कुसुमानिल प्रकाशन सोहळा
संस्कृतीच्या काठावर फुललेलं ‘कुसुमानिल’ हे एक सुंदर झाड आहे. या झाडाची सावली येणाऱ्या पिढ्यांना मिळावी, या झाडावरच्या पक्ष्यांची किलबिल, त्याला लगडलेल्या फुलांचा सुगंध आपल्या मुलांना आणि नातवंडांना मिळावा अशा तीव्र इच्छेतून मी ‘कुसुमानिल’ पुन:प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला.
‘कुसुमानिल’ पुनर्निर्मित
वास्तविक मी काही प्रकाशक नाही. तरी ‘कुसुमानिल’ ह्या कवीवर्य अनिल म्हणजेच आत्माराम रावजी देशपांडे आणि कुसुमावती देशपांडे यांच्या पत्रप्रपंचाचा हा दस्तैवज पुन्हा एकदा वाचकांसमोर यावा या तीव्र इच्छेतून मी ही नवी भूमिका स्वीकारली.
सारेगमपच्या लिट्ल चॅम्प्स या लोकप्रिय मालिकेचं दुसऱ्या पर्वासाठीसुद्धा पहिल्या पर्वाप्रमाणेच मी महाराष्ट्राभर मुलांच्या निवडीसाठी हिंडत होतो. त्यानिमित्तानेच नागपूरला जाण्याचा योग आला. नागपूरच्या त्याच दौऱ्यात मराठी अभिमानगीताच्या ध्वनिमुद्रिकेचा एक छोटासा सोहळा नागपूरमध्येही करावा असा विचार केला आणि मी, कवी अशोक बागवे, मंदार गोगटे आणि माझा मित्र उन्मेष जोशी असे आम्ही नागपुरात आलो. त्या कार्यक्रमाला कविवर्य अनिल यांचे चिरंजीव श्री. शिरीष देशपांडे आणि स्नुषा सौ. आशावती देशपांडेही हजर होते. अतिशय प्रेमाने त्यांनी आम्हाला दुसऱ्या दिवशी न्याहरीसाठी त्यांच्या धंतोली इथल्या निवासस्थानी बोलावलं.
धंतोलीमधल्या त्या सुबक बंगलीमध्ये एकेकाळी कविवर्य अनिल आणि कुसुमावती देशपांडे यांचं वास्तव्य होतं. कवितांच्या अनेक मैफली, गप्पांच्या अनेक फैरी तिथे झडल्या असतील, असा विचार करतच मी त्या घरात प्रवेश केला. वर्तमान आणि भूत असे दोन काळ एकत्रच या घरात नांदत आहेत असा भास मला होत राहिला. घरात प्रवेश करतांना सर्वात ठळक गोष्ट मला जाणवली ती म्हणजे घराच्या बाहेरच्या भिंतीवर चित्रकार द.ग. गोडसे यांनी रेखाटलेलं एक सुंदर चित्र होतं. चौकशी केली तेव्हा कळलं की ‘कुसुमानिल’ या कुसुमावती देशपांडे आणि अनिल यांच्यामध्ये झालेल्या पत्रव्यवहारावरच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठासाठी काढलेलं ते रेखाचित्र होतं. ‘कुसुमानिल’ हे नाव प्रथम मी त्याच वेळी ऐकलं. १९२२ – १९२७ या काळातली ती पत्र आहेत हे ऐकूनच माझी जिज्ञासा जागृत झाली होती.
मी नुकतंच – Oscar Wilde: A Life in Letters हे पुस्तक वाचलं होतं आणि पत्रातून माणूस जितका खरेपणानं कळतो तितका तो आत्मचरित्रातून किंवा चरित्रातूनही कळत नाही असा साक्षात्कार मला झाला होता. पहिलं पत्र लिहितांना दुसऱ्या पत्राच्यावेळी त्या पत्रलेखकाची मनोवस्था काय असणार आहे हे खुद्द त्या पत्रलेखकालाही ठाऊक नसतं! चरित्रात अथवा आत्मचरित्रात फक्त भूतकाळ आपल्यासमोर चितारला जातो पण पत्रांमधून भूतकाळ वर्तमानाची वस्त्र लेऊन आपल्याबरोबरीने चालत राहतो!
हे पुस्तक मला कुठे वाचायला मिळेल असं विचारताच सौ. आशावतींनी सांगितलं की आता हे पुस्तक उपलब्ध नाही, पण त्याची एक फोटोकॉपी त्यांनी मला दिली.
देशपांडे कुटुंबीयांच्या आदरातिथ्यानं तर आम्ही भारावून गेलोच होतो पण कुसुमानिलची छायाप्रत मिळाली होती याचा आनंद मला एखादा खजिना हाती लागल्यागत झाला होता. मुंबईला येताक्षणी मी ‘कुसुमानिल’ वाचून काढलं.
