सुधीर फडके – सुरांतून चित्र तयार करणारा जादुगार

साल २००१. स्थळ वांद्र्याच्या एका रेस्टराँचा मॅझनाइन मजला. दोन टेबल. एका टेबलावर एक पंजाबी कुटुंब – दोन मुलं, आई, वडील आणि आजी-आजोबा. शेजारच्या टेबलावर विविध वयातले साधारण दहा-बारा लोक.  या पंजाबी कुटुंबाला आपल्या शेजारच्या टेबलावर एक ऐतिहासिक बैठक सुरू आहे याची सुतराम कल्पना नाही.

मला मात्र हा इतिहास उलगडतांना दिसत होता. कारण त्या दहा-बारा लोकांमधला वयाने सगळ्यात लहान सदस्य मी होतो. निमित्त होतं मराठी भावसंगीतातले एक मोठे संगीतकार पं. यशवंत देव यांच्या पंच्याहात्तरीचं. देवकाकांनी त्यांच्या पंच्याहात्तराव्या वाढदिवसानिमित्त मराठीतल्या त्यांच्या आवडत्या संगीतकार आणि संगीत संयोजकांना या हॉटेलमध्ये जेवायला बोलावलं होतं. यात सर्वश्री सुधीर फडके, दत्ता डावजेकर, श्रीनिवास खळे, कमलाकर भागवत, अशोक पत्की, श्रीधर फडके, नंदू होनप, विलास जोगळेकर, आप्पा वढावकर, मिलिंद जोशी होते. सोबत देवकाकांचा पुतण्या आणि उत्कृष्ट गिटारवादक ज्ञानेश देव होता, सौ. करुणा देव होत्या, आणि मिलिंदची बायको, गायिका मनीषाही होती. जणू मराठी संगीताची आकाशगंगाच जमिनीवर अवतरली होती! देवकाकांनी आपल्याला आवडत्या संगीतकारांपैकी एकाचा दर्जा देणं यात मला पद्मश्री मिळाल्याचा आनंद तर होत होताच, पण मराठी संगीतातले माझे आदर्श माझ्या समोर बसले होते याचा जास्त आनंद होता.

ती संध्याकाळ भारलेली होती इतकंच मला आता आठवतंय. त्या भारलेल्या वातावरणाचा स्पर्शही न होता शेजारचं पंजाबी कुटुंब घरी निघून गेलं पण आम्ही सगळे हॉटेल बंद होईपर्यंत तिथेच गप्पा मारत बसलो. यशवंत देवांनी तिथे जमलेल्या प्रत्येक संगीतकारावर एक चार ओळींची कविता लिहिली होती. बुजुर्ग संगीतकारांमध्ये संगीताबद्दल गप्पा रंगल्या, संगीताच्या सोनेरी दिवसांच्या आठवणींना उजाळा मिळाला. मी डोळे विस्फारून या दिग्गजांकडे पाहत होतो आणि कान टवकारून त्यांचा प्रत्येक शब्द साठवत होतो.

शेवटी निरोपाचा क्षण आला. अगदी जाता जाता श्रीधर फडकेंनी मला एका कोपऱ्यात नेऊन विचारलं –

“तू कसा आला आहेस? दादरलाच जाणार आहेस ना?”

“गाडी आहे. हो. दादरलाच चाललोय.”

“जरा बाबूजींना सोडशील का घरी?” माझा विश्वासच बसे ना. खुद्द सुधीर फडकेंना त्यांच्या घरी पोहोचवण्याचा बहुमान मला मिळत होता. मी लगेच होकारार्थी मान डोलावली.

श्रीधरजी पुढे म्हणाले – “आणि महत्त्वाची गोष्ट – त्यांचा जरा तोल जातो तर वर घरापर्यंत सोड. त्यांचा स्वभाव स्वाभिमानी आहे त्यामुळे ते नको म्हणतील पण काहीही कर आणि घराच्या आतपर्यंत सोडूनच ये.”

श्रीधरजींनी बाबूजींना सांगितलं की मी त्यांना सोडेन. आम्ही गाडीत बसलो. वांद्रा ते दादर बाबूजींनी फार आपुलकीने माझी चौकशी केली. तो वेळ कसा गेला हेच मला कळलं नाही. शिवाजी पार्कजवळ ‘शंकर निवास’ या त्यांच्या निवासस्थानी पोहोचलो तसे ते म्हणाले –

“तुम्ही मला इथेच सोडा. मी जाईन वरती.” त्यांच्या बोलण्यात करारीपणा होता. पण मला तर श्रीधरजींची आज्ञा होती की वरपर्यंत सोडायला जा!

