महाभारताचं युद्ध संपलंय आणि हस्तिनापूरवर पांडवांचं राज्य आहे. धृतराष्ट्र आणि गांधारी पुत्रशोकात आहेत. इथे आपलं आता काहीच उरलं नाही या भावनेने ते वानप्रस्थान करण्याचा निर्णय घेतात. आपल्या सर्व कर्तव्यांतून मोकळी झालेली कुंती आणि काही पाश मागे न उरलेला विदुरही त्यांच्याबरोबर अरण्यात जायचं ठरवतात. खरं तर इथे महाभारताची गोष्ट संपलेली आहे. रत्नाकर मतकरींचं ‘आरण्यक’ हे नाटक मात्र इथे सुरू होतं. वस्तीपासून दूर, अरण्यात ही सगळी पात्र आपल्या मनाच्या निबिड अरण्यात शिरून आपण कुठे वाट चुकलो, कुठली श्वापदं आपल्या अंतरात आहेत याचा ठाव घेऊ लागतात आणि प्रेक्षकही त्यांच्यासह या अरण्यात घुसतात.
या नाटकाचं संगीत करण्याची संधी जेव्हा रत्नाकर मतकरींनी मला देऊ केली, तेव्हा आनंदाबरोबर जरा भीतीही माझ्या मनात उद्भवली. एक तर रत्नाकर मतकरींसारख्या ज्येष्ठ, प्रतिभावान नाटककार दिग्दर्शकाबरोबर काम करण्याचं मला टेन्शन आलं होतं आणि दुसरं कारण म्हणजे नाटकाचं पार्श्वसंगीत करणं हे मला आजही अत्यंत कठीण असा प्रकार वाटतो.
नाटकाचं पहिलं वाचन होताच माझ्या ध्यानात आलं की ही फक्त संगीत करायची संधी नसून पुन्हा एकदा संगीताबद्दलच्या आपल्या कल्पना तपासून पाहण्याची संधी आहे.
माणूस पहिल्यांदा पृथ्वीतलावर प्रकटला असेल तेव्हा सर्वत्र अरण्यंच असतील. या अरण्यातच नगरांच्या; खरं तर कुठल्याही संस्कृतीच्या, सभ्यतेच्या आधी त्याला शोध लागला असेल तो ध्वनीचा आणि त्या बरोबरीनेच संगीताचा. राइस विद्यापीठ आणि मेरीलॅन्ड विश्वविद्यालयाच्या संशोधकांनी आता असा सिद्धांत मांडलाय की आधी संगीताचा शोध लागला आणि नंतर भाषेचा. संगीतज्ज्ञ ॲन्थनी ब्रांट यांनी असं म्हटलंय की उच्चारलेला शब्द हाही एक प्रकारचं संगीतच आहे!
संगीत हा संस्कृतीचा पायाही आहे आणि कळसही!
ब्रांट म्हणाल्याप्रमाणे शब्दाचं आपलं असं एक संगीत आहे. ध्वनी हा शब्दातला एक अर्थवाही घटक आहे. आपल्या नकळतही आपण अर्थाचा शब्दामध्ये, शब्दाचा नादामध्ये, नादाचा संगीतामध्ये आणि संगीताचा पुन्हा अर्थामध्ये अनुवाद करत असतो.
