रात्र भिजली
कापऱ्या तंद्रीत
पाने निजली…
मंगेश पाडगांवकरांची ‘जिप्सी’ संग्रहातली कविता वाचली आणि वाचून पुढे गेलो. पुढे गेलो, पण याच्या पुढचा बंध सतत मनात विहरत राहिला.
काजवा उडे
एकला झुरत
मालवे… बुडे
तीनच ओळी. दोनच शब्द. धृवपद – कडवं असा पॅटर्न नाही. खरं तर कुठल्याच अंगाने गेय अशी ही कविता नाही. तरी हे शब्द मी पुन्हा वाचले, तेव्हा मला त्यात एक सुरावट दिसली. एक गाणं दिसलं. तो काजवा माझ्या मनात सतत उडायचा, पेटायचा, मालवायचा आणि अंधारात बुडून जायचा आणि मग एखाद्या फिनिक्स पक्ष्यासारखा पुन्हा एकदा उडायचा! मला त्या चलचित्रात एक स्वरचित्रही दिसू लागलं.
या गाण्यात धृवपदातून अंतरा आणि मग पुन्हा धृवपदावर येणं असा पारंपरिक प्रवास अपेक्षितच नव्हता. हायकूसारखे असणारे हे बंध; पण त्यात एक तुटक सलगता होती. क्षणचित्रं होती; पण सुसूत्र होती. म्हणून प्रत्येक बंधाची पहिली ओळच त्या कडव्यापुरतं ‘धृवपद’ म्हणून वापरलं… उदा.-
निथळे हळू
मधेच एखादा
थेंब लाजाळू
निथळे हळू…
रचनेत प्रत्येक बंधात आलेल्या चलचित्राचा स्वरांमध्ये अनुवाद करायचा प्रयत्न केला आहे. हायकूमध्ये ५-७-५ अशी अक्षरसंख्या असते. पाडगांवकरांच्या या कवितेत ५-६-५ अशी अक्षरसंख्या आहे.
दाट सावल्या
पागल… मंथर…
भारावलेल्या
या ओळींनंतर पाश्चात्य संगीतात येतो तसा स्केल चेंज साधायचा प्रयत्न केला कारण भारावलेपण स्वरांतून उलगडून दाखवायचं होतं. पराकोटीचा उत्कट क्षण आपण अनुभवतो तेव्हा एका वेगळ्याच डायमेन्शनमध्ये गेल्याचा जो अनुभव मिळतो त्याची स्वरांतून पुनरावृत्ती करण्याचा इथे हेतू होता.
गाण्याच्या शेवटी मात्र ‘रात्र भिजली… कापऱ्या तंद्रीत पाने निजली’ हे शब्द पुन्हा येतात आणि ‘रात्र भिजली’चा प्रतिध्वनी आपल्याला ऐकू येत राहतो.
हे गाणं मी ‘रात्र भिजली’ या अल्बमसाठी ध्वनिमुद्रित केलं होतं समीर दाते आणि महालक्ष्मी अय्यर यांच्या आवाजात. पण दुर्दैवाने ह्या अल्बमची मास्टर टेप तुटली आणि आता हे गीतच उपलब्ध नाही. कधीतरी पुन्हा ध्वनिमुद्रित करेन पण तोवर संगीतकाराच्याच आवाजात ह्याची धून ऐका!
© कौशल इनामदार