होउनिया पार्वती – छंद ओठांतले – भाग १८

Houniya Thumbnail

पेणचे मूर्तिकार देवधर आपल्या गणपतीच्या मूर्तींसाठी प्रसिध्द होते. त्यांचा कारखाना पाहतांना मी पहिल्यांदा साच्यातले गणपती पाहिले होते. मग ते पूर्ण रंगवून झाले की असं वाटायचं की मूर्तिकार मातीला चैतन्य प्राप्त करून देतोय! देवाने घडवलेला माणूस पुन्हा देव घडवतोय!  त्यांच्या चिरंजीवांनी, आनंद देवधरांनी, मला त्यांच्या कारखान्यातली एक मूर्ती भेटही दिली आहे. मी तसा धार्मिकही नाही किंवा फार श्रद्धाळूही नाही पण त्या मूर्तीकडे पाहिलं की डोळे भरून येतात.

शिल्पकार भगवान रामपुरे यांनीही माझं ओशोप्रेम बघून मला त्यांनी साकार केलेली ध्यानस्थ ओशोंची एक मूर्ती भेट दिली होती.

एका मूर्तिकार कवीने असं म्हटलंय की –

“परमेश्वरा, मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ मूर्तिकार आहे. कारण तू केलेल्या मूर्ती मी केलेल्या मूर्तींना नमस्कार करतात!”

– अनाम

दगडात देव दिसायला कलाकाराचा आत्मा लागतो. मायकलॅन्जेलोच्या नावावर एक वाक्य आहे – “शिल्प दगडातच असतं. मी केवळ अनावश्यक भाग काढून टाकतो.” शिल्पकाराच्या या अंतर्दृष्टीचं मला कायम कुतुहल वाटत आलेलं आहे.

ज्ञानेश्वर मर्गज हा माझा मित्र ‘संकासूर’ नावाचा चित्रपट करायचा प्रस्ताव घेऊन आला. कोकणातल्या दशावतारी नटाच्या आयुष्यावर असलेली फार अप्रतिम पटकथा त्याच्या डोक्यात होती. एका अर्थाने कोकणातल्या लोककलांचा संपूर्ण पट उलगडून दाखवणारा हा चित्रपट होता. या चित्रपटासाठी मूर्तिकाराच्या नजरेतून गणेशोत्सव दाखवावा अशी एक अनोखी कल्पना ज्ञानेश्वरच्या मनात आली. ज्ञानेश्वरने त्या आशयाची एक कविताही लिहिली होती. ती कविता मी इथे देत आहे.

असेल ही माझ्या शतजन्मांची पुण्याई
होवूनी मी पार्वती मळीते गणपती
 
मातीच्या खाणीमधूनी आणीली मृतिका
आणि मळली लोण्यापरी, खडे चाळीता
असेल ही माझ्या शतजन्मांची पुण्याई
होवूनी मी पार्वती मळीते गणपती
 
साचे देहाचे भरुनी माती सुकविली
बहु व्यापे गणेश अंगे अशी निर्मिली
असेल ही माझ्या शतजन्मांची पुण्याई
होवूनी मी पार्वती प्रसीते गणपती
 
जोडा जोड असे शरीरा मग जोडीता
लावीते गजमुख गोजिरे या देहाला
असेल ही माझ्या शतजन्मांची पुण्याई
होवूनी मी पार्वती जन्मीते गणपती
 
दागदागिने हार मातीचे लेवविता
शृंगारीला लडिवाळे गणू बाळ माझा
असेल ही माझ्या शतजन्मांची पुण्याई
होवूनी मी पार्वती भूषीते गणपती
 
धोतरशेला डोई मुकुटी भालचंद्रा
खळ काढुनीया, अंगाचा रंग लाविला
असेल ही माझ्या शतजन्मांची पुण्याई
होवूनी मी पार्वती रंगीते गणपती
 
उघडीते डोळे सदभावे मयुरेशा
घडविला स्वकरे ऋध्दिसिध्दीचा दाता
असेल ही माझ्या शतजन्मांची पुण्याई
होवूनी मी पार्वती वंदिते गणपती
 