आता ‘राधा’ हा शब्द पहा. मला ‘राधा’ हे नाव अनेक कारणांसाठी आवडतं. त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे या शब्दाचा ध्वनी आणि त्या ध्वनीतून उमटणारा नाद आहे. उत्तर भारतीय संगीतामधल्या तालपद्धतीचं एक वैशिष्ट्य म्हणजे ‘खाली-भरी’, अर्थात तालाच्या आवर्तनाचे दोन भाग होतात. ‘भरी’ जिथे मात्रेवर आघात असतो आणि ‘खाली’ जिथे तो आघात नसतो. उदाहरणार्थ हे प्रतीत करणारे शब्दच पहा – ‘भरी’ या शब्दाच्या पहिल्या अक्षरातच आघात आहे. ‘खाली’ या शब्दात तो आघात नाही. ‘भरी’ काय असेल आणि ‘खाली’ काय असेल हे आपल्याला त्या शब्दांतला ध्वनीच सुचवतो. पुन्हा ‘राधा’ शब्द पहा. ‘रा’ अक्षरावर आघात नाही आणि ‘धा’ अक्षरावर आघात आहे. एका अर्थाने एका आवर्तनाचा अर्क म्हणजे ‘राधा’. कृष्णाचं संपूर्ण आवर्तन म्हणजे ‘राधा’!
मराठी भाषेत असे अनेक शब्द आहेत जे त्या त्या क्रियेच्या ध्वनीतून निर्माण झाले आहेत. उदाहरणार्थ, ‘रिपरिप’, ‘टपटप’, ‘खळखळ’, इत्यादी. तात्पर्य असं की भाषा, ध्वनी, अर्थ, संगीत आणि नाद यांचं अतूट असं नातं आहे. ध्वनिमुद्रणात जसं अॅनलॉग सिग्नलचं रूपांतर डिजिटल सिग्नलमध्ये होतं तसंच संगीतकार अर्थाचं रूपांतर संगीतामध्ये करतो आणि नंतर हे संगीत ऐकताना श्रोता या संगीताचं रूपांतर पुन्हा अर्थामध्ये करतो.
संज्ञापन (Communication) परिणामकारक व्हायचं असेल तर त्या संवादातल्या दोन्ही घटकांना उमटलेल्या ध्वनीच्या नादातून साधारण एकच अर्थ प्रतीत व्हायला हवा. संगीत, काव्य यांच्यामध्ये या उमटणाऱ्या अर्थामध्ये थोडीफार संदिग्धता राहते आणि म्हणूनच कलाकार आणि श्रोता यांच्यामधल्या संवादाला एका खेळाचं स्वरूप प्राप्त होतं. पण हे स्वरूप प्राप्त व्हायचं असलं तरी कलाकार आणि श्रोता एका प्रतलावर असायला हवेत!
उदाहरणार्थ, कवी मराठीत कविता ऐकवतोय आणि समोरच्या श्रोत्याला केवळ रशियन भाषा येत असेल तर हा संवाद परिणामकारक होणार नाही. तरीही ऐकणारा शब्दांच्या ध्वनीतून आपल्याला काही बोध होतोय का हे जोखत राहतो.
विख्यात इंग्रजी कवी एच्. डब्ल्यू. लाँगफेलो याने “संगीत ही वैश्विक भाषा आहे” असं म्हटलं आहे. तरी प्रत्येक संगीतप्रकाराला एक स्वतंत्र संस्कृती चिकटली असते आणि त्यातूनच या सुरांचे काही संकेत तयार होतात. याच संकेतांमुळे कुठल्या प्रसंगात कुठलं वाद्य वापरावं हे संगीतकारांना ठरवता येतं. चित्रपटात क्लबमधलं गाणं असेल तर सहसा संगीतकार त्या गाण्यात सतार आणि सारंगी वापरणार नाहीत; तर सॅक्सोफोन आणि ट्रम्पेट वापरतील, पखवाज अथवा मृदंग न वापरता ड्रमसेट वापरतील. चर्चमधल्या लग्नासाठी ऑर्गन आणि देवळातल्या लग्नासाठी सनई वाजवतील.
नाटकात, चित्रपटात, मालिकांमध्ये हे संकेत वापरून संगीत केलं जातं. क्वचित हे संकेत मोडले जरी, तरी त्याला या संकेतांचा संदर्भ असतोच! (उदाहरणार्थ, चर्चमधल्या लग्नात अचानक सनई वाजली तर त्यातून विनोदनिर्मिती होते कारण चर्चमध्ये ऑर्गन असतो हे आपल्याला ठाऊक असतं.)
