रिमझिम बरसत श्रावण आला… छंद ओठांतले – भाग ११

शांताबई शेळकेंच्या गीतलेखनात एक सिनेमॅटिक क्वॉलिटी आहे. एका गीतातून आपल्या डोळ्यांसमोर ते पात्र, तो प्रसंग, ते वातावरण सगळं उभं राहतं. त्यांच्या चित्रपटबाह्य गीतांतूनही आपल्याला हा गुण दिसतो. मग ते ‘तोच चंद्रमा नभात’ असो किंवा ‘जिवलगा राहिले दूर घर माझे’ असो. नुसत्या चित्रमयतेच्या पलीकडचा हा गुण आहे.

शांताबाईंनी लिहिलेली एक कविता आहे –

रिमझिम बरसत श्रावण आला
साजण नाही आला

या कवितेत पहिल्या ओळीत श्रावण आल्याची घोषणा आहे आणि दुसऱ्या ओळीत विरोधाभास आहे. त्यामुळे श्रावण ‘रिमझिम’ बरसत आला असला तरी त्याचा आनंद मन घेऊ शकत नाही कारण श्रावणाबरोबर साजण आलेला नाही. वरील दोन ओळींमध्ये एक अलिखित ‘पण’ आहे जो कवितेत नसला तरी संगीतातून प्रतीत झाला पाहिजे.

या गीतामध्ये मला ठुमरीची ठेवण आहे असं वाटलं. त्याचं कारण दुसऱ्या कडव्याचे शब्द.

काय करू या तरूण वयाला
फुलुन उमेदी जाती लयाला
गेंद सुके अलबेला…

श्रृंगार, कामुक भावना याबद्दल एकाचवेळी धीटपणे आणि तरीही सूचक असं बोलणं हे ठुमरीचं वैशिष्ट्यच आहे. मग एकदा का या कवितेकडे ठुमरीच्या अंगाने पाहिलं की त्यातलं संगीत दिसायला लागतं. या चालीतही एक धीट असा सूचकपणा आणायचा मी प्रयत्न केला आहे.

झर झर झरती श्रावणधारा
शीतळ गंधित ओला वारा
झोंबत ये पदराला…

या ओळींमध्ये स्पर्श आणि गंध या दोन संवेदनांना आवाहन केलं आहे. शांताबाईंनी किती खुबीने हे गाणं ‘sensual’ ठेवूनही गीताचा पदर जराही ढळू दिला नाहीए ही फार गंमतीची गोष्ट वाटली मला.

थरथरते मी, मी बावरते
हृदय रिते हे करी सावरते
सांगा कुणी सजणाला…

या संपूर्ण गाण्यामधली हुरहुर चालीत आणणं हे माझ्यापुढचं आव्हान होतं. कदाचित या कारणास्तवच मी हे गीत गुणगुणायला लागलो तेव्हा पटदीपचे सूर माझ्या रचनेत अवतरले असावेत. अर्थात हे पटदीप रागातलं गाणं म्हणता येत नाही कारण त्यात अनेक रागाबाहेरचे सूरही लागतात. कातरवेळेची अस्वस्थता अनामिक असते. ती बेचैनी undefined असते. तरीही यात एक श्रृंगार आहे आणि तोही रचनेत उतरायला हवा.

हे गाणं मी रचलं ते एका पाऊसगीतांच्या कार्यक्रमासाठी. बाहेर धो धो पाऊस पडत असताना पार्ल्याच्या लोकमान्य सेवा संघाच्या पु. लं. देशपांडे सभागृहात प्रतिभा दामले या अतिशय गुणी गायिकेने हे गीत सादर केलं, तेव्हा सभागृहात अभिनेते आणि रसिकाग्रणी श्री. मोहनदास सुखटणकर बसले होते. प्रतिभाच्या आवाजतली आर्तता, पावसाळी संध्यकाळ आणि पटदीपचे अस्वस्थ करणारे आणि तरीही हवीहवीशी हुरहुर निर्माण करणारे ते स्वर – या सगळ्यांमुळे गाणं अतिशय परिणामकारक झालं. कडाडून टाळ्या आल्या; परंतु गाणं संपता क्षणी मोहनदासजी उठून सभागृहातून बाहेर गेल्याचं मी पाहिलं आणि जरा अस्वस्थ झालो. यांना गाणं आवडलं नाही की काय? थोड्याच वेळात ते परत आले आणि मला जरा हायसं वाटलं. कार्यक्रम पुढे सुरू राहिला. उत्तरार्धात कधीतरी अचानक सभागृहात सुप्रसिद्ध संगीतकार श्रीधर फडके आले. त्यांची नजर सभागृहात कुणाला तरी शोधत होती. मोहनदासजींनी श्रीधरजींना हात दाखवला आणि श्रीधरजी त्यांच्या शेजारी जाऊन बसले.

मग शेवटच्या गाण्याच्या आधी मोहनदासजी अचानक उभे राहिले आणि म्हणाले –

“ते ‘रिमझिम बरसत श्रावण आला’ हे गाणं जरा परत म्हणा. मी श्रीधरला खास ते ऐकण्यासाठी बोलावून घेतलंय.”

मोहनदासजी गाणं संपल्यानंतर बाहेर का गेले होते याचा उलगडा झाला! मी दोघांनाही स्टेजवरून नमस्कार केला आणि प्रतिभाने गाणं पुन्हा सादर केलं. गाणं झालं आणि पुन्हा तितक्याच कडाडून टाळ्या आल्या.

या गाण्याची ही आठवण मी कधीही विसरू शकणार नाही.

© कौशल इनामदार

1 Comment

  1. […] विचार करतो आणि मनात येतं – ते कदाचित शांताबाईंच्या कवितेमधले ‘साजण नाही आ…चे सूर तर नसतील! या विचाराने माझ्या […]

What do you think?