एक साहित्यिक वारी

वारीचे दिवस पुन्हा सुरू झाले आहेत. काही वर्षांपूर्वी पंढरपूरच्या वारीची माहिती देणाऱ्‍या एका संकेतस्थळाचं माझ्या हस्ते पुण्याच्या एस्.एम्. जोशी सभागृहात उद्घाटन झालं. एका अध्यात्मिक विषयावर, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने केलेल्या संकेतस्थळाचं, एका समाजवादी नेत्याच्या नावावर असलेल्या सभागृहात उद्घाटन होतं – हे फक्त भारतातच होऊ शकतं! पण जे परमेश्वराला मानत नाहीत ते त्याच्या (तिच्या) संतांना मात्र मनापासून मानतात असं दिसतं!
महाराष्ट्रात राहूनही मी अजून वारी अनुभवली नाही याची मला खंत वाटते. टाळ-चिपळ्या-मृदुंगाच्या तालावर गुंग होऊन जाणार्‍या वारकर्‍यांचं मला आकर्षण वाटतं. वारीची चित्र पाहिली तरी एक मानवरूपी पांढरी शुभ्र नदी वाहतेय असं वाटतं. ही चित्र पाहिली की मला नेहमी इक़्बालचा शेर आठवतो –
तू है मुहीते बेक़राँ, मैं इक ज़रासी आबजू
या मुझको बेकिनार कर, या मुझको हमकिनार कर
“तू एक असीम सागर आहेस, मी केवळ एक झरा आहे. तू मला तुझ्यासारखं असीम तरी कर किंवा मला तुझ्यातच सामावून घे!”
महाराष्ट्रात जन्माला आलात तर टाळ, चिपळ्या मृदंग यांचा संग हा मराठी भाषेइतकाच अतूट आहे. आणि संगीतकाराला तर या नादांपेक्षा विलग राहताच येत नाही.
माझ्या पहिल्याच ध्वनिमुद्रिकेत – ‘शुभ्र कळ्या मूठभर’मध्ये मी पखवाज आणि टाळ, चिपळ्यांचं एक भक्तिगीत संगीतबद्ध केलं होतं. ओंकार दादरकरने शांताबाई शेळकेंचं गायलेलं हे भजन तुम्ही ते इथे ऐकू शकता.
आणि मराठी अभिमानगीताच्या ध्वनिमुद्रिकेमधला अशोक बागवेंनी मराठीचा हा अभंग लिहिला आहे तोही नक्की ऐका! हे गीत गायलं आहे – पं. रघुनंदन पणशीकर, संजीव चिम्मलगी, मिथिलेश पाटणकर आणि मी!

 

मी पंढरीची वारी अनुभवली नसली तरी १४ वर्षांपूर्वी मी एका साहित्यिक वारीचा अनुभव घेतला आहे. १९९६ साली आळंदीत भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलानानिमित्त कवी अरूण म्हात्रे, नलेश पाटील, अशोक नायगांवकर आणि अशोक बागवे यांनी मुंबई ते आळंदी अशी एक साहित्यिक वारी काढली होती. कल्पना अशी होती की मुंबई ते आळंदी या प्रवासात जागोजागी थांबून कवितेचे कार्यक्रम करायचे आणि कविता म्हणत म्हणत आळंदीपर्यंत जायचं. या त्यांच्या वारीत या कवींनी मलाही सामावून घेतलं. मी आणि माझा मित्र परीक्षित भातखंडे तबला आणि पेटी घेऊन या वारीत सामील झालो.
दादरच्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयातून आमची ही वारी निघाली. हा संपूर्ण प्रवासच अविस्मरणीय झाला. पहिला मुक्काम पेणला होता. सकाळी पेणच्या एका शाळेत कार्यक्रम झाल्यावर दुपारी आम्ही पेणचे प्रख्यात मूर्तिकार देवधर यांच्या स्टुडियोमध्ये गेलो. त्या मूर्ति आणि शिल्प पाहिल्यावर निर्जीव मूर्तींमध्ये प्राण ओतण्याचं देवधरांचं कसब मला अनुभवायला मिळालं. एका मध्य प्रदेशातल्या शायरचं म्हणणंही आठवलं. देवाला उद्देशून तो म्हणतो –
“देवा, मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ मूर्तिकार आहे कारण तू निर्माण केलेल्या मूर्ति मी केलेल्या मूर्तींपुढे नतमस्तक होतात!”
देवधरांच्या घराखाली रस्त्यावर बसून आम्ही कविता म्हटल्या, गाणी म्हटली. स्वतः मूर्तिकार देवधर यांनीही आपल्या कविता आम्हाला ऐकवल्या. तिथून पुढे आम्ही अनेक ठिकाणी थांबत उत्स्फूर्त कार्यक्रम करत गेलो. कधी गावच्या पारावर, कधी कुणाच्या घरात, तर कधी अगदी रस्त्यावर देखिल. खोपोलीला र.वा. दिघे यांच्या घरात कार्यक्रम करतांना मन भरून आलं होतं आणि पुढे कामशेतच्या एका शाळेत जवळजवळ ३०० मुलांना मी शांताबाई शेळके यांची ‘रानपर्‍या’ ही कविता शिकवली आणि ती एका सुरात त्या चिमुरड्यांनी म्हटली तेव्हां कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं. देहूच्या डोंगरावरची शांत वार्‍याची झुळूक अनुभवतांना वाटलं – “या वातावरणात आपणही तुकाराम होऊ शकतो.”
शेवटी आळंदीला पोहोचलो तेव्हां वाटलं की परंपरा आपल्या मागे उभी असणं किती आश्वासक असतं. साहित्य संमेलनाला उपस्थित असलेला विशाल जनसमुदाय हा वारकर्‍याच्याच भक्तीभावाने तिथे जमला होता. त्या जनसमुदायात मिसळून जातांना इक़्बालच्या शेरामधल्या सारखं “बेकिनार” झाल्यासारखं वाटलं!

 

© कौशल श्री. इनामदार

What do you think?