उन्हे उतरली – छंद ओठांतले – भाग १४

Unhe Utarali - Grace - Kaushal Inamdar

ग्रेसची कविता वाचली आणि मला जाणवलं की अर्थाच्या पलीकडे एक फार मोठी दुनिया आहे. ही दुनिया भासांची आहे, आभासांची आहे, सूक्ष्म जाणिवांची आहे, तीव्र भावनांची आहे, अनाहत नादांची आहे, अमूर्त आकारांची आहे, अनुभवाच्या पलीकडच्या अनुभूतीची आहे, रहस्यांची आहे, साक्षात्कारांची आहे. ग्रेसची कविता वाचली आणि जाणवलं की ही कळण्याची गोष्ट नसून जाणवण्याचीच गोष्ट आहे. ग्रेसची कविता वाचली आणि जाणवलं की “कवीला काय म्हणायचंय?” असा शाळेत विचारलेला प्रश्न निरर्थक असून खरा प्रश्न “कवितेला काय म्हणायचंय?” असा असायला हवा. ग्रेसची कविता वाचली आणि मला जाणवलं की दर वेळी उत्तरं मिळायलाच हवीत असं नाही, प्रश्नही रेंगाळू द्यावे मनात. ग्रेसची कविता वाचली आणि मला जाणवलं की ग्रेसच्या कवितेचे गूढरम्य प्रदेश फिरायचे तर हातात संगीताची मशाल हवी!

संगीतकारांना ग्रेसच्या कवितेचं प्रचंड आकर्षण वाटतं याचं मला मुळीच आश्चर्य वाटत नाही. संगीतकारांना ग्रेस हा आपला कवी वाटतो कारण त्यांची कविता ॲब्स्ट्रॅक्शन्समधे संवाद साधते. ही ॲब्स्ट्रॅक्शन्स संगीतात अनुवादित करताना संगीतकाराचा कसही लागतो आणि अपार आनंदही मिळतो! म्हणून ग्रेसच्या काव्याला बहुतेक संगीतकारांनी दिलेल्या चाली उत्तमच वाटतात! हृदयनाथ मंगेशकरांपासून श्रीधर फडकेंपर्यंत आणि आनंद मोडकांपासून नरेन्द्र भिडेपर्यंत झालेली ग्रेसची गाणी उत्तमच आहेत.

मी मराठीत संगीत करायला सुरूवात केली तीच मुळात ग्रेसच्या कवितेने. पण ती कहाणी मी दुसऱ्या गाण्याच्या वेळी सांगेन. आज जी कविता घेतोय ती घेण्याचं कारण असं की आमच्या संस्थेच्या म्हणजे ‘मराठी अस्मिता कल्चरल फाउंडेशनच्यायूट्यूब वाहिनीवर सुप्रसिद्ध लेखक आणि अभिनेते दीपक करंजीकर गेले काही महिने ‘संन्यस्त सुखाचा काठ’ ही मालिका सादर करीत आहेत. त्या मालिकेत त्यांनी ग्रेसच्या ‘वर्षाव’ या कवितेवर एक भाग सादर केला आणि म्हणाले की “याची कौशल इनामदारने केलेली चाल तुम्ही ऐकायला हवी”. ही रचना अजून ध्वनिमुद्रित झाली नसल्यामुळे मी ठरवलं की ‘छंद ओठांतले’च्या या भागात हेच गाणं या वेळी घेऊया.

उन्हे उतरली
एक सावली
पुढे दिठीवर थेंब नवा
या वळणाशी
दुःख उराशी
सूर वितळतो जणू भगवा

ग्रेसच्या कवितेतली पहिली चित्तवेधक बाब म्हणजे चित्रमयता. उन्हं उतरणीला आगली आहेत आणि संध्याकाळीच दिसते अशी लांब सावली आपल्याला दिसतेच; पण पुढच्या तीन ओळी ॲब्स्ट्रॅक्ट असल्या तरीही ‘तो वितळणारा भगवा सूर’ आपल्याला अवकाशात दिसत राहतो. मला एक गंमत आढळली. मी केलेल्या ग्रेसच्या तीन कवितांच्या संगीतरचना करताना या तिन्ही कविता संध्याकाळच्या असूनही मी सकाळच्या रागांची धून वापरली आहे! हे असं अभावितपणे झालं असलं तरी त्याचं एक कारण आहे हे मला नंतर जाणवलं. ग्रेसच्या कवितेमध्ये एक अनामिक अशी बेचैनी आहे. बेचैनी जाणवते पण त्यावर बोट ठेवता येत नाही. आता संध्याकाळी तुम्ही मारवा किंवा पूर्वी ऐकलात तर तुम्हाला उदास वाटतं पण ही उदासी ‘डिफाइन्ड’ असते. त्यात संभ्रमावस्था नसते. परंतु संध्याकाळच्या वेळेला तुम्ही सकाळचा एखादा राग ऐका. तुम्हाला एक अनामिक बेचैनी जाणवेल. ते गलबलून येणं वेगळं असतं.

