काळोखाचे वरदान

Kalokhache Vardaan


साग़र सिद्दिक़ी यांची एक गाजलेली ग़ज़ल आहे –

चराग़े तूर[1] जलाओ, बड़ा अंधेरा है।

ज़रा नक़ाब उठाओ, बड़ा अंधेरा है॥

 

वो जिनके होते हैं ख़ुर्शीद[2] आस्तीनों[3] में

उन्हें कहीं से बुलाओ बड़ा अंधेरा है॥’

 

याच आशयाच्या हिमांशु कुलकर्णी यांच्याही ओळी आपण ऐकलेल्या आहेत –

‘थोडा उजेड ठेवा, अंधार फार झाला

पणती जपून ठेवा, अंधार फार झाला’

पण अशोक नायगांवकरांना एक वेगळाच बोध झाला आणि ते उद्गारले –

अंधार करा, उजेड फारच झाला!

मज रात्र हवी, नक्षत्रांचा गजरा.’

आताशा मुंबईच्या रात्री चांदण्याविरहित असतात. अंधाराला आपण पारखे झालो आहोत की काय असंच मला वाटत राहतं. चंद्र-चांदण्या हे आपल्याला मिळालेलं काळोखाचं वरदान आहे, पण आपल्याला त्याची किंमत उरलेली नाही. आपल्याला निसर्गाचीही किंमत उरलेली आहे का असा मला प्रश्न पडतो.

चांदनी गुम हुई, रास्ते जल गये

अंधेरे शहर के उजालों में ढल गये !

अशी मुंबईची (किंवा कुठल्याही शहराची) आजची परिस्थिती आहे. म्हणूनच कुसुमाग्रजांचं मनसुद्धा शहरातल्या नवलाख तळपणाऱ्या विजेच्या दिव्यांना सोडून माजघरातल्या मंद दिव्याच्या वातीकडे झेप घेतं.

तर्क करा की आपला एक जवळचा मित्र/मैत्रीण काही कारणास्तव सतत आपल्याशी वाईट वागतो/ते. मित्र म्हणून काही काळ आपण ते सहन करतो. मग मात्र ताण असह्य होतो आणि आत काहीतरी तुटतं. आपण असं एकच उलट उत्तर देतो की एक घाव दोन तुकडे होऊन जातात. मैत्री तुटते. त्याचं आपल्यालाही दु:ख होतं आणि मित्राला/मैत्रिणीलाही वेदना होतात.

आपण हेच निसर्गाच्याबाबतीत करत आहोत असं मला वाटतं. आपण निसर्गाशी इतक्या तुसडेपणाने वागतोय की तोही फार काळ शांत बसणार नाही. किंबहुना आपल्या जुलुमांविरुद्ध त्याने बंड पुकारायला सुरुवात केलीच आहे आणि बंडखोर उठावामध्ये बळी सगळ्यांचाच जातो. आपण पाण्याचा अपव्यय करतो आणि पाणीच २६ जुलै किंवा त्सुनामीच्या रूपात सूड उगवतं. आपण हवेत प्रदूषण मिसळतो आणि एखादं वादळ आपली गावंच्या गावं उध्वस्त करून सोडतं. आपण अंधाराची तमा बाळगत नाही आणि सूर्य आपल्या पिकांना खाऊन टाकतो.

आता नुसत्या प्रसांगावधानाची नाही – ‘निसर्गावधना’ची गरज आहे आणि ते आपण बाळगू अशी प्रतिज्ञा करू!

© कौशल श्री. इनामदार

[1] मोझेसला दहा दैवी आज्ञा मिळाल्या तेव्हा दिसलेला दिव्य प्रकाश

[2] सूर्य

[3] बाह्यांमध्ये

What do you think?