“मी वर येतो…” असं मी म्हणेस तोवर बाबूजींनी – “त्याची गरज नाही. मी एकटा जाईन.” असं ठामपणे म्हटलं. आता आली का पंचाईत! तेवढ्यात मला एक युक्ती सुचली.

मी म्हटलं – “बाबूजी, मला पाणी हवंय.”

बाबूजी क्षणभर थबकले आणि लगेचच म्हणाले – “हुशार आहात – मला ठाऊक आहे की तुम्हाला श्रीधरने मला वरपर्यंत सोडायला सांगितलं आहे. आणि तुम्हाला ठाऊक आहे की मी पाण्याला नाही म्हणणार नाही. तेव्हा चला आता वर. पण मला जिने चढायला वेळ लागतो आता वयामुळे. तुम्हाला चालेल ना?”

‘शंकर निवास’चा तो दोन मजली जिन्याचा प्रवास मी आयुष्यात विसरणार नाही. एका भारलेल्या संध्येची रात्र ही तितकीच भारलेली असणार आहे हे मला कळून चुकलं. आम्हाला २ मजले चढायला २० मिनिटं लागली. दर चार-पाच पायऱ्यांनंतर बाबूजी एक छोटी विश्रांती घेत आणि मग पुढे चालत. त्यांचा स्वभाव गप्पिष्ट असणार हे उघडच आहे कारण या २० मिनिटात त्यांनी त्यांच्या कारकीर्दीतल्या अनेक गोष्टी मला सांगितल्या. त्यावेळी होणारं ध्वनिमुद्रण, श्यामराव कांबळेंसारखे संगीत संयोजक, आशाबाईंकडून गाऊन घेण्याचा त्यांचा अनुभव, कसं हिंदीतली त्यांची बहुतांश गाणी लताबाईंनी गायली आहेत, बालगंधर्वांबद्दल त्यांची श्रद्धा, आणि त्यांची निर्मिती असलेल्या ‘विठ्ठल रखुमाई’ या चित्रपटात बालगंधर्वांनी केलेलं काम अशा अनेक विषयांवर ते बोललेलं मला अंधुकसं आठवतंय पण नेमकं काय बोलणं झालं याची माझी स्मृती फारच अस्प्ष्ट आहे, इतका मी त्या घटनेने संमोहित झालो होतो. प्रत्येक मजल्यावर बाबूजींच्या कारकीर्दीतला एक जुना कृष्णधवल फोटो लावला होता असं मला अस्पष्ट आठवतंय. त्या वीस मिनिटात बाबूजींनी कृष्णधवल काळात एक सैरसपाटा करून आणला.

आम्ही वर पोहोचलो. ललिताताई (श्रीधरजींच्या आई) जाग्याच होत्या. बाबूजींनी माझी ओळख करून दिली आणि म्हणाले – “यांना पाणी द्या. त्यासाठीच हे वर आलेत!”

हा दोन मजल्यांचा प्रवास माझ्यासाठी बरंच काही देऊन जाणारा प्रवास ठरला. आपल्या आवडत्या संगीतकाराबरोबर असा वेळ घालवता येणं हे एक प्रकारचं वरदानच आहे असं मला वाटतं.

सुधीर फडकेंच्या संपूर्ण कारकीर्दीचा वेध घ्यायला एक लेख अपुराच पडेल पण त्यांच्या संगीताचं आकर्षण माझ्यासारख्या नंतरच्या पिढीतल्या संगीतकाराला का वाटलं हे सांगण्याकरता केवळ एका गाण्याचाही दाखलाही पुरेसा आहे.

सुधीर फडकेंच्या संगीताची मोहिनी माझ्यावर पडण्याचं एक प्रमुख कारण असं असावं की त्यांना चित्रपट हे माध्यम किती बारकाईने कळलं होतं. लाखाची गोष्ट, जगाच्या पाठीवर, सुवासिनी, चंद्र होता साक्षीला, आम्ही जातो आमच्या गावा, अशा अनेक चित्रपटातली त्यांची गाणी ही गाणी म्हणून सुंदर आहेतच पण चित्रपटात चपखल बसतात. कमीतकमी वाद्यांतसुद्धा जास्तीत जास्त नाट्य केवळ चालीद्वारे उभं करण्याची अवघड किमया ते लीलया करायचे.

चित्रपट संगीत नसतानाही केवळ संगीतातून दृश्यात्मकता निर्माण केली आहे असं ‘गीतरामायण’ हा तर मराठी संगीतसृष्टीतला एक चमत्कार आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही.