ग्रेसच्या कवितेला चाल देणं म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग काढण्यासारखं आहे. जसं दिसतं त्याला महत्त्व नसून जे दिसतंय त्याची जाणीव रेखाटायची.

स्वप्ने अपुली
कुणी सजविली
रंग तिरावर व्याकुळसा

नाद उगाळून
सांज बनातून
कळप गुरांचा निघे जसा

या कडव्याला चाल देताना मी फक्त सांगितीक रचनेचा फॉर्म डोक्यात ठेवला. तीन ओळींचा एक बंध – असे दोन बंध. पहिल्या तीन ओळींच्या बंधात मी आरोही सुरावट रेखाटली आणि पुढच्या तीन ओळींच्या बंधात त्याचीच मिरर इमेज असावी अशी अवरोही स्वराकृती रेखाटली आहे असं तुमच्या ध्यानात येईल.

माझ्या वक्षी
निजती पक्षी
अतुल सुखाची ही धारा

देह अनावर
निज मातीवर
हिम वर्षावित ये वारा

आता लक्षात येतं की दिवसभराच्या कडक उन्हात प्रवास करून नंतर ही उन्हं उतरताना पाहिली आहेत. त्यामुळे कविता जे सांगते, तेच गाण्याची चाल परत सांगत नाही. चाल ही कवितेचा prequel आहे आणि sequel ही आहे. कविता सुरू होण्याआधी जे अस्तित्त्वात होतं आणि ती संपल्यानंतर जे अस्तित्त्वात राहणार ते गाण्यात आहे.

‘माझ्या वक्षी निजती पक्षी’ हे एका विलक्षण आत्मिक शांततेचं द्योतक आहे. ‘अतुल सुखाची ही धारा’ असं ग्रेस म्हणतात तेव्हा त्याला पहिल्या बंधातल्या ‘या वळणाशी, दुःख उराशी’ – त्या दुःखाची पूर्वपीठिका आहे हे लक्षात ठेवायला हवं. दुःख उरात ठेवून ते वळण पार केलं आणि एका प्रचंड मोठ्या प्रवासानंतर अनुभवलेली ही ‘अतुल सुखाची धारा’ आहे. हा प्रवास एका जन्माचा असेल किंवा अनेक जन्मांचा असेल. मला यात ‘धारा’ हा शब्दही महत्त्वाचा वाटतो. धारा ही वाहत असते. ती स्टॅटिक नसते. हे जिवंत, वाहतं सुख आहे. ‘निज मातीवर’ देह अनावर होतो आणि वारा हिम वर्षावित येणं म्हणजे सगळा दाह शांत होण्याचं प्रतीक आहे. त्यामुळे गाणं परत धृवपदावर न येता केवळ सूर राहतात आणि शब्द वितळतात!

© कौशल इनामदार, २०२०

1 Comment

  1. “कवीला काय म्हणायचंय?” हा प्रश्न निरर्थक असून खरा प्रश्न “कवितेला काय म्हणायचंय?” हाच असायला हवा.

    अगदी बरोबर आहे. कारण कवी प्रत्येक कवितेत वेगळाले व्यक्तिमत्व पांघरत असतो. भाग्यवान असतो, एकाच ह्या जन्मी किती किती जन्म घेतो, कविता होऊन जातो.

    ग्रेसांच्या कविता खरंच कठीण आहे रसग्रहणाला. तिची गूढता तुम्हाला खेचून घेते जसं एखादी रहस्यकथा वाचतांना आपण त्यात हरवून जातो. मी ‘सन्यस्त सुखाचा काठ’ या सदरातील ‘दुर्बोधतेची बेसरबिंदी’ या भागावर प्रतिक्रियाही दिली होती की, दुर्बोधतेची ही बेसरबिंदी खरंच इतकी मोहक आहे की त्यापुढे लाखमोलाचे दागिने मातीमोल ठरावेत. ग्रेसांच्या कविता वाचकाला जवळजवळ निर्मीतीचा आनंद देऊन जातात आणि हीच त्यांच्या कवितेची खरी तरी विलक्षण ताकत आहे.

    कवितेला दिलेली चाल ही वाचकाला कवितेच्या अंतरंगात प्रवेश मिळवून देऊ शकते आणि त्यामुळे ग्रेससारख्या कवींच्या कवितांना संगीत करतांना संगीतकारावर जास्त जबाबदारी येते असं मला वाटतं.

    चाल अगदी ‘क्षितिज जसे दिसतेच्या’ तोडीची वाटली. मला वाटते तार सप्तकाची तार छेडल्याशिवाय ग्रेसांच्या कवितेचं गारुडाला भेदल्या जाऊ शकत नाही. संगीतकार कदाचित तिच्या चक्रव्यूहात अडकून राहील कायमचा. तोच अनुभव ह्या चालीत आला.

What do you think?