श्रावणात घन निळा…

         आपल्या पंचांगातल्या बारा महिन्यांपैकी सर्वात लक्षवेधी म्हणावा असा कुठला महिना असेल तर तो श्रावण महिना! सण, उपासतापास, गाणी, या सगळ्यांचा महिना म्हणजे श्रावण! ऊन पाऊसाचे अनेकविध विभ्रम दाखवणाऱ्या या खेळकर, मनस्वी महिन्यालाही ‘श्रावणबाळ’ का म्हणू नये असा विचार माझ्या मनात डोकावल्याशिवाय राहत नाही! 
         गाणी आणि कवितांची तर या महिन्यात रेलचेल असते! हिंदी सिनेमातल्या गाण्यांपासून मराठी अभिजात कवितांमधून हा महिना आपल्याला बारोमास आढळतो! हिंदी चित्रपटात – ‘सावन का महिना पवन करे सोर’, ‘सावन के महिने में, इक आग सी सीने में’, ‘तेरी दो टकियाँ दी नौकरी वे मेरा लाखों का सावन जाये’,‘रिमझिम गिरे सावन’ ते अगदी ‘सावन को आने दो’ किंवा किशोरी आमोणकरांनी ‘दृष्टी’ चित्रपटासाठी केलेल्या ‘सावनिया संझा में अंबर झर आये’ या गाण्यांपर्यंत श्रावण महिना दर्वळत राहतो. चित्रपटेतर गीतांमध्येही – जसं की ठुमरी, ख़याल, होरी, कजरी, या गाण्याच्या प्रकारांमध्येही श्रावण भरून राहिला आहे – ‘बरसन लागी सावन बुँदिया राजा, तोरे बिन लागे ना मोरा जिया’ किंवा ‘सावन का महिना है। जीना भी क्या जीना है, साजन से जुदा होकर।’ अशी गाणी सापडतात. मराठी कविता आणि गाणीही याला अपवाद नाही. बालकवींच्या – 

         ‘श्रावणमासी, हर्ष मानसी,

         हिरवळ दाटे चोहिकडे।

         क्षणात येती सरसर शिरवें

         क्षणात फिरुनी ऊन पडे।।’

ते इंदिरा संत यांच्या – 

         ‘श्रावणा कुणाचे मनस्वी हे क्षण?

         निसर्ग चित्रांत पावले स्पंदन!’

 – पर्यंत अनेक कविता आपल्या मनात येतात. ‘झिमझिम झरती श्रावणधारा’ ते शांताबाई शेळकेंनी लिहिलेलं गीत – ‘रिमझिम बरसत श्रावण आला, साजण नाही आला’ अशी अनेक गाणी श्रावणाच्या वातावरणात रसिकांना नेतात. 

         इतकं असूनही ज्या गाण्याने मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवलं आणि ज्या गीताच्या उल्लेखाशिवाय ही चर्चाच काय, पण खुद्द श्रावण महिनाही पुढे सरकू शकणार नाही ते गाणं म्हणजे मंगेश पाडगांवकरांनी लिहिलेलं आणि श्रीनिवास खळे यांनी संगीतात गुंफलेलं (या गाण्याबाबतीत तरी मला ‘संगीतबद्ध’ असा नीरस शब्द वापरावासा वाटत नाही!) अजरामर गीत – श्रावणात घन निळा बरसला!

         या वर्षी ‘श्रावणात घन निळा’ या गाण्याला ५० वर्ष पूर्ण झाली. अर्ध शतक उलटून गेलं तरी या गाण्याची मोहिनी मराठी मनावरून उतरत नाही! एक संगीतकार म्हणून या गाण्याची भूल माझ्याही मनावर पडलीच आहे.

         ‘गाण्याची जन्मकथा’ हा कायमच रसिकांच्या कुतूहलाचा विषय असतो पण रसिकांच्या कल्पनेत आणि वास्तवात हमखास फरक असतो! ‘श्रावणात घन निळा बरसला’ असं ऐकल्यावर कुणालाही वाटेल की कोकणातल्या निसर्गरम्य वातावरणात, केतकीच्या वनात या गीताचा जन्म झाला असावा. पण तो मुळात दादर ते व्हीटी या लोकल प्रवासात झाला आहे हे कुणाला सांगून खरं वाटणार नाही. 

         खळे साहेब आणि मंगेश पाडगांवकर, दोघेही त्या काळात मुंबई आकाशवाणीवर नोकरी करत होते. उन्हाळा ऐन भरात असताना, घामाच्या धारा वाहत असताना, मंगेश पाडगांवकर आणि श्रीनिवास खळे, हे दादर ते व्हीटी लोकल ट्रेनने प्रवास करत होते. अशात पाडगांवकरांनी खळे साहेबांना एका चिटोऱ्यावर काही ओळी लिहून दिल्या. खळे साहेबांनी तो कागद पुन्हा पाडगांवकरांकडे दिला आणि म्हणाले, “तुम्हीच वाचून दाखवा!” पाडगांवकरांनी त्यांच्या खास शैलीत त्या ओळी खळे साहेबांना ऐकवल्या. एकदा ऐकून झाल्यावर खळे साहेब म्हणाले, “पुन्हा ऐकवा!” असं दोन-तीन वेळा खळे साहेबांनी कविवर्य पाडगांवकरांकडूनच ती कविता ऐकली. व्हीटी स्थानकावर उतरताना खळे पाडगांकरांना म्हणाले – “चला, तुमच्या या गीताचा मुखडा तर झाला!”