आदल्यादिशी जन येती तुज नेण्याला
जड अंतःकरणे देते ताब्यात शिवपुत्रा
असेल ही माझ्या शतजन्मांची पुण्याई
होवूनी मी पार्वती सोपीते गणपती
 
भाद्रपद शुध्द चतुर्थीला केली पूजा
प्राणप्रतिष्ठा करूनी नैवेद्य दाविला
असेल ही माझ्या शतजन्मांची पुण्याई
होवूनी मी पार्वती पूजीते गणपती
 
मूर्तीरुपे येतो जगजेठी घराघरा
मान राखा, नकोत धिंगाणे विटंबना
असेल ही माझ्या शतजन्मांची पुण्याई
होवूनी मी पार्वती जोजवी गणपती
 
कसली उंची कसली स्पर्धा हो मंडळी
देवा हवी सात्विकता, नको चढाओढी
असेल ही माझ्या शतजन्मांची पुण्याई
होवूनी मी पार्वती शांतवी गणपती
 
येता अनंत चतुर्दशी निरोप हा घेते
देत आलिंगन देवा मन कष्टीते
असेल ही माझ्या शतजन्मांची पुण्याई
होवूनी मी पार्वती विसर्जी गणपती
 
कौतुकाने जागर झाला दहा दिसांचा
अपुल्या घरा येई देव, ही केवढी कृपा
असेल ही माझ्या शतजन्मांची पुण्याई
होवूनी मी पार्वती भजला गणपती
 
असूनी पुरुष मी गजाननाची आई
पुनरपी पुढल्यावर्षी गर्भीन गणपती
असेल ही माझ्या शतजन्मांची पुण्याई
होवूनी मी पार्वती जन्मवीन गणपती

ज्ञानेश्वरची कविता छंदोबद्ध नसल्यामुळे त्याचं गाणं करणं शक्य नव्हतं. मी ज्ञानेश्वरला सुचवलं की आपण प्रा. अशोक बागवेंना या कवितेचं गीतात रूपांतर करतील का असं विचारूया. बागवे सरांनीही मोठ्या मनाने होकार दिला. ज्ञानेश्वरच्या मुळातच मातीचा सुगंध असलेल्या कल्पनेला अशोक बागवे या शब्दमूर्तिकाराने सुबक असा आकार दिला! अशोक बागवेंनी लिहिलेली कविता खाली देतोय –

खाणीची चिक्कण माती
घेतली मुलायम हाती
लोण्यापरी मळली सारी
खडे वेचुनी भारी
पुण्यमय शतजन्मांची नाती
होउनिया पार्वती मळिते मी गणपती                        ॥धृ॥
 
देह साच्यात भिडवुनी
सारी माती सुकविली
प्राण ओवाळुनी माझे
अंगे निराळी घडली
होउनिया पार्वती प्रसविते गणपती
होउनिया पार्वती प्रसविले गणपती                          ॥१॥
 
जोडाजोडी करुनिया
अवघे देह घडविले
मग गजमुख गोजिरे
देहावर जडविले
होउनिया पार्वती जन्मविले गणपती                         ॥२॥
 
साजिरी मकर कुंडले
पायी रुमझुम वाळे
सगुण निर्गुणी शोभे
रुपवान गणुबाळे
होउनिया पार्वती भूषविते गणपती                           ॥३॥
 
 
केशरी पितांबर शेला
माथी मुकुट चढविला
खळ काढुनिया अंगाचा
गणराय रंगविला
होउनिया पार्वती रंगविते पार्वती                              ॥४॥
 
सद्भावे मयुरेशाचे
मी लोचन उघडविले
कर्पुरगौर तेजाने
जणु अंबर हे उजळिले
होउनिया पार्वती वंदिते गणपती                             ॥५॥
 
जन लोटियले दारी
तुज नेण्या अपुल्या घरी
जिव जडावला माझा
जणु प्राण चालले दुरी
पुण्यमय शतजन्मांची नाती
होउनिया पार्वती सोपविते गणपती                         ॥६॥
 
