‘एका काजव्याची भीक’ – छंद ओठांतले – भाग ३

छंद ओठातले’ या मालिकेला तुम्ही जो भरभरून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आभार. एरवी तयार ऑर्केस्ट्रासहित गाणी ऐकण्याऐवजी केवळ रचना आपल्याला ऐकवावी असा या मालिकेचा हेतू आहे.
मागच्या भागात मी ‘दीस टेकला धरेला’ या ‘कृष्णाकाठची मीरा’ या चित्रपटातल्या गाणं घेतलं होतं. याच चित्रपटात या गाण्याची एक थोडी दुःखी आवृत्तीही करायची होती. हे गाणं चित्रपटाच्या उत्तरार्धात येतं. हिंदी चित्रपटात अनेक अशा गीतांची ‘सॅड’ व्हर्जन्स आपण ऐकतो. त्यात बहुतांश वेळेला मूळ गाण्याची लय जरा कमी करतात आणि चाल तशीच ठेवून गायक तीच चाल थोड्या गंभीर स्वरात अथवा रडत रडत सादर करतात.
या गाण्यात मी लय तर कमी केलीच, शिवाय मूळ रचनेत केवळ एका स्वराचा फरक केला. त्यामुळे गाण्याचा मूड अधिक गडद झाला. शिवाय या गाण्यांत येणाऱ्या ‘सांज’ हा शब्दसुद्धा जरा बारकाईने ऐका. त्याला तीव्र मध्यमाचा एक हलका टच दिला आहे.
गंमत म्हणजे साडीचा जसा ‘फिरता’ रंग असतो, किंवा नाटकात जसा ‘फिरता’ रंगमंच असतो तसा या दोन्ही गाण्यांत ‘फिरता सा’ आहे! आपण गाण्याच्या कुठल्या व्हॅन्टेज पॉइंटवरून या गीताकडे बघतो त्याप्रमाणे ‘सा’ बदलत राहतो आणि त्यामुळे मग जो मला ‘तीव्र म’ वाटतोय तो कुणाला ‘कोमल रे’ही वाटू शकतो. या ‘फिरत्या सा’मुळे या गाण्यात एक संदिग्धता निर्माण होते आणि रचनेचा गूढ किंवा गूढरम्य (‘दीस टेकला धरेला’च्या बाबतीत) भाव वाढवते.
‘दीस टेकला धरेला’ हे गीत धृवपदापासून सुरू होतंं परंतु ‘एका काजव्याची भीक’ हे गीत कडव्यापासून सुरू होऊन धृवपदावर लँड होतं.
ह्या दोन गाण्यांच्या चाली एकत्र ऐकल्या तर ध्यानात येईल की केवळ एक सूर बदलल्यामुळे
दोन्ही गाण्यांचा अक्ष (axis) तोच असला तरी नायिकेच्या जगाची मात्र उलथापालथ झाली आहे!

एका काजव्याची भीक माझ्या काळोख्या रातीला
आणि सांज होता होता तू रे चंद्र मालवला
वेळ थांबली इथेच, जन्म गोठूनच गेला
कशी जाऊ मी घराला?

दीस टेकेना धरेला कशी जाऊ मी घराला?

काय देऊ दोष कुणा, माझ्या एकटीचा गुन्हा
मला भक्ती नाही आली, माझा बेइमान कान्हा
पायाखाली वाट नाही, नाही पाऊल वाटेला
कशी जाऊ मी घराला?

गजेन्द्र अहिरे
मूळ गायिका – योगिता गोडबोले

What do you think?