अशी दुपार

भक्ताला संकटकाली जसा परमेश्वर आठवतो तसं कधी खूप घाईत एखाद्या गाण्याची गरज पडली तर मी बागवे सरांकडे धाव घेतो. ते उत्तम शीघ्रकवी तर आहेतच पण शब्दप्रभूही आहेत.

अरूण म्हात्रे, अशोक बागवे, अशोक नायगांवकर, नलेश पाटील, महेश केळुसकर आणि निरंजन उजगरे हे सगळे कवी मिळून ‘कवितांच्या गावा जावे’ असा एक कार्यक्रम करत असत. या कार्यक्रमाच्या शीर्षकाबद्दल मला नेहमीच कुतुहल वाटायचं आणि ‘कवितांच्या गावा जावे ’ असं खरंच वाटायचं. माझ्या मनात एक ‘फॅन्टसी’ सुरू झाली आणि हा कवितेचा गाव कसा असेल याची चित्रं मनात तरळू लागली. मग एक दिवस विचार आला की या कवितेच्या गावात एक अख्खा दिवस घालवायला काय मजा येईल. त्यातूनच मला ‘एक दिवस कवितेतला’ या कार्यक्रमाची कल्पना सुचली. एक दिवस कवितेतला – कवितेमधली पहाट, सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, उत्तररात्र आणि पुन्हा पहाट!

कविवर्य शंकर वैद्यांची “पहाटेची वेळ रंग रंग अंबरी”, अरूण म्हात्रेंची “चिमण्या गाती शुभ्र उन्हाचा पहिला पंचम”, ग्रेसांच्या “उन्हें उतरली” आणि “या व्याकुळ संध्यासमयी शब्दांचा जीव वितळतो”, महानोरांची “दिवेलागणीची वेळ”, कुसुमाग्रजांची “नवलाख तळपती दीप विजेचे येथ”, गोविंदाग्रजांची “नीज गुणी बाळ झणी”, बालकवींची “या शुभ्र विरल अभ्रांचे शशिभवती नर्तन चाले” ही रात्र आणि पहाट यांच्या उंबरठ्यावर असलेल्या क्षणाबद्दलची कविता आणि अशोक बागवेंची “चांदणे वळले कुशीवर जागली पहाट” अशा कवितांचा समावेश होता.

यात काही राहून गेलं का? मी चमकलो!

गाणी मस्त होताहेत या नादात अचानक कार्यक्रमाची तारीख कधी समोर येऊन ठाकली ते कळलंच नाही आणि अचानक साक्षात्कार झाला की या कवितेतल्या दिवसामध्ये पहाट आहे, सकाळ आहे, संध्याकाळ आहे, रात्र – उत्तररात्र आहेत, पण दुपारच नाहीए!

संध्याकाळ आणि रात्रीत रमणारे अनेक कवी सापडले! काही धार्मिक प्रवृत्तीच्या कवींच्या पहाटेवर कविता होत्या! उदाहरणार्थ – कविवर्य भा. रा. तांबे यांची “नटवर तो हर घ्यावा” ही शंकराची प्रार्थना. पण ‘दुपार’ या विषयावर किंवा ‘दुपार’च्या संदर्भातली कविता काही सहजासहजी सापड्त नव्हती. इथे एक लक्षात घ्यायला हवं की कविता अगदी गेय नसली तरी तिचं निदान छंदात असणं आवश्यक होतं. नाहीतर काही नवकवींच्या मुक्तछंदातल्या दीर्घ कविता सापडल्या होत्या. दिवस भरभर चालले होते आणि परिस्थिती गळ्याशी आली तेव्हा या मुक्तछंदातल्या कवितांना चाली देण्याचेही काही केविलवाणे प्रयत्न

केले! पण मनासारखं काही जमेना!

भक्ताला संकटकाली जसा परमेश्वर आठवतो तसं कधी खूप घाईत एखाद्या गाण्याची गरज पडली तर मी बागवे सरांकडे धाव घेतो. ते उत्तम शीघ्रकवी तर आहेतच पण शब्दप्रभूही आहेत.

दुपारचं एकही गाणं मिळत नसल्याचं मी त्यांना सांगितलं. कार्यक्रमाला दोनच दिवस राहिले आहेत, हे ही सांगितलं.

बागवे सर म्हणाले, “मला विचार करू दे. उद्या फोन करतो.”

माझ्या पोटात गोळा आला. म्हणजे एक दिवस प्रकरण पुढे जाणार! चाल लावायला एकच दिवस मिळणार. पण पर्याय काहीच नव्हता. मी निमूटपणे हो म्हणालो!