भादव्याला प्राणप्रतिष्ठा
शुद्ध चतुर्थीची तिथी
पूजाअर्चा गणेशाची
गोड नैवेद्य दाविती
होउनिया पार्वती पूजितसे गणपती                          ॥७॥
 
सुखकर्ता विघ्नहर्ता
घराघरात विराजे
मान राखू गणेशाचा
पुण्य दैवतच माझे
होउनिया पार्वती जोजविते गणपती                         ॥८॥
 
मनमोदक आनंदाने
प्रेमाचे भरते आले
तुझ्या कृपेची छाया
घर घर हे पावन झाले
होउनिया पार्वती शांतविते गणपती                         ॥९॥
 
येता निरोपाचा दिन
माझे कष्टवले मन
दूर जाऊ नको देवा
घेई दृढ आलिंगन
पुण्यमय शतजन्मांची नाती
होउनिया पार्वती विसर्जिते गणपती                         ॥१०॥
 
पवित्र मंगल जागर
गणराया दहा दिसांचा
युगायुगे पण गंध राहिला
तुझिया सहवासाचा
असूनिया पुरुषही मी गजाननाची आई
पुन्हा भक्तिभावाने मी गर्भीन गणपती                       ॥११॥

या गाण्यात सगळ्यात आव्हानात्मक भाग होता तो या गाण्याच्या लांबीचा. धृवपद आणि ११ कडवी! सगळ्याच अर्थाने हे ‘महाकाय’ गाणं होतं! यात मातीपासून विसर्जनापर्यंतचा epic असा प्रवास होता. गाण्यामध्ये मी तो एका संपूर्ण आयुष्याचा प्रवास आहे असा पट योजला. एखाद्या पटकथेप्रमाणे याला चाल केली पाहिजे ही माझ्या मनातली भावना होती. ‘होउनिया पार्वती’ ही धृवपदाची ओळ प्रत्येक कडव्यानंतर येते, त्यामुळे त्या ओळीच्या चालीची पुनरुक्ती करायची असं ठरवलं. परंतु कडव्यांच्या चाली वेगवेगळ्या करणं भाग होतं. एरवी गाण्यात दोन – तीन – किंवा चार कडवी असतात. बहुतेक गाण्यांमध्ये पहिली दोन कडवी सारखी आणि तिसरं वेगळं, किंवा पहिलं – तिसरं सारखं आणि दुसरं वेगळं, किंवा चार कडवी असली तर १-३, २-४ असा पॅटर्न असतो. या गाण्यात मी तो पॅटर्न सोडून दिला आणि एखादी कथा क्लायमॅक्सकडे जशी जाते तसा या गाण्याचा विचार केला. एखाद्या पटकथेत जशा काही घटना तीव्र असतात आणि काही ठिकाणी कथेत एक प्रकारचा ठहराव येतो आणि तरीही शेवटाकडे जाताना एक चढता आलेख असतो अगदी तसाच आलेख मी या रचनेचा ठेवायचा प्रयत्न केला आहे.

या गाण्याचं संगीत संयोजन भावेश भट्ट या माझ्या मित्राने केलेलं आहे आणि मिथिलेश पाटणकर या प्रतिभावंत गायक, संगीतकाराने हे गीत गायलं.

मंदार गोगटे या माझ्या मित्राने यात संगीत साहाय्यकाची भूमिका तर बजावलीच पण या गाण्यासाठी अत्यंत crucial असलेल्या तालसंयोजनातही महत्त्वाचं योगदान दिलं. हल्ली संपूर्ण गाण्याचा आराखडा हा संगणकावर होत असल्यामुळे गाण्याची लय निश्चित असते. पूर्वी ही लय वादकांच्या body clockवर ठरायची त्यामुळे गाण्याची लय कमी-जास्त व्हायची. गाणं शेवटाकाडे येतायेता हमखास या लयीत थोडी वाढ झालेली असायची. आता संगणकामुळे या लयीत एक यांत्रिकपणा आलाय. हा यांत्रिकपणा घालवण्याकरता आणि गाण्याची पटकथेसारखी मांडणी अबाधित ठेवण्याकरिता या गाण्याची लय ही अंशतः वाढवत नेली आहे. त्यामुळे गाणं ज्या लयीत सुरू होतं त्यापेक्षा किंचित जलद लयीत ते संपतं.

