आकाशात तारे सगळ्यांनाच दिसतात. सगळ्यांमधल्या अनेकांना ताऱ्यांनी भरलेल्या आकाशाचा आनंद घेता येतो. त्या अनेकांमधल्या काहींना त्या ताऱ्यांचं वर्णन करता येतं. त्या काहींपैकी मोजक्यांनाच आकाशात या तारका कशा दिसतात यावर कविता लिहिता येते. पण तारकांना आपण कसे दिसतो हे सांगायला मात्र बालकवीच लागतात!
भूतलावर माणसं निद्रेच्या कुशीत शिरली की आकाशातल्या सगळ्या तारका खाली पृथ्वीवर येऊन खेळतात अशी विलक्षण कल्पना बालकवींनी या कवितेत केली आहे.
निसर्गकविता आजवर अनेक कवींनी लिहिल्या आहेत. पण बालकवी एका वेगळ्या मितीतून या साऱ्या विश्वाकडे बघत आहेत असं मला कायम वाटत आलं आहे. ‘डेड पोएट्स सोसायटी’ या चित्रपटात इंग्रजी भाषा शिकवायला आलेला नवा प्राध्यापक जॉन कीटींग खुर्चीवर बसण्याऐवजी वर्गातल्या टेबलावर उभा राहतो आणि विद्यार्थ्यांना सांगतो की इथून जग वेगळं दिसतं. बालकवींनी वेगळ्या ध्रुवावर उभं राहून मराठी काव्य रसिकाला या विश्वाचं दर्शन घडवलंय!
अत्यंत निर्मळ पाण्याचा झरा वाहत यावा तशी बालकवींची कविता आपल्या अंतःकरणात उतरते. त्यांच्या कवितेला चाल देणं म्हणजे माझ्यासाठी अंतःकरणाची शुद्धी करण्यासारखं आहे.
कुणि नाही ग कुणि नाही
आम्हाला पाहत बाई
शांती दाटली चोहिकडे
या ग आता पुढेपुढे
लाजत लाजत
हळूच हासत
खेळ गडे खेळू काही
कोणीही पाहत नाही!
या गाण्याच्या छंदानेच मला याची चाल सुचवली. चार ओळी एका वृत्तात, मग दोन-दोन शब्दांच्या, आठ मात्रांच्या दोन छोट्या ओळी आणि पुन्हा दोन ओळी पहिल्या ओळींसारख्याच १४ मात्रांच्या. या शब्दाकृतीतच एक स्वराकृतीही दडलेली आहे.
दृश्य लुकलुकणं हे श्राव्य किणकिणणं असतं असा विचार तुम्ही कधी केलाय? चांदण्यांच्या आवाजाकरता अनेक संगीतकारांनी बेल्सचा आवाज वापरला आहे. दृश्याचं श्राव्य माध्यमातला हा अनुवाद मला नेहमीच आकर्षित करतो. त्या किणकिणण्याची जी आस असते ते दृश्य अवकाश असतं असा पुढचा विचार माझ्या मनात आल्याशिवाय राहात नाही. सुरेश भटांच्या कवितेत ऐकू येणारे “आवाज चांदण्यांचे” हेसुद्धा मला हळुवार वाजणा-या घंटानादासारखेच ऐकू येतात! चार तरूणींचं गाणं नसून चार तारकांचं गाणं आहे हे ध्यानात ठेऊन ध्वनिमुद्रणाच्यावेळी गायिकांच्या आवाजाला एरवीपेक्षा जास्त रिव्हर्ब (प्रतिध्वनी) दिला. रिव्हर्बमुळे अवकाशाचा पट दाखवण्यात मदत झाली.