सौ. आशावती देशपांडेंकडून कळलं की या पुस्तकासाठी कुणी प्रकाशक पुढे येईना आणि म्हणून मला वाटलं की प्रकाशन हा आपला प्रांत नसला तरी आपण इथे पुढाकार घेणं गरजेचं आहे. आपल्या सांस्कृतिक वारशाबद्दल एक समाज म्हणून आपण उदासीन आहोत. ‘कुसुमानिल’ हे केवळ दोन व्यक्तींमधल्या नातेसंबंधाचं चित्र नाही, तर त्या दोन माणसांच्या निमित्ताने त्या काळातलं पुणं, फर्ग्युसन महाविद्यालय, स्वातंत्र्यपूर्व काळातला भारत अशा अनेक गोष्टींचं दर्शन घडतं.
‘Story of Civilisation’ या ग्रंथामध्ये विल ड्युरंट यांनी म्हटलं आहे – “संस्कृती म्हणजे एक नदी आणि तिचे दोन काठ आहेत. ही नदी हत्यांनी, हिंसेनं, चोऱ्यामाऱ्यांनी, लूटीनं, रक्ताळलेली आहे ज्याची दखल इतिहासकार घेतात पण त्यांच्या नकळत या काठांवर लोक घरं बांधतात, प्रेम करतात, मुलं वाढवतात, गाणी गातात, कविता करतात! संस्कृतीची कथा ही या काठांची कथा आहे. इतिहासकार निराशावादी असतात कारण त्यांचं लक्ष फक्त त्या रक्ताळलेल्या नदीकडे असतं…”
संस्कृतीच्या काठावर फुललेलं ‘कुसुमानिल’ हे एक सुंदर झाड आहे. या झाडाची सावली येणाऱ्या पिढ्यांना मिळावी, या झाडावरच्या पक्ष्यांची किलबिल, त्याला लगडलेल्या फुलांचा सुगंध आपल्या मुलांना आणि नातवंडांना मिळावा अशा तीव्र इच्छेतून मी ‘कुसुमानिल’ पुन:प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला.
‘कुसुमानिल’ या पुस्तकाचे मूळ प्रकाशक ह.वि. मोटे यांच्या प्रस्तावनेमुळेच खरं तर मला ही प्रेरणा मिळाली असं म्हणायला हरकत नाही. सौ. आशावती देशपांडे, श्री. शिरीष देशपांडे, श्री. उन्मेष देशपांडे आणि संपूर्ण देशपांडे परिवार यांनी हा दस्तैवज प्रेमाने माझ्या हाती दिला यात जबाबदारी किती आहे याची जाणीव मला आहे. त्यांनी माझ्यावर हा विश्वास टाकला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.
नुसतीच इच्छा व्यक्त करून काही होत नाही. ती सत्यात उतरवण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. हे कष्ट माझी सहकारी अस्मिता पांडे हिने घेतले नसते तर हे पुस्तक प्रत्यक्षात उतरलंच नसतं.
मराठी अस्मिता या आमच्या संस्थेच्या संचालकमंडळाचाही मी आभारी आहे की त्यांनी मला या प्रकल्पात साथ दिली आणि माझ्या पाठीशी उभे राहिले.
हे पुस्तक महाराष्ट्राच्या नव्या पिढीच्या स्वाधीन करताना मला आनंद होत आहे.
मराठी अस्मिता ही ना-नफा संस्था आहे जिचं उद्दिष्ट मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार करणं आहे. माझं आपणा सर्वांना असं आवाहन आहे की या पुस्तकाच्या किमान दोन प्रती आपण विकत घ्याव्या. त्या निमित्ताने मराठी भाषेतला हा महत्त्वाचा दस्तैवज घराघरात पोहोचेल आणि मराठी अस्मिता तर्फे आम्हाला असे भाषासंवर्धानासाठी उपक्रम करण्यासाठी आर्थिक आणि मानसिक बळ मिळेल. ज्यांना ह्या पुस्तकाच्या प्रती घ्यायची इच्छा आहे त्यांनी contact@marathiasmita.org या आमच्या ई-मेल पत्त्यावर संपर्क साधावा!
3 Comments
pl send me details of book
email-satishmokashi1959@gmail.com
phone-9623302700
SIR I AM WILLING TO PURCHASE KUSUMNIL BOOK WHERE TO PAY
मी हे पुस्तक 1971-72 च्या सुमारास नंदुरबारच्या लोकमान्य टिळक वाचनालयात वाचले होते. नंतर मात्र त्या पुस्तकाची प्रत कुठेही उपलब्ध होऊ शकली नाही. आपण हे उत्तम काम केले आहे. मला या पुस्तकाची एक प्रत हवी आहे. कुठे, काशी माइलेल ते कृपया कळवावे. नेट बँकिंग द्वारे पैसे पाठवू शकेन.