         कुणाला या गोष्टीची कमाल वाटेल की जे गाणं नुसतं ऐकलं की रसिकाला श्रावणसरींमध्ये चिंब भिजण्याचा अनुभव मिळतो, ते गाणं ग्रीष्माचा दाह आपल्या परमोच्च बिंदूवर असताना, लोकल ट्रेनच्या गर्दीत, माणसांच्या कोलाहलात कसं काय सुचू शकतं? 

         पण मला हे कळू शकतं. एक संगीतकार म्हणून माझा स्वतःचाही अनुभव असा आहे की निसर्गरम्य वातावरणात आपल्याला असं वाटतं की काहीतरी सुंदर सुचावं पण प्रत्यक्षात काही सुचत नाही, पण मुंबईच्या ट्रॅफिक जॅममध्ये मात्र खूप चाली सुचतात. याचं कारण मला असं जाणवलं की निसर्गरम्य वातावरणात आपल्या संगीताची निसर्गाला गरज नसते; आपल्या संगीताला त्या निसर्गाची गरज असते! आपण फक्त शांतपणे तो निसर्ग अनुभवायचा असतो. तो आपल्या आत सामावून घ्यायचा असतो. पण शहराच्या कोलाहलात मात्र आपल्या संगीताची गरज असते! आणि इथे तर दोन अत्यंत प्रतिभावंत कलाकार! घामाच्या धारांमधूनही त्यांना श्रावणधारांचं गीत सुचलं यात नवल ते काय!

         यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे आणि ती म्हणजे पाडगांवकरांनी त्या ओळी आधी लिहिल्या आणि त्या पुन्हा पुन्हा खुद्द कवीच्या तोंडून ऐकल्यावर खळे साहेबांनी त्या गीताची चाल रचली. आधी चाल करून नंतर त्यावर शब्द लिहून घेण्याच्या पक्षातले हे दोन्ही अध्वर्यू नव्हते. मी एकदा खळे साहेबांना विचारलं होतं की तुमच्या मते आधी चाल का आधी शब्द तर त्यांनी गमतीने मला माडगुळकरांचं त्यावरचं म्हणणं ऐकवलं होतं – “अरे, आधी चाल आणि नंतर शब्द म्हणजे आधी झबलं शिवून, नंतर त्या मापाचं बाळ शोधत फिरत राहण्यासारखं आहे!” त्यांच्या याच धारणेमुळे खळे साहेबांच्या गाण्यात ते शब्दांचा इतका सुरेख वापर करून घेत. ‘श्रावणात घन निळा’मध्येही सुरांच्या कोंदणात एक एक शब्द इतका चपखल बसलाय की असं वाटावं की सूर आणि शब्द हे एकत्रच जन्माला आले असावेत.

         एक सांगीतिक रचना म्हणून ‘श्रावणात घन निळा’अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. खळे साहेबांच्या संगीतशैलीचा हे गीत म्हणजे एक वस्तुपाठ आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरू नये. तालाचा आधार घेऊन नव्हे, तर तालावर सहज स्वार होऊन हे गीत चालीत गुंफलं गेलंय. खळे साहेब नेहमी म्हणायचे की ताल शिकता येतो पण लय अंगात भिनलेली असावी लागते. लय खळे साहेबांच्या अंगात किती भिनलेली होती याचं दर्शनच या गाण्यातून आपल्याला होतं. कुठेही लयकारीचा आव न आणता हे गाणं तालाशी सहजरीत्या खेळत सुरांवर तरंगत पुढे जातं. 

