मन चिंब पावसाळी – छंद ओठांतले – भाग ८

Man Chimb Pavasali

२०११ सालच्या जुलै महिन्यातले दिवस होते. मी नागपूरला एका कार्यक्रमानिमित्त गेलो होतो. दुसऱ्या दिवशीच मुंबईला परत येण्याचा बेत होता. कार्यक्रम झाल्यावर फोन तपासला तर नितीन देसाईंचे अनेक मिस्ड कॉल्स दिसले. मी फोन लावला. नितीन देसाईंनी विचारलं –

“कुठे आहेस?”

मी म्हटलं – “नागपूरला आलोय कार्यक्रमासाठी. उद्या येतोय परत मुंबईला.”

“तू एक काम कर. मुंबईला येऊ नकोस. तू नागपूरहून इथे ना. धों. महानोरांकडे थेट पळसखेडला ये. तिथून गाडीची सोय करतो मी.”

गेले काही दिवस महानोरांच्या ‘अजिंठा’ या दीर्घकाव्यावर चित्रपट करायचं चाललं होतं. पण सगळ्या हालचालींना इतक्या लवकर इतका वेग येईल असं मला वाटलं नव्हतं. मी रात्रभर प्रवास करून पहाटे पळसखेडला पोचलो. सकाळी महानोरांच्या शेतावर गेलो आणि तिथून त्यांनी आम्हाला अजिंठ्याला नेलं.

गाडीत बसल्याबसल्या महानोरांनी माझ्या हातात कवितेचं बाड दिलं. त्यांनी पद्धतशीरपणे सगळ्या कविता नीट एकत्र केल्या होत्या.

“ही गाणी करायची आहेत.”

Mahanor & I

 

ते बाड हातात घेताना आपण एक फार मोठी जबाबदारी स्वीकारत आहोत हे मला जाणवत होतं. मी लगेच एक एक कविता चाळायला घेतली. त्यातल्या एका कवितेने माझं लक्ष वेधून घेतलं.

मन चिंब पावसाळी

झाडांत रंग ओले

घनगर्द सावल्यांनी

आकाश वाकलेले…

लेण्यांमध्ये पोहोचलो आणि महानोरांनी एकेका चित्रामागची, एकेका शिल्पामागची कथा सांगायला सुरुवात केली. आकाशात ढग दाटून आले होते आणि माझ्या मनातून ‘मन चिंब पावसाळी’ हे शब्द काही जाईनात.

मध्येच भुर्भुर पाऊस सुरू झाला आणि नितीन देसाई मला म्हणाले, “बघ चाल    सुचतीए का?

मी लगेच म्हणालो – “सुचली!”

तिथल्या तिथे मी ‘मन चिंब पावसाळी’ हे गीत पहिल्या कडव्यापर्यंत म्हणून दाखवलं. त्या लेण्यांचं वातावरण, तो पाऊस आणि माझ्या मनात सकाळपासून पिंगा घालत असलेले शब्द या सगळ्याचं नवनीत म्हणजे ती चाल होती!

चाल करण्याच्या आधीचा काळ कधीकधी अतिशय एकाकी असतो. मी गाडीत आणि लेण्यांमध्ये सगळ्यांबरोबर होतो तरी एकटा होतो. सर्जन हे दर वेळीच तुम्हाला उत्तेजित करत नाही. अनेकदा ते अंतर्मुखच करतं. “काय चाल दिलीए मी!” – यातला ‘मी’ कधीकधी सर्जनाच्या सगळ्या थकव्यात गळून पडतो.

या गाण्याच्या धृवपदातच एक ओलेपणा आहे. त्या ओलेपणामुळे आलेला एक सुखद जडपणा आहे आणि त्यातून आलेला एक संथपणाही आहे. ‘पाऊस पाखरांच्या पंखात थेंबथेंबी’ या ओळीच्या चालीतही कॅमेऱ्याचा क्लोजअप असावा असा भास आहे; आणि म्हणूनच गातानाही आपोआप तिथे आवाजाचा व्हॉल्यूम कमी होतो.

