सिखवति चलन जसोदा मैया – छंद ओठांतले – भाग १५

sikhavati chalan banner

मीरेवर केलेल्या आख्यानात ओशो असं म्हणतात की कृष्णाच्या मुकुटात खोवलेल्या मोरपिसाला प्रतिकात्मक महत्त्व आहे. जसे मोरपिसात सगळे रंग आहेत, तसेच श्रीकृष्णातही सगळे रंग आहेत. तो योद्धाही आहे आणि योगीही. त्याला शांतीच्या शोधात हिमालयात जावं लागत नाही कारण त्याच्या आतच एक हिमालय आहे! कृष्णाचं सावळं असणंही अर्थपूर्ण आहे. नदीचं पाणी जिथे उथळ असतं तिथे त्याचा तळ दिसतो. पण जसजशी त्याची खोली वाढत जाते, तसं ते गडद होत जातं आणि तळ दिसेनासा होतो. कृष्णाचा तळ दिसत नाही. श्रीकृष्णाचं संपूर्ण प्रतिबिंब मनाच्या काचेवर मावणं अवघडच! म्हणून ओशो म्हणतात की संतसुद्धा श्रीकृष्णाचा एकच पैलू घेतात. “ज्या सूरदासाने सुंदर स्त्री पाहून आपल्या मनात वासना जागृत होऊ नये म्हणून स्वतःचे डोळे फोडून घेतले, त्या सूरदासाचं नदीत नाहणाऱ्या स्त्रियांचे कपडे झाडावर लपवून ठेवणार्‍या श्रीकृष्णाशी कसं बरं जमावं! म्हणून सूरदास केवळ बाळकृष्णाच्याच लीलांमध्ये रममाण होतात!”

सूरदास काय, किंवा मीरा काय – हे कृष्ण जगलेले लोक! म्हणूनच जेव्हा असिता नार्वेकर कृष्णचरित्रावर नृत्य-नाट्य करायचं म्हणाली आणि मला संगीत करण्यासाठी बोलावलं तेव्हा या विषयावर नवी गाणी लिहून घेण्यापेक्षा सूरदासाचीच पदं घ्यावीत असंच मी सुचवलं. यात माझा स्वार्थ असा होता की लिखाण उत्तम असेल तर एका ठराविक स्तराच्या खाली आपली कलाकृती येऊच शकत नाही!

सोनिया परचुरे या नृत्यनाट्याचं दिग्दर्शन करणार होती. मुकुंदराज देवसारखे उत्तम वादक ताल संयोजन करणार होते. संपदा जोगळेकर कुलकर्णी, संज्योत हर्डीकर या नृत्यांगना सोनियाबरोबर यात सहभागी होणार होत्या. कथ्थक नृत्यशैलीवर आधारित या बॅलेमध्ये गाणी शास्त्रीय संगीतावर आधारित अपेक्षित होती हे उघड होतं. माझ्यासाठी हे आव्हान होतं कारण माझी बैठक शास्त्रीय संगीताची नव्हती. जमेची बाजू अशी होती की मला पं. सत्यशील देशपांडेंसारख्या संगीतज्ञाचा सहवास लाभत होता. त्यांच्या प्रतिभेमुळे, बुद्धिमत्तेमुळे माझं सांगितिक आयुष्य समृद्ध होत होतं. त्यांच्या निमित्ताने याच काळात संजीव चिम्मलगीसारख्या तरूण, गुणी गायकाशी ओळख झाली होती.

संजीव आणि हम्सिका अय्यर असे दोन गायक या कार्यक्रमात मी माझ्यासोबत घेतले होते. हम्सिकाचं संगीताचं शिक्षण दाक्षिणात्य पद्धतीत झालं असलं तरी तिचा भावसंगीतातला अनुभव दांडगा होता.

कृष्णाच्या बालपणापासून द्वारकेच्या निर्मितीपर्यंतच्या घटनांवर विविध गाणी आम्ही सूरदासाच्या साहित्यातूनच निवडली. जिथे काही रिकाम्या जागा वाटल्या किंवा काही वेगळी कल्पना सुचली तिथे माधव चिरमुले यांनी गाणी लिहून दिली.