रचनाकार त्याच्या रचनाकाराची रचना करतानाची रचना म्हणजे हे गीत आहे. मूर्तिकार जसा अनावश्यक दगड बाजूला करत असतो तसंच ही चाल करत असताना रचनेतून आपल्या अहंकाराला सतत बाहेर ठेवलं तरच ती लीनता आणि श्रद्धा गाण्यातही दिसते, हा या गाण्यातून मला मिळालेला सगळ्यात मोठा धडा आहे.

© कौशल इनामदार, २०२०

ध्वनिमुद्रित गाणं इथे ऐका

6 Comments

 1. संदीप गावंडे says:

  मूळ कविता आणि त्यावर आधारित गाणे, दोन्ही छान आहेत. गाण्याची लांबी अर्थातच आव्हानात्मक आहे. पण अपेक्षित कथानक उभं करायला ती गरजच होती म्हणावे लागेल. पहिले पाच कडवी मूर्ती घडविणे, नंतरची पाच उत्सवाचे वर्णन आणि अकरावे कडवे भविष्याचे वेध घेणारे काळाचे आवर्तन दाखवणारे. ध्वनीमुद्रित गाणे मिथिलेश पाटणकरच्या आवाजात छान जमून आलं आहे.

  लेखाद्वारे तू ओशोप्रेमी आहे हे कळले आणि आनंद झाला. त्यांची महागीता ऐकली असशीलच.

  यांत्रिकपणा घालवण्याकरता हेतूपुरस्सर केलेला लयबदल आवडला. प्रगल्भतेचं आणि जिवंतपणाचं लक्षण आहे.

  • ksinamdar says:

   धन्यवाद संदीप! ओशोंचं बरंच ऐकलं आहे. माझ्या घरातलं एक संपूर्ण शेल्फ केवळ ओशोंच्या पुस्तकांनी भरलंय!

   • संदीप गावंडे says:

    बाप रे इतकी पुस्तकं!
    मी त्यांचे प्रवचन (audio) भरपूर ऐकले आहेत. काय ओजस्वी वाणी आहे. तू ईश्वरवादी नाहीस जाणतो, तरीही जर ऐकली नसशील तर त्यांची महागीता जरूर ऐक.

    https://www.oshoworld.com/discourses/audio_hindi.asp?album_id=32

 2. मला शब्दांचा हा प्रवास खूप भावतो. हे गाणं आधी ऐकलं आणि मग तुम्ही उलगडून दाखवलेला हा लयबद्ध प्रवास वाचला. तुमच्या लिखाणाची सगळ्यात अद्भुत अशी वाटणारी गोष्ट म्हणजे त्यामध्ये जी फिलॉसॉफी असते ती अतिशय सटल आणि कित्येक पदर असलेली. जसं इथे मूर्तीकार फक्त अनावश्यक भाग बाजूला करतो पासून ते रचना करतांना अहंकाराला बाजूला ठेवता येणं.. ही जी लिंक तुम्ही जोडता नं,ती गजब आहे.
  यावरुन मला मीर तक़ी मीर यांचा एक शेर आठवला..
  जिस सर को ग़ुरूर आज है याँ ताज-वरी का
  कल उस पे यहीं शोर है फिर नौहागरी का।
  अहंकाराला बाजूला सारून जगणं.. खरंय.. हे कायम स्मरणात ठेवायला हवंय!

  • ksinamdar says:

   वा सानिया! मीरचा शेर कमाल आहे! धन्यवाद तो शेार केल्याबद्दल! छंद ओठातले ही मालिका एक प्रकारे आत्मशोध आहे. म्हणूनच चिकाटीने ते करतोय.

  • संदीप गावंडे says:

   शेर खरंच उत्तम आहे!

What do you think?