पण पंधरा मिनिटांनी फोन वाजला आणि –

“घे लिहून” अशी ओळखीच्या आवाजातली प्रेमळ आज्ञा कानावर पडली आणि माझ्या जीवात जीव आला.

 सुन्न गगनमंडलात भिरभिरते एक घार           अशी दुपार!
पळस आळवीत आग रानभरी मन जिव्हार       अशी दुपार!

जखम जशी झळझळते, ऊन दूर उलत जाय
आत सलत मृगजळात तहान पीत एक गाय
ठणकत डोळ्यात प्रहर अंतरात नित कहार       अशी दुपार!

मी शब्द लिहून घ्यायला लागलो आणि लिहिता लिहिताच भारावून गेलो. गीत अतिशय वेगळ्या धाटणीचं होतं आणि अनवट छंदात होतं.

मी भराभर गाणं लिहून घेत होतो. लिहून घेता घेताच मला अनेक गोष्टी सुचत होत्या. गीत वेगळ्या धाटणीचं होतं आणि छंदही अनवट होता. शेवटी एकदाचं दुपारचं गाणं आपल्याला मिळालं याच विचाराने मी आनंदित झालो होतो. आणि शब्द जसेजसे माझ्यासमोरच्या कागदावर उमटत होते तसा मी आणखीनच हरखून जात होतो. गीतामधल्या प्रतिमांना आणि शब्दांमधल्या नादमयतेला दाद देत होतो. ही कविता नुसती वाचून दाखवली तरी काय गंमत येईल असाही विचार मनाला चाटून गेला! आणि या अशा छंदातल्या गीताला संगीत देणंही एक कठीण काम होतं. फोन ठेवल्याठेवल्या मी कामाला लागलो. काही सुचतंय का ते पहायला लागलो. साधारण तासाभरातच चाल लागली. ती फारशी मनाला पटली नव्हती पण कार्यक्रम तोंडावर आला असल्यामुळे फार कलाकारी मनस्वीपणा मला परवडण्यासारखाही नव्हता! दुसऱ्या कुठल्या प्रहराचं गाणं असतं तरीसुद्धा ही कलाकारी दाखवली असती – त्या गाण्यांना पर्याय होते – पण दुपारचं एकच गाणं होतं! जी चाल लागली त्यात भटियार रागाच्या जवळचे सूर लागत होते. गाणं दुपारचं आणि भटियार हा पहाटेचा राग! एकवेळ ते ही चाललं असतं पण दुसरी चूक अक्षम्य होती. कवितेत एखाद्या ठाम विधानाप्रमाणे येणारे “अशी दुपार” हे शब्द गाण्यात मात्र पुनरावृत होत होते. त्यामुळे ओळ संपली की “अशी दुपार, अशी दुपार” असं दोनदा ते म्हटलं जाई. “अशी दुपार!” असं केवळ एकदाच म्हटल्याने जे ठाम विधान होतं ते शब्द दोन वेळा म्हटल्याने “अशी दुपार” आहे ते कळत होतं पण त्याच्यानंतरचं उद्गारवाचकचिन्ह कुठेच चालीमध्ये दिसत नव्हतं! मी त्याकडे दुर्लक्ष केलं. वेळ कमी असल्याने मनाची खात्री पटवून दिली की हेच बरोबर आहे. संध्याकाळी माझा मित्र अजित परब घरी आला. तोही त्या कार्यक्रमात गाणार होता. मी त्याला चाल ऐकवली. कशी वाटली, असं विचारलं. त्यावर ‘बरी आहे!’ असं उत्तर मिळालं. ‘बरी आहे’ या उत्तराचं नेहमी संदर्भासहित स्पष्टीकरण शोधावं लागतं. म्हणणाऱ्याच्या आवाजाच्या ‘टोन’वर ‘बरी’ म्हणजे ‘उत्तम’ का ‘बरी’ का ‘ठीकठीक’ ते ठरतं! यावेळी त्याचा अर्थ ‘ठीकठीक’ असं मला अजितच्या उत्तरावरून जाणवलं.