गीतरामायण ही एक अद्भुत कलाकृती आहे ती अनेक कारणांसाठी. एक कवी, एक संगीतकार, एक कथा आणि ५६ गाणी. मला या कलाकृतीचं सर्वात मोठं बलस्थान हे वाटतं की विषय ठरला असून, डेडलाइनवर काम करून देखील संपूर्ण कलाकृती तिची सहजता गमावत नाही. सहजता असावी लागते. ती निर्माण करता येत नाही. आणि तरीही या दोन थोर कलाकारांनी ती निर्माण केली आहे. ही गीतरामायणाची किमया आहे.

मला स्वतःला गीतरामायणाची ‘अनुभव’ निर्माण करण्याची क्षमता अचाट वाटते. चित्रपटसंगीताचं उत्तम ज्ञान दोन्ही कलाकारांना असल्यामुळे गीतरामायणाला एक ‘सिनेमॅटिक क्वॉलिटी’ आहे. आपण गीत ऐकत असतांना आपल्यापुढे चित्र तर निर्माण होतंच, पण आपणही त्या काळाचा, वातावरणाचाच एक भाग आहोत असं वाटू लागतं. सुधीर फडके लहानलहान गोष्टींचा उपयोग करून अचूक वातावरणनिर्मिती करतात.

उदा.‘राम जन्मला’ हे गीत एक घोषणा आहे, हे सप्तकाच्या वरच्या सूरापासून सुरू होतं यवरूनच स्पष्ट होतं. या गीताची लय उत्सवाचं वातावरण निर्माण करते. त्याउलट ‘पराधीन आहे जगती’ या गीताची सुरुवात सप्तकाच्या खालच्या सुरापासून होते. गीताची लयही अशी आहे की आपल्याला अंतर्मुख करण्यासाठी पुरेसा वेळ देते. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे – या एका कलाकृतीतच सर्व नवरसांचा अंतर्भाव आहे. एकीकडे ‘माता न तू वैरिणी’सारखं रौद्ररसाचं गीत आहे आणि दुसरीकडे ‘तात गेले, माय गेली’मध्ये करूणरसाचं दर्शन घडतं तर ‘सूड घे त्याचा लंकापती’मध्ये बीभत्स रसाची झाक दिसते.

आपण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे गीतरामायण ही कलाकृती रेडियो या माध्यमासाठी तयार केली होती. मी वर म्हटल्याप्रमाणे बाबूजींची चित्रपटसंगीतावरची पकड इतकी जबरदस्त होती की त्यांना गीतातलं नाट्य उत्तम समजायचं. फक्त गोड सुरावट म्हणजे गाणं नाही हे सत्य त्यांना पुरेपूर उमगलं होतं. गाणं हा एक संपूर्ण अनुभव म्हणून बाबूजी आपल्यासमोर सादर करायचे. परिणामी नुसतं गाणं ऐकूनही त्याची चित्रफीत रसिकांच्या मनात समांतर चालायची!

बाबूजींचा संगीतकार-गायक म्हणून विचार केला तर कळेल की त्यांना चित्रपट आणि रेडियो या दोन्ही माध्यमांची समज किती सखोल आणि शहाणी होती. गीत रामायण रेडियोकरिता केलं होतं. तिथे फक्त श्राव्य माध्यमातून चित्र उभं करायचं असतं. त्यामुळे गातांना जरा भावनातिरेक तिथे गाण्याची परिणामकारकता वाढवतो. पण चित्रपटात मात्र दृश्य हे आपल्या इतर संवेदनांवर हावी होतं. तिथे गाण्यात भावनातिरेक टाळायला हवा आणि या सात्क्षात्काराची प्रचिती तुम्हाला बाबूजींच्या गाण्यात येते.

वर सांगितल्याप्रमाणे संगीतकार म्हणून त्यांना चित्रपट हे माध्यम किती अवगत होतं हे सांगण्याकरिता केवळ एकाच गाण्याचा दाखला पुरेसा आहे.

मुंबईचा जावई मधली सगळीच गाणी एकापेक्षा एक आहेत. पण माझ्या मनातला एक कोपरा मी ओनरशिप बेसिसवर ‘का रे दुरावा, का रे अबोला?’ या गाण्यासाठी दिला आहे! या गाण्याबद्दल सारं काहीच जमून आलंय. रजिता ठाकूर आणि अरूण सरनाईक यांचा अभिनय, गदिमांचे शब्द, सुधीर फडकेंचं संगीत, आणि आशा भोसलेंचा आवाज! मला नेहमी वाटतं की चांदण्यांचा म्हणून काही आवाज असेल तर तो आशा भोसलेंचा आवाज असेल. म्हणूनच ‘केव्हांतरी पहाटे…’ मध्ये ‘उरले उरांत काही, आवाज चांदण्याचे’ हे आशाबाईंनी गावं हा मला एक दैवी योग वाटतो! आणि याच आवाजामध्ये ‘हात चांदण्याचा घेऊनी उशाला’ असे शब्द येतात तेव्हां आपल्या अंगावर कुणी चांदणं शिंपडल्याचा भास होतो!

