चार दिवस सासूचे – छंद ओठांतले – भाग ६

‘चार दिवस सासूचे’ मालिका नुकतीच प्रदर्शित व्हायला सुरुवात झाली होती. एका समारंभात मला मराठीतला एक सुप्रसिद्ध दिग्दर्शक भेटला. मला पाहिल्याबरोबर तो जरा छद्मी हसला आणि म्हणाला – “अरे काय गाणं केलंस तू हे? चार दिवस सासूचे?! अशी काय चाल केलीस?”

त्याच्या प्रश्नातला कुत्सित सूर माझ्यापासून लपून राहिला नव्हता. पण मीही त्याच्याबरोबर हसलो आणि म्हणालो – “मला मजा आली म्हणून!”

‘चार दिवस सासूचे’ या मालिकेच्या शीर्षकात चारच दिवस असले तरी ही मालिका तब्बल अकरा वर्षं चालली. अनेक वर्षं ते गाणं लोकांच्या ओठांवर राहिलं.

खरं सांगायचं तर पहिल्यांदा ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेचे निर्माते नरेश बोर्डे  आणि दिग्दर्शक खलील हेरेकर माझ्याकडे या मालिकेचा प्रस्ताव घेऊन आले तेव्हा हे गीत कसं काय होईल याबद्दल मीही जरा साशंक होतो.

मालिका ही मेलोड्रामा असल्यामुळे गाणं भावनेला आवाहन करणारं असायला हवं असा एक दंडक होता. ‘प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालणारी’ दैनंदिन मालिका, अर्थात ‘सोप ऑपेरा’ असा या मालिकेचा पोत असणार होता. गाणं हळुवार, भावनिक असायला हवं, त्यात भावनांचे विविध विभ्रम हवेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निर्माता-दिग्दर्शकांचा आग्रह होता की मालिकेचं शीर्षक गाण्यात आलं पाहिजे. पण ‘चार दिवस सासूचे’ या शब्दांना काय चाल देणार! त्याला काही एक ठराविक मूड नाही.

खरं सांगायचं तर मी हे करू शकेन का नाही याबद्दल मला शंका होती. ‘मेलोड्रामा’ – त्यात दैनंदिन मालिका हा प्रकार आवडण्याकरिता एक भाबडेपणा लागतो आणि त्या दिशेने विचार करायची एक सवयही लागते. खाष्ट सासू आणि गरीब बिच्चारी सून वगैरे गोष्ट मलाच फार रुचेल असं मला वाटत नव्हतं. आणि तेही एकवेळ मी जमवलं तरी ‘चार दिवस सासूचे’ या शब्दांना इमोशनल चाल देणं मला खचितच जमणार नाही याची खात्री होती. पण नरेश बोर्डे आणि खलील हेरेकर यांचा त्यांच्या संकल्पनेवर पूर्ण विश्वास होता आणि त्यांचं पॅशन, त्यांचा उत्साह संसर्गजन्य होता. शिवाय लोक अतिशय चांगले होते. आजवरच्या माझ्या व्यावसायीक आयुष्यातले मला भेटलेल्या चांगल्या, प्रामाणिक निर्मात्यांपैकी हेरेकर आणि बोर्डे ही जोडी आहे. आणि का कोणास ठाऊक पण माझा स्वतःवर नव्हता इतका विश्वास त्यांचा माझ्यावर होता.

“काहीही झालं तरी हे गाणं तुम्हीच करायचं असं आम्ही ठरवलं आहे.” असं त्यांनी मला बजावलं होतं.

प्रा. अशोक बागवे हे शीर्षकगीत लिहिणार होते. मी त्यांना विचारलं की या सगळ्या अटींचा विचार करता ‘चार दिवस सासूचे’ हे शब्द गाण्यात कसे बसवता येतील. बागवे सर मला म्हणाले, “काळजी करू नकोस. आपण बरोबर बसवूया.”

बागवे सर शीघ्रकवी असल्यामुळे त्यांनी लगेचंच गाणं लिहून दिलं.