रात्रभर झोप लागेना. दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाच्या चार तास अगोदर कार्यक्रमाची तालीम होती.  बाकीच्या गाण्यांची तालीम होत असतांना मी दुसऱ्या खोलीत गेलो आणि हे गाणं डोळ्यासमोर ठेऊन दिलं. पुन्हा पुन्हा वाचलं आणि अचानक एक गोष्ट ध्यानात आली. बऱ्याच कविता वाचून डोळ्यासमोर शब्दचित्र उभं राहतं. पण या गीतात एक शब्द-चलचित्र होतं. “सुन्न गगनमंडलात भिरभिरते एक घार…” असं म्हटल्यावर घारीच्या आसमंतातल्या गोल घिरट्या डोळ्यासमोर येत होत्या. मी विचार केला की हेच चलचित्र आपल्याला चालीत दाखवता येईल का? मी गोलाकारात (घारीच्या घिरट्यांसारखी) एक सुरावट बांधली आणि एका लँडिंगप्रमाणे “अशी दुपार!” एकदाच म्हटलं. एकदम दोन गोष्टी साध्य झाल्या. आताची सुरावट मधुवंती रागावर आधारित होती जो द्पारी म्हटला जाणारा राग आहे आणि “अशी दुपार”चं शेवटचं अक्षर ‘र’ हे तीव्र मध्यम या सुरावर पडत होतं. अशा फार कमी चाली आहेत ज्या तीव्र मध्यमावर थांबतात. कारण त्या सुरावर एक अनावस्थित (unsettled) असा भाव आहे. या गाण्यासाठी तो भाव अगदी योग्य होता. पहिल्या चालीच्या मानाने ही चाल एकतालात बांधल्यामुळे अधिक जलद होती. मी पुढे शब्द वाचत गेलो आणि गात गेलो!

“अंधुकसे स्मरण तसे काळजातले धुके” हे गातांना अंगावर काटा आला आणि मनाशी गाठ बांधली की हीच चाल बरोबर आहे. बाहेरच्या खोलीत येऊन सगळ्यांना गाणं म्हणून दाखवलं. त्यांच्या डोळ्यातले भावच खूप बोलके होते. कार्यक्रमाला दोनच तास राहिले होते पण शिल्पा पै या गायिकेने दोन तासच हातात असतानाही ते गाणं बसवण्याची तयारी दाखवली. कमलेश भडकमकरने पुढच्या पंधरा मिनिटात त्याचं संगीत संयोजन केलं. आता प्रश्न होता की दुपारच्या वेळची मनातली जी कलकल होती ती गाण्यातून कशी दाखवायची. त्यासाठी अर्धी ओळ सोलो स्त्रीच्या आवाजात आणि उरलेली अर्धी ओळ पुरुषांचा कोरस वापरून म्हणायची अशी कल्पना निघाली. कार्यक्रमात या गाण्याचा विलक्षण परिणाम झाला.

 सावल्या विसावल्या झाडपानही मुके
अंधुकसे स्मरण तसे, काळजातले धुके
प्राक्तनातले ठसे, वितळत ना मनचुकार    अशी दुपार!

हाक निनादे दिगंत विजनाच्या वाटेवर
तुजसाठी, मनगाठी, बांधत मी अधरावर
उघडझाप पापण्यात थेंबांची सतत धार    अशी दुपार!

पुढे हे गाणं ‘गर्द निळा गगनझुला’ या अल्बमसाठी आम्ही ध्वनिमुद्रित केलं. तो ही दिवस मला नेमका आठवतो कारण कमलेश भडकमकरचं दुस-या दिवशी दहा वाजता लग्न होतं आणि आदल्या रात्री दोन वाजेपर्यंत तो याच गाण्याचे, त्यानेच नियोजन केलेले तुकडे सिंथेसाइझरवर वाजवत होता. हे सगळे तुकडे अतिशय कठीण होते आणि ते वाजवायला खूप वेळ लागत होता. कमलेशची कामाप्रती कमिटमेन्ट त्याच्या एका वाक्यावरून लगेच तुमच्या ध्यानात येईल. गाणं वाजवता वाजवता तो म्हणाला –

“शॅ! उगाच मधे लग्न आलंय रे!”

शेवटी पहाटे तीन वाजता या गाण्याचं ध्वनिमुद्रण संपवून कमलेश सकाळी (बहुधा झोपेतच) बोहल्यावर चढला!

एका दुपारच्या गाण्यामुळे आयुष्यभर लक्षात राहील अशी रात्रही आम्हाला अनुभवायला मिळाली!


© कौशल इनामदार


(हा लेख प्रथम सकाळच्या सप्तरंग पुरवणीत दिनांक ५ जानेवारी २०२० रोजी छापून आला.)

1 Comment

  1. Ajit R. Jadhav says:

    वेळ झाली भर माध्यान्ह… (कवी अनिल)

    [ जरा आम्हाला पण फोन केला असता तर? वेळीच नसतं सांगितलं? … बरं असो. पुढच्या वेळी! ]

    Best wishes and regards [ as also socio-political etc. [and more important: also more fundamental] premises! ]
    –Ajit

What do you think?