बालगंधर्व साकारताना…

 

‘बालगंधर्व’चं संगीत करताना ज्या अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं त्यातलं प्रमुख आव्हान होतं की शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीचं संगीत पुनर्निर्मित करताना ते अस्सल तर वाटायला हवंच होतं पण त्याच बरोबर जुनाट वाटता कामा नये याची खबरदारी घ्यायची होती. ज्यांनी बालगंधर्वांचं संगीत ऐकलं आहे, त्यांना पाहिलं आहे त्यांच्या मनातल्या बालगंधर्वांच्या प्रतिमेला तडाही जाता कामा नये पण नवीन पिढीला बालगंधर्वांचं संगीत आणि एकूणच नाट्यसंगीत यात रुचि वाढावीअसंही
व्हायला हवं होतं. याच बरोबर जोडीला चित्रपटात तीन गाणी नव्याने करायची होती. भास्करबुवा बखले, गोविंदराव टेंबे, मास्तर कृष्णराव यांच्या पदांबरोबर आपण नव्याने करीत असलेल्या गाण्यांचा, चालींचा निभाव लागला पाहिजे ही जाणीवही मनात होती. शिवाय आता ही पदं फक्त मानापमान, सौभद्र किंवा स्वयंवर या नाटकांमधली न राहता ‘बालगंधर्व’ या चित्रपटाची गाणी आहेत हे ध्यानात ठेवणं गरजेचं होतं.

नाही मी बोलत नाथा

अभिराम भडकमकरने पटकथा आणि बालगंधर्वांच्या मूळ पदांचा अतिशय सुंदर गोफ विणला होता. प्रत्येक पदाला चित्रपटाच्या दृष्टीने वेगळा अर्थ प्राप्त होत होता. पण त्यामुळे माझ्यासमोर वेगळंच आव्हान निर्माण झालं. काही पदं जी नाटकामध्ये आनंदी प्रसंगी येतात ती चित्रपटात दुःखी प्रसंगी येतात! उदाहरणार्थ – ‘मानापमान’मधलं अतिशय लडिवाळ पद, ‘नाही मी बोलत नाथा’ हे नाटकात आल्हाददायी वाटतं पण चित्रपटात ते एका दुःखी प्रसंगी येतं. ‘मानापमान’च्या पहिल्याच प्रयोगाच्या दिवशी बालगंधर्वांच्या मुलीचा मृत्यू झाला आणि अशा दुखःद प्रसंगी किर्लोस्कर नाटक मंडळीच्या व्यवस्थापकांनी नाटकाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला. पण नारायणरावांनी ‘आपल्या व्यक्तिगत दुःखाची झळ मायबाप रसिकांना लागता कामा नये’ असं म्हणत त्याही परिस्थितीत आणि मन:स्थितीत खेळ करण्याचा निर्णय घेतला. इथे ‘नाही मी बोलत नाथा’ हे शब्द नारायणरावांच्या ओठावर येतात तेव्हां त्या शब्दांना चित्रपटात वेगळा अर्थ प्राप्त होतो. चित्रपटातल्या नाटकातले प्रेक्षक ‘मानापमान’ पाहत असले तरी चित्रपटाचे प्रेक्षक बालगंधर्वांच्या आयुष्याचं नाट्यही पाहताहेत याचं भान ठेऊन संगीत रचना करायची होती. भामिनी आनंदी असतांना नारायणरावांच्या काळजातलं दुःख कसं व्यक्त करावं याचा मी विचार करू लागलो – आणि हे सगळं मूळ पदाच्या रचनेला कुठेही धक्का न लावता! खूप वेळ विचार केल्यानंतर एक अतिशय सोपी, साधी पण परिणामकारक अशी एक कल्पना सुचली. ‘नाही मी बोलत नाथा’ अशी पदाची सुरुवात न करता ‘नाथा’ या संबोधनापासून केली – जणू काही भामिनी धैर्यधराला ‘नाथा’ म्हणत्ये पण बालगंधर्व मात्र परमेश्वराला ‘नाथा’ हाक मारताहेत असे दोन्ही अर्थ त्यातून प्रतीत झाले.