सुंदरतेला नटवून, कोमलतेला खुणवून, प्रेमाच्या वसतीकरिता जगदंतर फुलवु आता. दिव्य सुरांनी गीते गाउनि विश्वाला निजवायाला वाऱ्याचा बनवू झोला
इथे ‘सुंदरतेला नटवून’चा अर्थ ‘सौंदर्याला नटवून’ असा नसून ‘सुंदर ते ते नटवून’ आणि ‘कोमल त्याला त्याला खुणवून’ असा आहे असं अनुराधा पोतदारांनी ‘बालविहग’ या पुस्तकात लिहिलंय.
बालकवींची ही कविता निरागस आहे पण बाळबोध नाही. आणि पहिल्या बंधावरनं असं वाटत असलं तरी ही बालकविता नाही. कारण पुढच्याच एका कडव्यात ते म्हणतात –
एखादी तरुणी रमणी रमणाला आलिंगोनी लज्जा मूढा भिरुच ती शंकित जर झाली चित्ती तिच्याच नयनी कुणी बिंबुनी धीट तिला बनवा बाई भुलवा गं रमणालाही…
हा बंध फारच कमाल आहे! लज्जेने मूढ झालेल्या युवतीच्या मनाची जराही द्विधावस्था झाली तरी एखादी चांदणी तिच्या डोळ्यात बिंबते आणि तिला धीट बनवते आणि तिला धीट बनवत असताना इतर चांदण्या तिच्या प्रियकरालाही भूल घालतात.
हे गाणं कार्यक्रमात घेताना आणि पुढे याचं ध्वनिमुद्रण केलं तेव्हा चार गायिकांचा आवाज वापरला. या गाण्यात एक नायिका किंवा एक गायिका नाही. १९९७ साली शिल्पा पै, प्रतिभा दामले आणि सुचित्रा रानडे (इनामदार) यांच्या आवाजात हे गीत रेकॉर्ड केलं. या चारही गायिकांचे आवाज निरागस आणि कोवळे होते. कमलेश भडकमकरने फार उत्तम संगीत संयोजन केलं आहे.
अनेक असले खेळ करूं प्रेमाशा विश्वात भरूं सोडुनिया अपुले श्वास खेळवु नाचवु उल्हास प्रभातकाळी नामनिराळी होऊनिया आपण राहू लोकांच्या मौजा पाहू!
अशा खेळकर तारकांचं मन बालकवींना वाचता येत असे! नुसता श्वास सोडून उल्हास नाचवता येणं हे खरं तर आपल्याही आयुष्याचं ब्रीद असावं. जगणं किती निरागस, शुद्ध असावं याची दिशा दाखवणारी बालकवींची कविता हीच मुळात एक ध्रुवतारा आहे.
© कौशल इनामदार
4 Comments
खूप सुंदर आणि लडिवाळ वाटली चाल. मला फार आवडली. ध्वनीमुद्रित गाणे खूपच गोड वाटले.
बालभारती मधून लहानपणीच बालकवींची ओळख झाली आणि त्यांच्या नावामुळे ते आपलेसे वाटायचे. त्यांनी त्यांच्या निसर्ग चित्रणासवे आपल्याला ‘चिऊताईचं घरटं’, ‘श्रावणमास’, ‘ती फुलराणी’ करत करत ‘औदुंबर’ पर्यंत दाखवून आणलेला आहे.
आता चांदण्याच वय कोणी ठरवावं? मुलांसोबत मूल होतात, तरुणाईला तरुणी होऊन भुरळ घालतात. ह्या कवितेतल्या तारका जणू तारुण्यात प्रवेश केलेल्या अवखळ तरुणींचा कळप सायकली चालवीत रस्त्यावरून जात आहेत असं चित्र डोळ्यासमोर आलं.
वृत्तातल्या छोट्या ओळींना सुरावटीची जी जोड आहे त्याने चालीच्या अवखळतेत आणखीनच भर घातली आहे. मस्त!
धन्यवाद संदीप. अगदी बरोबर! त्या ८ मात्रांच्या ओळींत भलतीच मजा आहे! काय मस्त प्रतिक्रिया लिहिलीस तू!
खूप छान 👌
धन्यवाद अपर्णा!