कशी म्हणावी जीवनगाणी

डोळ्यांमधले खारट पाणी

गालांवरती ओघळणाऱ्या मंद मंद हासूचे

चार दिवस सासूचे

 

चार पावलांवरती वावर

अडखळतांना मजला सावर

फडफडत्या जखमी पदरावर थेंब थेंब आसूचे

चार दिवस सासूचे

 

एक बहरते एक उसवते

लाटेवरती लाट घसरते

काळजातल्या काठापुरते मोहर आभासाचे

चार दिवस सासूचे

 

बागवे सरांनी यमक तर उत्तम जुळवलं होतंच पण निर्माता-दिग्दर्शकांच्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या होत्या; आणि माझं काम खूप सोपं केलं होतं. तरी तुमच्याही लक्षात येईल की ‘चार दिवस सासूचे’ या शब्दांचा आणि त्याच्या आधी येणाऱ्या तीन ओळींचा अर्थाच्या दृष्टीने काहीही संबंध नव्हता! पण त्याला इलाजही नव्हता! ‘चार दिवस सासूचे’ या शब्दांच्या आधी काहीही आलं असतं तरी हाच प्रश्न निर्माण झाला असता.

माझ्यावरची जबाबदारी आता स्पष्ट होती. एक लक्षवेधी चाल तर करायचीच होती आणि त्यात मालिकेचं नावही ठसठशीतपणे यायला हवं होतं. पण पहिल्या तीन ओळीत आलेल्या हळुवार, भावनांनी ओतप्रोत भरलेल्या शब्दांनंतर ‘चार दिवस सासूचे’ हे शब्द येतात तेव्हा अचानक मिठाचा खडा लागल्यागत होऊ नये याची काळजी घ्यायची होती.

मालिकेचं शीर्षक जिथे येतं ती एक प्रकारे मालिकेची ‘अनाउन्समेन्ट’ असते. त्यामुळे शक्यतो हे शीर्षक सप्तकाच्या वरच्या भागात यायला हवं. मी गमतीने म्हणतो की शेजारी जरी टीव्ही लागला तरी आपल्या घरी कळायला हवं की मालिका सुरू झाली आहे!

पण माझ्यासाठी तरीही ‘चार दिवस सासूचे’ हे शब्द गाण्यात येणं जरा नापसंतीचंच होतं. अशा वेळी मग मी त्या रचनेमध्ये काहीतरी गंमत करता येतीए का ते पाहतो. महाभारतात जसे व्यासांनी गणपतीच्या लिखाणाचा वेग कमी व्हावा म्हणून कूटश्लोक पेरले तशी ‘चार दिवस सासूचे’ हे गीत एक कूटरचना आहे. म्हणजे असं बघा, तुम्ही समजा हे गीत सुरूवातीपासून म्हणून पाहिलं आणि ‘चार दिवस सासूचे’ हे शब्द म्हणून पुन्हा ‘कशी म्हणावी जीवनगाणी’ हे धृवपद गायलात तर तुम्ही एक पट्टी खाली आले असता! तुमच्याही नकळत ही पट्टी उतरते!

या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाविषयी आणखी एक गमतीशीर आठवण आहे, याचं संगीत संयोजन माझा मित्र समीर म्हात्रे याने केलं आहे. १९९९ किंवा २००० साली जेव्हा संगणकावर ध्वनिमुद्रण ही तुलनेने नवी गोष्ट होती तेव्हा हे गीत मी माझ्या घरी ध्वनिमुद्रित केलं आहे. मनीष कुलकर्णी या माझ्या मित्राने गिटारही माझ्या घरी येऊन रेकॉर्ड केली आणि भूपाल पणशीकर या माझ्या मित्राने सतारही अशीच रेकॉर्ड केली. फक्त महालक्ष्मी अय्यरचं डबिंग करण्यापुरतं आम्ही स्टुडिओत गेलो होतो. २० वर्षांपूर्वी घरातल्या संगणकावर गाणं ध्वनिमुद्रित होतं याचंही लोकांना आश्चर्य वाटायचं.

चार दिवस म्हणत म्हणत ही मालिका ११ वर्षं चालली आणि मालिकेच्या निमित्ताने हे शीर्षकगीतसुद्धा! आपल्याला विशेष रुचणारं काम आपण आवडीने करतोच; पण या गाण्याने मला शिकवलं की प्रत्येक कामात आपल्याला रुचणारी एक तरी जागा आपण शोधून काढू शकतो.

© कौशल इनामदार

What do you think?