परवरदिगार

एके ठिकाणी दिग्दर्शक रवि जाधवला पूर्ण चित्रपटाचं तात्पर्य सांगेल असं नवं गाणं रचून हवं होतं. बालगंधर्वांचं जीवनविषयक तत्त्व या गाण्यात यावं अशी त्याने सूचना केली. ज्या ठिकाणी ते गाणं चित्रपटात येतं त्या प्रसंगात भोरच्या पंत प्रतिनिधींकडून मिळालेली शाल बालगंधर्व शिवापूरच्या दरग्यावर चढवतात असं दृश्य होतं. तिथे एक कव्वाली करावी असं मी रवि आणि गीतकार स्वानंद किरकिरे यांना सुचवलं. त्यांनाही कल्पना आवडली. आणि ‘परवरदिग़ार’ ही कव्वाली झाली. हा ‘परवरदिग़ार’ शब्द मला रवींद्र पिंगे यांनी बालगंधर्वांवर लिहिलेल्या लेखामध्ये सापडला होता. गोहरबाई बालगंधर्वांना ‘परवरदिग़ार’ म्हणून संबोधायच्या असा उल्लेख पिंगे यांच्या लेखात होता.

चिन्मया सकल हृदया

चिन्मया सकल हृदया

चिन्मया सकल हृदया

पण खरी मजा आली ते ‘चिन्मया सकल हृदया’ हे गीत करतांना. चित्रपट हे माध्यम नारायणरावांच्या प्रकृतीला मानवलं नाही. त्यांनी ‘धर्मात्मा’नंतर ‘प्रभात’शी त्यांचा तीन चित्रपटांचा करार मोडला तो प्रसंग. चित्रिकरणाच्या बंदिस्त वातावरणात नारायणरावांचा जीव घुसमटतो. समोर प्रेक्षक नाहीत, उत्स्फूर्त दाद नाही… अशा परिस्थितीत बालगंधर्व एका मोकळ्या शिवारावर येऊन मनमोकळं भजन गातात असा प्रसंग होता. हे भजन कुठलं असावं याबद्दल बराच विचारविनिमय झाला. ‘संशयकल्लोळ’चं भरतवाक्य ‘चिन्मया सकल हृदया’ याचे शब्द यासाठी मला समर्पक वाटले. पण या पदाची मूळ चाल साधी, सोपी होती. बालगंधर्व ज्या पद्धतीने गायले असते अशा पद्धतीने त्याची रचना करावी असं मनात होतं. या चित्रपटातलं माझ्या समोरचं हे सगळ्यात मोठं आव्हान होतं. चाल झाली आणि आनंद भाटेने फार अप्रतीम असं त्याचं सादरीकरण केलं. जेव्हां सुबोध भावेच्या अभिनयात हे गाणं पडद्यावर पाहिलं तेव्हां डोळे पाणावले. कारण पडद्यावर का होईना पण मी केलेली रचना साक्षात
बालगंधर्व गात होते!
या गाण्याची खरी पावती मला मिळाली ती या चित्रपटाचा ट्रेलर पाहून अनेकांनी मला विचारलं – “हे बालगंधर्वांचं कुठलं भजन? याची चाल मास्तरांची आहे का? आम्ही कसं हे कधीच ऐकलं नाही?”

 

नऊ महिने ‘बालगंधर्व’सोबत घालवल्यानंतर मला अतिशय समाधान वाटत आहे. मी काम चांगलं केलंय का बरं केलंय ते बालगंधर्वंच्या शब्दात ‘रसिक मायबाप’च ठरवतील… पण याचं संगीत देण्याचा अनुभव एक संगीतकार म्हणूनच नव्हे तर एक माणूस म्हणून मला खूप समृद्ध करणारा ठरला.

3 Comments

  1. Vinay Patil says:

    आपल बालगंधर्वच संगित काळजात घर करून राहिल आहे… खासकरुन चिन्मया सकल हृद्यया मधली उत्कटता…

  2. Vinay Patil says:

    आपल बालगंधर्वच संगित काळजात घर करून राहिल आहे… खासकरुन चिन्मया सकल हृद्यया मधली उत्कटता…

  3. […] हाताळले नव्हते. नाही म्हणायला ‘बालगंधर्व‘ या चित्रपटात ‘नेसली पितांबर […]

What do you think?