         जशी पाडगांवकरांच्या शब्दात आहे, तशीच चित्रमयता खळे साहेबांच्या चालीतही आहे. त्यांची संपूर्ण चाल ही जणू अत्यंत सूक्ष्म, बारीक नक्षीकाम केलेली पशमीना शालच आहे असं गाणं ऐकताना वाटत राहतं. आता गीताची पहिलीच ओळ पहा ना… ‘श्रावणात’ या शब्दाची चाल अवरोही (खाली येणारी) आहे, तर ‘घन निळा’ हे शब्द वर जातात आणि त्याला लागून येणारा ‘बरसला’ आरोही जाऊन वळसा घेऊन पुन्हा खाली येतो! पुन्हा ‘रिमझिम’ शब्द आरोही सुरांत आहे तर ‘रेशीमधारा’ या शब्दामध्ये ‘रेशीम’ आरोही आहे, आणि बरसणाऱ्या धारांप्रमाणेच ‘धारा’ अवरोही आपल्या मनावर येऊन कोसळतो! श्रावणातल्या ऊनपावसाप्रमाणेच या आरोही-आवरोही सुरांचा खेळही या गाण्यात अव्याहत सुरू राहतो! दुसऱ्या ओळीतला ‘उलगडला’ हा शब्दही पहा. तालाच्या ठोक्यावर न पडता हा शब्द बरोबर ठोका चुकवून त्यातली सर्व अक्षरं ‘ऑफबीट’ पडतात आणि खरोखरच आता काहीतरी दैवी दृश्य आपल्यासमोर उलगडणार याची साक्ष मिळते. ‘झाडांतून अवचित’ या शब्दांत ही उत्सुकता ताणली जाते आणि ओळीच्या शेवटी ‘हिरवा मोरपिसारा’ जेव्हा खरोखर उलगडतो तेव्हा आपल्याला निसर्गाचा एखादा दैवी साक्षात्कार झाल्याचं जाणवत राहतं! 

         यानंतरची चाल म्हणजे खळे-पाडगांवकर या द्वयीच्या प्रतिभेचं जणू विश्वरूप दर्शनच आहे असं म्हणावं लागेल. पाडगांवकरांच्या नायिकेला जिथे तिथे श्याम मुरारी दिसणाऱ्या राधेची अनुभूती येते, तिच्या स्वप्नांचे पक्षी रंगांच्या रानात हरवतात, तिला वारा हा गतजन्मीची ओळख सांगत येतो, तिच्या कपाळावर पडलेल्या पावसाच्या थेंबाचंही फुलपाखरू होतं, आणि पानांवर उमटलेल्या रेषा या शुभशकुनाच्या आहेत असं वाटून ती प्रीतीच्या सागरात इतकी बुडून जाते की तिला आता किनाराही नकोसा वाटतो! शब्दातल्या हा साक्षात्कारांचा चित्तथरारक आणि थक्क करणारा प्रवास हा खळे साहेब त्यांच्या स्वररचनेने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. 

         प्रत्येक कडव्याची चाल वेगळी हे या रचनेचं आणखी एक वैशिष्ट्य. चार अंतरे आणि चारही वेगळे हे खळे साहेबांच्या संगीतरचनेची खासीयतच आहे. त्यामुळे कमी वाद्यमेळातही या गाण्यात आपल्याला एक प्रचंड पट पाहिल्याचं जाणवतं!

         या गाण्याच्या वाद्यमेळाचीसुद्धा कमाल आहे. या गाण्याचं संगीत संयोजन अनिल मोहिले यांनी केलं आहे. गीताची सुरुवात हार्पच्या म्हणजे स्वरमंडळाच्या अवरोही सुरावटीने होते तेव्हाच आपल्याला पाऊस पडल्याचा भास होतो. त्यानंतर जयराम आचार्यांच्या सतारीचा एक तुकडा आणि मग मारुतिराव कीर यांच्या तबल्याच्या पिकअप बरोबर हरीप्रसाद चौरसियांची बासरी जणू काही श्रावणातला ओला मृद्गंधच घेऊन येते. प्रत्येक इंटरल्युडची सुरुवात याच स्वरमंडळाने होते आणि तबला, बासरी, आणि सतार अशी ईन मीन तीन वाद्यच प्रामुख्याने या गीतात वापरली आहेत. जरा कान देऊन ऐकलंत तर पूर्वीच्या प्रथेनुसार खूप लांबवर असं साँग व्हायोलिन आपल्याला ऐकू येतं. कमीतकमी वाद्यांमध्ये जास्तीत जास्त परिणाम साधण्याची किमया अनिल मोहिलेंच्या संगीत संयोजनाने केलेली आहे.

         पण या गाण्याला जो दिव्यत्वाचा स्पर्श झाला आहे तो लता मंगेशकर यांच्या आवाजामुळे. इतकी अवघड स्वररचना इतकी लीलया पेलणारी गायिका या गाण्याला लाभली हे या गीताचं आणि आपल्यासारख्या रसिकांचं भाग्यच म्हणायला हवं. लतादीदींच्या आवाजात ‘अंतर्यामी सूर गवसला’ हे शब्द येतात तेव्हा तो अंतर्यामीचा सूर कसा दिसत असेल तो साक्षात आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. 

         कुठलीही कलाकृती अजरामर होण्याकरता, ती केवळ करमणूक किंवा मनोरंजनाच्या पलीकडे जावी लागते. ‘श्रावणात घन निळा बरसला’ हे गीत मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन आपल्याला स्वतःच्याच भौतिक आणि भावनिक जगाचा एक दृष्टांत देतं आणि आपलं जग समृद्ध करतं. अजून पन्नास वर्षांनी अजून एखादा तरूण संगीतकार या गाण्याबद्दल शतकपूर्तीनिमित्त विस्मयाने आणि आदराने लिहील यात मला तरी शंका वाटत नाही.

©️ कौशल इनामदार, 2019

1 Comment

What do you think?