या बॅलेमधलं पहिलंच गाणं जे मी संगीतबद्ध केलं ते होतं – ‘सिखवति चलन जसोदा मैया’. यशोदा लहानग्या श्रीकृष्णाला चालायला शिकवत आहे असं कल्पून सूरदासाने केलेली ही रचना. सूरदासाच्या रचनांचं जे वैशिष्ट्य मला जाणवलं ते असं होतं की हे कल्पित आहे असं न वाटता या सगळ्या प्रसंगांचा सूरदास प्रत्यक्ष साक्षीदार आहे असं वाटावं असं या पदांमधलं वर्णन आहे. कुठलंही तत्त्वज्ञान नाही, कल्पनांची चमत्कृती नाही, शाब्दिक फुलोरे नाहीत, केवळ दर्शन आणि त्या दर्शनातून मिळालेली अनुभूती!

सिखवति चलन जसोदा मैया।
अरबराइ कर पानि गहावत, डगमगाइ धरनी धरे पैया।

अक्षरशः पाच मिनिटात माझी ही चाल बांधून झाली. गाण्याची चाल बांधण्याची माझं एक तत्त्व आहे. माझी चाल हा त्या शब्दांना दिलेला स्वाभाविक भावनिक प्रतिसाद असतो. जे बौद्धिक चिंतन असतं ते चाल होईपर्यंत मी करत नाही. पण नंतर मात्र या चालीचं गाणं होईपर्यंत त्यावर भावनेबरोबर बुद्धीचेही संस्कार होत राहतात. मर्ढेकरांच्या उक्तीप्रमाणे – “भावनेला येऊदे गा शास्त्रकाट्याची कसोटी” त्या प्रमाणे रचना सतत संस्कारित करत राहणं हे मला गरजेचं वाटतं. यात शास्त्रकाट्यालाही भावनेची कसोटी मात्र मी सतत लावत राहतो! एका बाजूला शास्त्र, तर्क आणि दुसऱ्या बाजूला भावना – याच्यामध्ये जी तारेसारखी रेषा आहे त्यावर चालत राहणं हाच संगीत करण्याचा थरार आहे असा माझा पक्का समज आहे.

‘सिखवती चलन’ची सुरुवात सुरांच्या सरळ रेषेत होते. या स्वरवाक्यात कमालीचा सोपेपणा आहे. यात पहिली ओळ यशोदेची आणि दुसरी ओळ श्रीकृष्णाची आहे. बाळकृष्णाला अजून तोल सावरता येत नाही, डगमगतच तो जमिनीवर पाऊलं टाकत आहे. गाण्यातला तोल हा तालात असतो! म्हणूनच दुसऱ्या ओळीतली काही स्वरवाक्यं ठोक्यावर आणि काही ठोका सोडून अशी आली आहेत ज्यातून तोल सावरण्याचा (काहीसा निष्फळ) प्रयत्न दिसून येईल. याच दुसऱ्या ओळीत रचनेत इतर कुठेही येत नसलेला कोमल गंधार येतो ज्यामुळे ‘आत्ता तोल जाईल की काय…’ अशी संभ्रमावस्था निर्माण होते.

हे सगळं असूनही संपूर्ण रचनेला एक वात्सल्याची आभा आहे. म्हणूनच बहुतांश रचना शुद्ध स्वरात असली तरी जिथे वातस्ल्याने उर भरून येतो तेव्हा कोमल निषादाचा स्पर्श या रचनेला होतो.

कबहुँक सुंदर बदन बिलोकति, उर आनँद भरि लेति बलैया |
कबहुँक कुल देवता मनावति, चिरजीवहु मेरौ कुँवर कन्हैया ||

बॅलेमध्ये सोनियाच्या उत्कृष्ट अशा नृत्यदिग्दर्शनाला न्याय दिला तो संपदा जोगळेकर-कुलकर्णी हिने. संपदाचा बोलका चेहरा म्हणजे साक्षात वात्सल्य! माझ्या यूट्यूब वाहिनीवर मी या गाण्यावरच्या तिच्या नृत्याचाही व्हिडिओ अपलोड केला आहे तो जरूर पहा.

मी काही आस्तिक नाही; पण सूरदास होता आणि जो हरी ब्रह्मांड चालवतो त्याला चालायला यशोदा शिकवते ही अनुभूती तो मला देतो. ही गोष्ट मला आस्तिकतेबद्दल, भक्तीबद्दल, श्रद्धेबद्दल एक दृष्टांत देऊन जाते हे मात्र नक्की!

© कौशल इनामदार, २०२०.

Watch the episode of Chhand Othatale on YouTube

What do you think?