दिली आहे.

एका मूर्तिकार कवीने असं म्हटलंय की –

“परमेश्वरा, मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ मूर्तिकार आहे. कारण तू केलेल्या मूर्ती मी केलेल्या मूर्तींना नमस्कार करतात!”

‘संकासूर’ या चित्रपटाच्या निमित्ताने ज्ञानेश्वर मर्गज या माझ्या मित्राने माझ्या हातात त्याने लिहिलेली एक कविता दिली. मूर्तिकाराच्या नजरेतून गणपती असा त्या कवितेचा आशय होता. मात्र ज्ञानेश्वरने लिहिलेली कविता मुक्तछंदात होती. कवि अशोक बागवे यांनी त्याला गीतरूप बहाल केलं आणि त्याचं एक फार सुंदर गाणं केलं. पार्वती होऊन मूर्तिकार गणेशाची मूर्ती घडवतो त्याची कहाणी म्हणजे हे गीत. मिथिलेश पाटणकरने हे गीत फार भावपूर्ण गायलं आहे. परवा या गाण्याचा व्हिडियो यू-ट्यूबवर टाकला आणि तीन दिवसातच जवळ जवळ २४०० वेळा तो पाहिला गेल्याची नोंद आहे. या ब्लॉगच्या वाचकांसाठी पुन्हा एकदा हे गीत सादर करीत आहे.

2 Comments

  1. अभिनन्दन
    I really feel blessed to read the narrative.
    The song is really impressiive & expressive!

  2. खूप सुंदर!!! पेणकरांचा उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद!!!
    सध्या माझी "कृष्ण भेटलाच पाहीजे" ही मुक्त कविता what's app वर माझ्या नावाशिवाय फिरत्ये .तिचंही असं काही सुंदर होऊ शकेल असं वाटलं.मंदार गोगटे कडे मिळेल ती तुम्हाला. मी fb वर share केली आहे.जरुर वाचा

What do you think?