‘आरण्यक’ नाटकाचं संगीत करताना हे सगळे विचार माझ्या मनात विहार करत होते. नाटकाची शैली ही जुन्या संस्कृत नाटकांसारखी होती. सगळे संवाद मुक्तछंदात होते. नाटकाची सुरुवात पारंपरिक रंगपूजेने आणि नांदीने होते. पहिल्या अंकात हस्तिनापुरात सुरू होणारं नाटक, हे दुसऱ्या अंकात अरण्यात जाऊन संपतं.
काळ स्थापन व्हावा म्हणून मी बहुतांश वीणा, सतार, बासरी, सारंगी, सरोद, अशी ध्वनिक वाद्य (acoustic instruments) वापरली. युधिष्ठिर राजाच्या धर्माच्या राज्यात नाटकाची सुरुवात होत असली तरी संपूर्ण नाटकभर महाभारताच्या युद्धाचं आणि त्यामध्ये झालेल्या प्रचंड नरसंहाराचं सावट आहे हे ध्यानात ठेवून नाटकाची थीम तयार केली.
नाटकात घटनांपेक्षाही संवादाला जास्त महत्त्व होतं कारण एका अर्थाने हे नाटक आत्मशोधाशी निगडित होतं. मग असं ठरवलं की प्रत्येक पात्रासाठी एक मुद्राधुन (signature tune) बनवावी. पण नुसतीच मुद्राधुन न बनवता त्या धुनेतून पात्रांचं व्यक्तिमत्त्व दिसायला हवं. जे संवादात सांगितलेलं नसेल पण संहितेत अभिप्रेत आहे अशा गोष्टी संगीताद्वारे सांगितल्या जाऊ शकतात.
‘आरण्यक’ मधली पात्रं मी पुन्हा एकदा डोळ्यासमोर आणली.
युधिष्ठिर – पृथ्वीवर धर्माचं राज्य स्थापन केलेला सम्राट. जगभरातलं ऐश्वर्य त्याच्या पायाशी लोळण घेतंय. भारदस्तपणा, ऐश्वर्य, शक्ती, वैभव असं दाखवणारं कुठलं वाद्य युधिष्ठिराचं प्रतिनिधित्व करू शकतं? मी इथे वीणेचा विचार केला. वीणेचा आवाज भारदस्त आहे. तिला सतारीची जोड दिली तर आवाज वरच्या आणि खालच्या अशा दोन्ही वारंवारितेत (frequency) ऐकू येतो. म्हणून युधिष्ठिरासाठी ‘वीणा’ वापरली.
धृतराष्ट्र – हरलेला राजा. त्याचं सगळं वैभव संपलंय. फक्त वैभव गेलंय इतकंच नाही तर या सगळ्यात निःपुत्रिक झाल्याचं दुःखही आहे. वीणेतून भारदस्तपणा काढून घेतला तर कुठलं वाद्य मिळेल? इथे सरोदचा विचार केला. सरोदमध्ये वीणेची खालची वारंवारिता मिळत नाही त्यामुळे कारुण्य, दुःख हे सहजपणे त्यातून उमटतं.
गांधारी – महाभारतातलं हे असं पात्र आहे की ज्याला कधीही समाधान मिळालं नाही. केवळ दुःखच जिच्या वाट्याला आलं त्या गांधारीसाठी सारंगीपेक्षा चपखल बसणारं वाद्य कुठलं असू शकतं? तारेवर गज फिरताना सारंगीतून जे करूण सूर निघतात ते गांधारीचंच प्रतिनिधित्व करीत होते!