‘का रे दुरावा?’ या गाण्यात अनेक गोष्टी मला वेळोवेळी जाणवत राहतात आणि या गाण्याची गोडी माझ्यासाठी अवीट राहते. प्रथम मला ‘का रे दुरावा…’ या शब्दांमधला आणि चित्रपटातल्या दृश्यातला विरोधाभास जाणवतो. एका चाळीच्या आखुड खोलीत एक एकत्र कुटुंब! जागेचा अभाव… पडदे लावून खोलीची विभागणी केलेली… दोन जोडपी… एक नुकतंच लग्न झालेलं जोडपं – पण जागे अभावी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी झोपावं लागतंय. दुसरं जोडपं – जरा लग्नात स्थिरावलेलं… लग्नात स्थिरावलेल्या कुठल्याही जोडप्याच्या आयुष्यात येणारे काही मधुर अस्थिरतेचे क्षण – भांडण, चिडचिड, अबोला! आणि अबोल्यानंतर पुन्हा समेटाकडे वाटचाल! एकाच पलंगावर शेजारी शेजारी लवंडलेले नायक – नायिका… आणि तरीही हा ‘दुरावा’. या विरोधाभासामुळे गाण्यातलं नाट्यही अधिक रोमांचक होतं. गाण्यातही एक कथानक आहे, आणि गाणं हे कथानक पुढे नेतं, असंही आपल्याला दिसून येतं. दोन नायिकांपैकी एक नायिका हे गीत गात आहे, पण दुसऱ्या नायिकेलाही ते गाणं आपलंच मनोगत वाटतं – या दिग्दर्शकाने आणि पटकथाकाराने मांडलेल्या कल्पनेला हे गीत अचूक न्याय देतं!

चेतन दातार आम्हाला नाटक शिकवत असताना म्हणत असे – “लेखक न बोलता, पात्र बोललं पाहिजे!”

या गाण्यामध्ये गदिमांनी आणि सुधीर फडकेंनी नेमकं हेच साधलंय! ‘इथे संगीतकार दिसतो!’ अशा जागा गाण्यात न दिसता नायिकाच हे गाणं रचते आहे… किंबहुना हे गीत नसून एक सुरेल संवाद आहे असं आपल्याला वाटू लागतं. खरं तर आजच्या गाण्यांच्या तुलनेत या गाण्यात कोरियोग्राफर नाहीत, कॉस्च्युम चढवलेल्या (अथवा न चढवलेल्या!) नर्तिका नाहीत, चेहऱ्याच्या नावावर फक्त केस असलेले, नर्तक सदृश्य पैलवान नाहीत, भलं मोठं नेपथ्य नाही की लोकेशनचे वरचेवर बदल नाहीत! इतकंच काय तर चित्राच्या चौकटीत रंगाचा एक थेंबही नाही! फक्त प्रकाशाचा आणि सावल्यांचा रोमहर्षी खेळ आणि हृदयाचा ठाव घेणारं संगीत आणि काव्य.

“का रे दुरावा?” मधल्या “का रे?” या शब्दांना गंधारावर ठेऊन सुधीर फडकेंनी संवाद प्रश्नार्थक करावा अशी ती ओळ प्रश्नार्थक केली आहे, तर दुसऱ्या ओळीत (“अपराध माझा असा काय झाला?”) मध्ये त्यांनी “झाला”च्या “ला” या अक्षरावर “सारेग” अशी हरकत घेऊन वेगळ्या तऱ्हेने पुन्हा ती ओळ प्रश्नार्थक केली आहे. तसंच “अबोला” या शब्दावर त्यांनी कोमल ‘नी’ स्वराची ग्रेस नोट लावून त्या ओळीत आर्जव निर्माण केलं आहे.