ही चाल एका धुंदीत झाली त्यामुळे त्यात एक सलगता होती. त्यामुळे चालीतले भाव हे शब्दांप्रमाणे आपोआप आले आहेत. तरी एक गोष्ट मी जागृकपणे केली आहे. तुम्ही नीट ऐकलंत तर तुमच्या ध्यानात येईल की दोन्ही कडव्यांची चाल सारखीच असली तरी शेवटच्या ओळीत एक छोटासा बदल केला आहे.

आकाश पांघरोनी मन दूर दूर जावे – या ओळीत ‘दूर दूर जावे’ म्हणताना तारसप्तकात गाणं घेऊन गेलोय परंतु ‘राजा पुन्हा नव्याने उमलून आज यावे’ या ओळीत ‘उमलून आज यावे’ हे शब्द मात्र आतून उमलून आल्याचाच भाव प्रकट करतात.

हे गीत आधी चित्रपटात एका वेगळ्या प्रसंगात असणार होतं. रॉबर्ट गिल पहिल्यांदा पारूला पाहतो त्या प्रसंगी हे गीत असणार होतं आणि म्हणून मी ठरवलं होतं की हे गीत डुएट करायचं. मिलिंद इंगळे आणि हम्सिका अय्यरच्या आवाजात हे करावं असा माझा विचार होता. पण पटकथा लिहिताना या गीताची जागा बदलली आणि एक सोलो गाणं करावं लागलं.

या गाण्याचं फार उत्कृष्ट ध्वनिमुद्रण मिथिलेश पाटणकर या प्रतिभावंत संगीतकाराने केलं.

हम्सिकाने हे गीत ऐकलं तेव्हा तिच्या डोळ्यात मला एक चमक दिसली. हे गाणं आपल्यासाठीच आहे असं सांगणारी ती चमक होती. कुठल्याही संगीतकाराला आपल्या गायकाच्या डोळ्यात ती चमक बघण्याची कायम आस असते.

नितीन देसाईंच्या स्टुडिओत आम्ही हे गाणं एका संध्याकाळी रेकॉर्ड केलं. मला ते आवडलं होतं पण हम्सिका मात्र समाधानी नव्हती. रात्री तिचा मला फोन आला.

“कौशल, हे गाणं रात्रीच्या नीरव शांततेत रेकॉर्ड करूया. मी हे आणखीन चांगलं गाऊ शकेन.” ती म्हणाली.

मी किट्टू म्याकलला (आमचा ध्वनिमुद्रक मित्र) फोन लावला आणि विचारलं रात्री १ वा करायचं का रेकॉर्डिंग? तो त्वरित हो म्हणाला.

आम्ही रात्री दीड ते साडे तीन या वेळात या गाण्याचं ध्वनिमुद्रण केलं. हम्सिकाच्या आवाजात तुम्ही हे गाणं ऐकलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की रात्रीची नीरवता, एकांत हा सगळा तिच्या आवाजात एकवठलाय. आम्ही अतिशय समाधानी होऊन पहाटे सटुडिओतून बाहेर पडलो तेव्हा भर थंडीतही आमची मन चिंब भिजलेली होती!

© कौशल इनामदार

 

मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले ।

घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले ॥

पाऊस पाखरांच्या पंखात थेंबथेंबी

शिडकाव संथ येता झाडे निळी कुसुंबी

 

घरट्यात पंख मिटले झाडात गर्द वारा

गात्रात कापणारा ओला फिका पिसारा

या सावनी हवेला कवळून घट्ट घ्यावे ।

आकाश पांघरोनी मन दूरदूर जावे ॥

 

रानात एककल्ली सुनसान सांजवेळी ।

डोळ्यात गल्बताच्या मनमोर रम्य गावी ॥

केसात मोकळ्या या वेटाळुनी फुलांना

राजा पुन्हा नव्याने उमलून आज यावे.

 

मन चिंब पावसाळी मेंदीत माखलेले ।

त्या राजवन्शी कोण्या डोळ्यात गुंतलेले ॥

ना. धों. महानोर

What do you think?