कुंती – गांधारीच्या बरोबर उलट असं कुंतीचं पात्र आहे. तरुण वयातच वनवास भोगलेली, पतीच्या मृत्यूनंतर लहान पोरांचा सांभाळ केलेली, कुणाचाही आधार नसलेली कुंती स्वतः मात्र कायम खंबीर आणि समाधानी असते. स्वतः राजमाता होऊनही दीर आणि जावेबरोबर पुन्हा वानप्रस्थाश्रम करायला तयार झालेली कुंती कधीही आपल्या कपाळावर आठी येऊ देत नाही. कुंतीसाठी मी सतार वापरायची ठरवली.
विदुर – विदुराचं शहाणपण, त्याची बुद्धिनिष्ठता, हे सर्व त्याच्या कृष्णभक्तीतून उद्भवतं. म्हणूनच विदुराची मुद्राधून बासरीने वाजवली.
सर्व पात्रांच्या या धुना ठरल्यानंतर पार्श्वसंगीतामध्ये युधिष्ठिराचा प्रवेश असेल तर वीणा वाजते. गांधारी आणि धृतराष्ट्राच्या प्रवेशाला सारंगी आणि सरोद वाजतात. विदुर आणि कुंतीच्या प्रवेशाला बासरी आणि सतार वाजते. कुंती सोडून प्रत्येक धुनेत एक समान धागा जोडला तो सिंथेटिक पॅड – म्हणजे तंबोऱ्याच्या ड्रोनसदृश पण सिंथेसाइझरवर वाजणारा एक घोषस्वर. हा अगदी कमी आवाजात त्या धुनेत मिसळला. प्रत्येक पात्रावर भूतकाळाचं ओझं आहे असं ध्वनित करण्याचा यात हेतू होता.
हे सर्व घडत असताना प्रेक्षकांच्या ते लक्षात येतंच असं नाही; पण मनात खोल कुठेतरी त्या त्या वाद्याचं आणि पात्राचं साहचर्य (association) जडत जातं. ‘शोले’ चित्रपटात अमिताभ बच्चन आणि जया भादुड़ीचे प्रसंग आठवा. कुठल्या वाद्याची धून आपल्या कानांत वाजते? नुसता डोळ्यासमोर तो प्रसंग उभा राहिला तरी माउथ ऑर्गन किंवा हार्मनिकाचे सूर आपल्या मनात रुंजी घालू लागतात!
याशिवाय विशिष्ट प्रसंगांसाठी काही विशिष्ट संगीताचे तुकडे केले; पण कुठेही मूळ संहितेचा गाभा ढळू न देता! संगीतसुद्धा नाटकाच्या पात्रासारखंच असतं. सुरुवातीला नाटककार ठरवतो की पात्राने काय बोलावं, कसं वागावं; पण नंतर मात्र ते पात्रंच त्याचं प्राक्तन ठरवत जातं. त्यात नाटककारालाही ढवळाढवळ करता येत नाही! तसंच संगीताचा गाभा काय असेल हे एकदा ठरलं की सगळं संगीत त्या चौकटीतच करणं भाग असतं. सर्जनाला चौकट असेल तरच ते सर्जन; नाही तर नुसताच कलात्मक स्वैराचार!
नगरं वसली, वस्त्या झाल्या. माणूस अरण्यातून बाहेर पडला. पण माणसाचं मन मात्र एका अरण्यासारखं निबिडच राहिलं. कुठलीही कला या अरण्यात शिरून त्याचा ठाव घेण्याची एक मशालच आहे. मग वेद व्यासांपासून मतकरींपर्यंत कुणी तो वेध कथेतून घेतात आणि माझ्यासारखे संगीतकार – संगीतातून!
© कौशल इनामदार, 2021
2 Comments
खूपच सुरेख माहिती… संगीत देताना किती बारकाईने विचार केलाय तुम्ही, कमाल… खूप आवडला व्हिडिओ..
धन्यवाद केतकी! तुम्ही दर वेळी उत्तम दाद देता त्यामुळे माझाही उत्साह वाढतो. असाच लोभ असू द्या!