तिसऱ्या कडव्यापर्यंत ज्या नायक – नायिकेमध्ये अबोला आहे त्यांच्यामधली परिस्थिती निवळलेली आहे आणि त्यामुळे तिसऱ्या कडव्याची चाल सुधीर फडकेंनी आधीच्या दोन कडव्यांपेक्षा वेगळी केली आहे. या कडव्यामध्ये नायकाचा राग निवळल्यामुळे नायिका निर्धास्त आहे आणि त्यामुळे तिसऱ्या कडव्याची सुरुवात वरच्या सुराने होते. “रात्र जागवावी असे आज वाटे, तृप्त झोप यावी पहाटे पहाटे” अशी तिच्या अंतर्मनातली इच्छा ती बोलून दाखवते! चित्रपट न पाहाताही, नुसतं गाणं, त्याचे शब्द आणि त्याचा वाद्यमेळ ऐकूनही आपल्याला चित्रपटातल्या प्रसंगाचा अचूक ठाव घेता येतो हे कसब बाबूजींच्या संगीतामध्ये होतं.

बाबूजींचं प्रत्येक गाणं हा अभ्यासाचा विषय आहे. एक लेख त्यासाठी अपुराच पडेल. आजही रात्री १२ वाजताच्या नीरव शांततेतला बाबूजींबरोबर केलेला तो दोन मजल्यांचा प्रवास मला आठवतो. परवाच श्रीधरजी भेटले असता मी त्यांना विचारलं – “तुमच्या शंकर निवासच्या घरात प्रत्येक मजल्यावर बाबूजींचे जुने कृष्णधवल फोटो लावले होते ना?”

ते म्हणाले “नाही, असे काही फोटो लावले नव्हते.” मला आश्चर्य वाटलं. अस्पष्ट का होईना मला बाबूजी, माडगुळकर आणि राजा परांजपे, बाबूजी आणि आशाबाई, बाबूजींचा ध्वनिमुद्रणाच्या वेळचे काही कृष्णधवल फोटो मला पाहिल्याचं आठवत होतं. मला अचानक साक्षात्कार झाला – जे बाबूजी गाण्यांतून करायचे तोच परिणाम त्यांनी त्या २० मिनिटांच्या गप्पांमध्येही साधला होता. माझ्या मनात त्यांनी तो काळ आणि त्या काळातल्या प्रतिमा उभ्या केल्या होत्या आणि मला वाटत राहिलं की मी फोटो पाहत होतो!

‘आकाशी झेप घे रे पाखरा’ सारखं एखादं बाबूजींच्या सुरांत येतं तेव्हा वाटतं की सामान्य संगीतकार गाणं ‘संगीतबद्ध’ करतात, पण बाबूजींसारखा किमयागार गाण्यातल्या शब्दांना सुरांचे पंख देतो आणि आकाशाची वाट मोकळी करून देतो.

कौशल इनामदार

6 Comments

 1. वसंत चिकोडे. ७७९८२६१४९५ says:

  अप्रतिम भावना. शब्दात सांगणं कठीण च.बाबूजी तर माझं दैवतच.प्रत्यक्ष भेट झाली नाही. याची फारच खंत वाटते.वंदन.

 2. सोनाली भाऊ कचरे says:

  मी आज च ह्या सर्व महान नायकांबद्दल ऐकले advo. पानसे सरांकडून खुप सुखावणारा क्षण आहे कारण मला हे सर्व त्यांनी youtube ला search करायला सांगितले होते पण फेसबुक ओपन केले आणि पोस्ट नजरेत आली … सर हे ही बोलले होते की त्यांना चित्रकलेची फार आवड . त्यांनी खूप छान चित्र रेखाटली आहेत… मला हा सविस्तर लेख वाचताना आंनद वाटला कारण मला निशीबावं समजते की ज्यांच्या स्वरांची मैफिल मी ऐकायला आतुर होते त्यांच्या बद्दल मला खूप सारी माहिती मिळाली त्या बद्दल आभारी आहे …

 3. Mahesh Linge says:

  अप्रतिम Kaushal S Inamdar!!! तुमच्या शब्दात पण तिच ताकद आहे!! बाबुजी आणि तुमच्या बरोबर ते दोन माळे मी सुद्धा चढलो असं वाटल!!🙏🙏🙏🙏🙏🙏

 4. Ulhas Bhanu says:

  apratim shabdankan

 5. गीतरामायणातील मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे सगळी गाणी बाबूजींनी गाणे. एवढी पात्रे असलेल्या रामायणात वेगवेगळ्या गायकांकडून गाऊन घेण्याची भुरळ पडणे किती सहज शक्य होतं. तो निर्णय कशामुळे झाला माहित नाही परंतू त्याने गीतरामायणाच्या अनुभवाला वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवलं आहे.

  खूपच सुंदर होता लेख. तुझे खूप आभार.

 6. Krishna Gaikwad says:

  Thanks for sharing this beautiful memory.

What do you think?