नको देवराया अंत पाहू आता – छंद ओठांतले भाग ४

काही गाणी आपल्या सिस्टिमचा भाग असतात. ‘आनंदघन’ म्हणजे लता मंगेशकर यांनी ‘साधी माणसं’ या चित्रपटासाठी ‘नको देवराया अंत अता पाहू’ हा कान्होपात्रेचा अभंग मी आता कुठे आणि कधी ऐकला ते आता मला आठवतही नाही. पण व्याकुळ करणारे शब्द आणि काळजाला हात घालणारी चाल आणि पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा कातर करणारा स्वर! या सगळ्यामुळे हे गाणं खूप लहानपणापासून मनाच्या एका कोपऱ्यात वास्तव्याला होतं.
लहानपणी शब्दांचा अर्थ कळायचा नाही पण शब्द गाण्याचा अविभाज्य घटक आहे एवढं मात्र ध्यानात आलं होतं. मग हळूहळू शब्दांचा अर्थ कळत गेला पण त्यांच्यामागचा भाव काय आहे हे पुरतं समजण्याचं शहाणपण नव्हतं. संगीत क्षेत्रात आल्यावर मात्र कान्होपात्रेच्या शब्दांतली आर्तता उमगत गेली.

परंतु दर वेळी हा अभंग ऐकताना काहीतरी खटकायचं. खरं तर इतकी सुंदर चाल, त्यात पंडितजींचा भावविभोर आवाज – काय चुकत असेल? पण हे गाणं ऐकलं की एक अनामिक बेचैनी यायची. मग एक दिवस सहजच हे गाणं गुणगुणत असताना  अचानक एक खुलासा झाला. अभंगाच्या वृत्तात दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणात यमक असतं. म्हणजे हा एकनाथांचा अभंग पहा –

 देह शुद्ध करोनी । भजनी भजावे

आणिकांचे नाठवावे । दोष गुण ॥

किंवा मग तुकारामांचा अभंग बघा –

सुंदर ते ध्यान । उभे विटेवरी

कर कटावरी । धरोनिया ॥

अथवा नामदेवांचा अभंग –

लंबोदरा तुझा । शोभे शुंडादंड

करितसे खंड । दुश्चिन्हांचा ॥

मग पुन्हा एकदा कान्होपात्रेच्या अभंगाकडे नजर गेली. इथे मात्र चित्र वेगळं दिसत होतं.

नको देवराया । अंत अता पाहू

प्राण हा सर्वथा । जाऊ पाहे ॥

‘पाहू’ आणि ‘सर्वथा’? याचा ताळमेळ काही बसेना! कान्होपात्रेनी मीटरची चूक कशी काय केली? बरं! पुढे पहावं तर बरोब्बर सगळं वृत्तात होतं! कारण –

हरिणीचे पाडस । व्याघ्रे धरियेले

मज लागई जाहले । तैसे देवा ।

 

तुजविण ठाव । न दिसे त्रिभुवनी

धावे हो जननी । विठाबाई ॥

 

मोकलोनी आस । जाहले उदास

घेई कान्होपात्रेस । हृदयात ॥

हे पाहिल्यानंतर मात्र माझ्या ध्यानात आलं की कान्होपात्रा काही वृत्तात चूक करेल अशी शक्यता नाही! गाण्यासाठी शब्द बदलल्याची शक्यता जास्त होती इथे. पूर्वी छबिलदास शाळेच्या बाहेर अभंगांची पुस्तकं विकणारे विक्रेते बसायचे. ह्या पुस्तकांतूनही असेच शब्द लिहिले होते जसे ते गाण्यात होते. यावरून इतकंच सिद्ध होतं की आपल्या समाजमनावर गायल्या गेलेल्या शब्दाचा आणि विशेषतः मंगेशकरांनी गायलेल्या शब्दाचा किती पगडा आहे! या घटनेमुळे माझी जिज्ञासा अधिकच चाळवली गेली. मला खात्री होती की कान्होपात्रेचे शब्द वेगळे असणार.

