‘दीस टेकला धरेला’ – छंद ओठांतले – भाग २

१९९५ सालच्या जून महिन्यात मी छबिलदास शाळेच्या सभागृहात ‘अमृताचा वसा’ हा कार्यक्रम सादर केला आणि पहिल्यांदा ‘संगीतकार’ म्हणून मला रसिकांची मान्यता मिळाली. उद्या या गोष्टीला बरोबर २५ वर्षं होतील.

तेव्हापासून उराशी एक स्वप्न बाळगलं होतं आणि ते म्हणजे चित्रपटासाठी आपण संगीत करावं. ‘संगीत – कौशल इनामदार’ अशी अक्षरं रूपेरी पडद्यावर झळकावीत आणि ती झळकत असताना आपली धून मागे वाजत असावी. माझं हे स्वप्न प्रत्यक्षात येण्याकरिता मात्र पुढची पाच वर्षं जावी लागली. २००० साल उजाडता उजाडता मराठी चित्रपट आपले पंख पसरत चालला होता आणि ‘श्वास’सारख्या चित्रपटाने मराठी चित्रपटक्षेत्राला एक नवी उमेद दिली होती. २००१ साली एका चॅनलच्या पारितोषिक वितरण समारोहात माझी पहिल्यांदा गजेन्द्र अहिरेशी भेट झाली. ‘आईचं घर उन्हाचं’ या त्याच्या गाजलेल्या नाटकामुळे गजेन्द्रचं नाव मला परिचित होतं. त्या सोहळ्यात आमची अगदी १०-१२ मिनिटं भेट झाली पण त्या १० मिनिटांत गजेन्द्रने मला “माझ्या चित्रपटाचं संगीत तू करशील का?” असा प्रश्न विचारला. खरंतर आधीच्या पाच वर्षांत ‘आता आपण चित्रपट करणार’ अशा अनेक लोकांनी दिलेल्या हुलकावणीने मी जरा अशा संवादांबाबतीत सावध झालो होतो. स्टुडिओत आपण रेकॉर्डिंगसाठी उभे राहात नाही तोवर काही खरं मानायचं नाही याच मनःस्थितीत मी होतो. त्यामुळे गजेन्द्रचा प्रस्ताव मी फार गांभीर्याने घेतला नाही.

पण पुढच्याच आठवड्यात गजेन्द्र माझ्या अंधेरीच्या घराच्या दारात येऊन उभा ठाकला.
“पुढच्या दहा दिवसांत चित्रिकरण सुरू करायचं” असा त्याने त्याचा निर्धार बोलून दाखवल्यावर मी जरा उडालोच.

“अरे पण कथा काय आहे? गाण्यांच्या शब्दांचं काय? ध्वनिमुद्रण कधी करणार?”
“कथा आत्ता सांगतो. गाणी आज करायची. पाच गाणी आहेत. मी लिहितो, तू चाली कर.”
खरं तर मला या वेगाने घडणाऱ्या गोष्टींचं दडपणच येतं. पण दुपारच्या जेवणापर्यंत गजेन्द्रने गोष्ट सांगून संपवली. ‘कृष्णाकाठची मीरा’ असं त्या कथेचं नाव होतं. गजेन्द्र एक उत्तम कथेकरी आहे. त्याच्या इतकं उत्तम नॅरेशन मी क्वचितच कुणाचं ऐकलंय. कथा दमवणारी होती कारण त्यात भावनिक चढउतार खूप होते. दुपारचं जेवण झालं आणि आम्ही कामाला बसलो. गजेन्द्र एक गीत लिहून द्यायचा आणि मी चाल करेपर्यंत दुसरं गीत लिहायला घ्यायचा. संध्याकाळी ७ वाजेपर्यंत आमची पाचही गाणी झाली होती!
या पाच गाण्यातलं हे पहिलं गीत – ‘दीस टेकला धरेला, आता जाऊ दे घराला’. गजेन्द्रच्या मनात ‘अभी न जाओ छोडकर’ या ‘हम दोनो’ चित्रपटातला प्रसंग होता. नायिकेला घरी जायचंय आणि नायक तिला थांबण्याचा आग्रह करतोय. चाल करताना ‘आता जाऊ दे घराला’ या नायिकेच्या सुरातली आर्जव मला चालीत आणायची होती. पण त्या आर्जवातली छटाही अशी हवी होती की ती नायकापेक्षाही स्वतःच्या मनाची जास्त समजूत काढतीए! म्हणून ‘जाऊ दे’ या शब्दांच्या वेळी अगदी अनपेक्षित असा कोमल गंधार लावला. त्यामुळे तिचा निर्धार कमी पडतोय हे त्या सुरातून प्रतीत झालं.

एकदा का गाण्याचा मुखडा स्पष्ट दिसू लागला की मग संपूर्ण गाणं अलगद आणि आपोआप उतरतं! या गाण्याचं संगीत संयोजन कमलेश भडकमकरने केलं. अवधूत वाडकर या आमच्या मित्राने गाण्याचं ध्वनिमुद्रण व्हीटू स्टुडिओत केलं. गाण्यासाठी मी माझे अतिशय लाडके असे दोन गायक निवडले – अजित परब आणि योगिता गोडबोले (पाठक).

गजेन्द्रने हा आख्खा चित्रपट केवळ १० लाख रुपयांत केला होता (ज्या काळात सर्वसाधारण मराठी चित्रपटांचं बजेट ३०-३५ लाख रू. असायचं). परंतु मला गाण्यांमध्ये तडजोड नको असल्यामुळे पदरचे पैसे टाकून मी या गाण्यात पं. उल्हास बापट यांना संतूर वाजवण्याकरिता बोलावलं. तसंच इतरही अकुस्टिक वाद्यं वापरली. खूप इच्छा असूनही स्ट्रिंग सेक्शन काही वापरता आला नाही याचं आजही मला दुःख होतं!

दुर्दैवाने ‘कृष्णाकाठची मीरा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. नाही म्हणायला याचा एकच टेक्निकल शो दादरच्या शारदा टॉकीजमध्ये झाला. पण गंमत म्हणजे या गाण्यासाठी अजित आणि योगिता या दोघांनाही राज्यशासनाचा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचा पुरस्कार मिळाला.
याच चित्रपटात या गाण्याचं एक दुःखी व्हर्जनही होतं. ‘छंद ओठातले’च्या पुढच्या भागात त्यावर बोलेन.

What do you think?