मी शंकर वैद्य सरांना फोन लावला आणि त्यांना माझ्या मनात उपस्थित झालेला प्रश्न सांगितला. शंकर वैद्य सरांनी नेहमीप्रमाणे माझं शांतपणे ऐकून घेतलं आणि म्हणाले – “तुझं म्हणणं बरोबर आहे. मलाही हा अभंग आठवत नाहीए, पण ‘सकल संत गाथा’ या ग्रंथात तुला या अभंगाचे योग्य शब्द सापडतील.”

मी त्वरित मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात जाऊन ‘सकल संत गाथा’ हा ग्रंथ तपासून पाहिला आणि मला या अभंगाचे कान्होपात्रेने लिहिलेले शब्द सापडले! जो शोध लागला त्याने मी चक्रावून गेलो.

कान्होपात्रेने लिहिलेले शब्द होते –

नको देवराया । अंत पाहू आता

प्राण हा सर्वथा । फुटो पाहे ॥

मी एक शोधायला गेलो आणि दुसरंच धन हाताला लागलं होतं! पाणी सापडेल म्हणून जमीन खणायची आणि तिथे तेल लागतं असा आनंद मला झाला. वृत्त तर बरोबर होतंच पण चौथ्या चरणाचे शब्दही वेगळे होते! ते शब्द ‘जाऊ पाहे’ असे नसून ’फुटो पाहे’ असे होते. एका क्रियापदाच्या बदलाने या अभंगाचं पूर्ण डायमेन्शन, त्यातली इन्टेन्सिटीच बदलून गेली होती. ‘जाऊ पाहे’ या शब्दांमध्ये एक निष्क्रिय भाव आहे पण ‘फुटो पाहे’ हे शब्द येतात आणि त्या पहिल्या बंधाची उत्कटता शंभर पटीने वाढते. ‘फुटो पाहे’मध्ये एक प्रतिकार अपेक्षित आहे. निर्विकारपणे प्राण सोडणारा आणि आयुष्यासाठी प्राणांतिक लढा देणारा यांच्यामध्ये जो फरक आहे तो या दोन वाक्प्रचारांत आहे. आणि ‘प्राण हा सर्वथा फुटो पाहे’ असं म्हटलं की ‘हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले’ या ओळीला एक वेगळा अर्थ प्राप्त होतो.

आता ‘आनंदघन’च्या चालीत हे शब्द गाऊन पहा आणि मग शब्द का बदलले असतील याचा अंदाज येतो. या गाण्यात केवळ दुःख नाहीए, तर आकांत आहे, आक्रोश आहे. कान्होपात्रेचे खरे शब्द सापडले याचा आनंद मला झालाच पण एक कमालीची अस्वस्थताही आली. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयातून मी चालत घरी आलो ते कान्होपात्रेचे शब्द गातगातच! रस्त्यात आपल्या मोठ्याने गाताना लोक विचित्र नजरेने आपल्याकडे पाहात असतील याचं भानही मला नव्हतं! घरी पोहोचेपर्यंत या अभंगाला चाल लागली होती.

ही चाल करताना माझ्या मनात आनंदघनच्या चालीबद्दल कायम आदरच होता. या बुजुर्गांच्या खांद्यावर बसूनच मी हे जग पाहतोय याची मला जाणीव आहे. पण शब्द वेगळे असले की संगीत कुठे त्यांना वेगळ्या दिशेला घेऊन जाईल ते मला पहायचं होतं.

पुढे गजेन्द्र अहिरेच्या ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’ या चित्रपटात आपल्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराने व्याकुळ झालेली आई असं पात्र होतं आणि मला या अभंगाची आठवण झाली. मी गजेन्द्रला म्हटलं इथे मुद्दाम गाणं लिहिण्याऐवजी हा अभंग करूया. संजीव चिम्मलगी या प्रतिभावंत गायकाकडून ते गाणं गाऊन घेतलं.

‘छंद ओठातले’ या मालिकेत मी या गाण्याची चाल आपल्याला ऐकवत आहे.

What do you think?