छंद ओठांतले – चिरंतनाची क्षणभंगुरता

Chhand Othatale
छंद ओठांतले

तुमच्या बाबतीत असं कधी झालंय? की एखादी गाण्याची ओळ, एखाद्या व्यक्तीचं किंवा स्थळाचं नाव, आजचा वार, काल जेवणात कुठला पदार्थ खाल्ला, घराची किल्ली नेमकी कुठे ठेवली – यापैकी कुठला तरी तपशील जाम आठवत नाही… आपण मेंदूला बराच ताण देतो, डोकं खाजवतो, आठवायचा आटोकाट प्रयत्न करतो आणि तरीही आठवणीच्या कुठल्याही खणातून एकही फाइल बाहेर पडत नाही. आपण अस्वस्थ होतो आणि हताश होऊन आठवायचं सोडून देतो. आपण काही आठवायचा प्रयत्न करत होतो हे देखिल आपण विसरून जातो तेव्हा अचानक लख्ख वीज चमकावी तशी आपल्याला ती गोष्ट आठवते!

संगीत देताना हा अनुभव अनेकदा येतो. एखाद्या गाण्याची चाल करण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू असतो. बराच वेळ जातो तरी काही सुचत नाही आणि एका क्षणी प्रयत्न सोडून दिल्यावर ती चाल अचानक आकार घेऊ लागते.

       हा असा अनुभव असंख्य वेळा आल्यावर चाल करण्याचं माझं एक तंत्र तयार झालंय. चाल सुचत नसेल किंवा ती सुचायला वेळ लागत असेल तर मी एक नॉन कमर्शियल ब्रेक घेतो. रात्र झाली असेल तर सरळ गाडी काढतो आणि मुंबईच्या रस्त्यांवर फिरत राहतो. शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत अगदी संथ गतीने तास दोन तास फिरून येतो. आपण संगीतकार आहोत आणि आपल्याला आता चाल सुचायलाच हवी आहे अशा जबाबदारीतून स्वतःचीच सुटका करून घेतो आणि जेव्हा या तणावातून हलकं वाटायला लागतं नेमक्या त्याच क्षणाला एक चाल आपसूक मनात तरंगत येते.

परंतु ही कथा अशा एका गाण्याची आहे ज्याची चाल मला तब्बल सहा- सात महिने हुलकावणी देत राहिली.

‘बालगंधर्व’ चित्रपटाचं प्रदर्शन झालं आणि सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी पुढच्या चित्रपटाचा घाट घातला. हा चित्रपट असणार होता कविवर्य ना. धों. महानोर यांच्या ‘अजिंठा’ या दीर्घ कवितेवर आधारित.

‘अजिंठा’ ही एक अनोखी प्रेमकहाणी आहे.

रॉबर्ट गिल हा ईस्ट इंडिया कंपनीचा शिलेदार होता. तो एक निष्णात चित्रकारही होता. अजिंठाच्या लेण्यातील चित्रांच्या प्रतिकृती करण्याच्या कामावर रॉयल एशिॲटिक सोसायटीने त्याची नियुक्ती केली होती. अजिंठाला आल्यावर त्याच्या सेवेसाठी जे स्थानिक लोक रुजू झाले त्यात एक मुलगी होती – पारू. गिलला पारूची भाषा कळायची नाही, न पारूला गिलची! पण त्यांच्यात प्रीती फुलली आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले.

यात गंमत म्हणजे गिलच्या अस्तित्वाचे, त्याच्या कामाचे अनेक पुरावे आहेत. त्याचे वंशज अजूनही इंग्लंडमध्ये स्थायिक आहेत. मात्र पारूच्या अस्तित्वाची एकमेव खूण म्हणजे तिच्या मृत्यूनंतर गिलने बांधलेलं तिचं स्मारक ज्यावर लिहिलं आहे – To the memory of my beloved Paro who died on 23rd May 1856. – Major Robert Gill.

२०११ सालाच्या जुलै महिन्याचे दिवस होते. मी नागपूरला एका कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे असतानाच मला नितीन दादांचा फोन आला –

“आपण उद्या पळसखेडला महानोरांना भेटायला जातोय आणि नंतर पुढे त्यांच्याबरोबर अजिंठा लेणी पहायला जाणार आहोत. तू असशील तिथून ये.”

मी नागपूरहून थेट पळसखेडला पोहोचलो. पळसखेडला रात्री जेवणानंतर चित्रपटात कुठल्या कविता घ्यायच्या आणि त्यांची गाणी करायची यावर विस्तृत चर्चा झाली. महानोरांनी काही कविता मला सुपूर्द केल्या. मी त्या नजरेखालून घातल्या. चित्रपटाची तयारी आत्ताच सुरू झाली असल्यामुळे गाणी करण्याची घाई नव्हती तरीही वाचता वाचता काही सुचतंय का असं मी पाहत होतो. शिवाय चाल कधीही सुचू शकते; पण त्यासाठी शब्द आपल्या ओठांवर हवेत. चाल देण्याआधी शब्द आत्मसात करण्याची मी सवय लावून घेतली आहे.

दुसऱ्या दिवशी आम्ही अजिंठाला आलो. आमचं भाग्य असं की स्वतः ना. धों. महानोर आमचे ‘गाइड’ बनून आम्हाला या लेण्यांचं दर्शन घडवत होते. रॉबर्ट गिल आणि पारोची प्रेमकथा ज्या गुंफांमधून घडली, ज्या मातीत फुलली – प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन अनुभवता आली.

‘अजिंठा’च्या इतर गाण्यांबद्दल मी पुढच्या भागांमध्ये तपशीलवार लिहेनच. केवळ इतकंच सांगतो की ‘अजिंठा’मधल्या दहापैकी सहा गाण्यांच्या रचना एका दिवसात अजिंठा आणि पळसखेडच्या परिसरातच जन्माला आल्या. पण त्यातली एक कविता सर्वात जास्त आवडूनही तिला चाल लावताना प्राण कंठाशी आले. ही कविता होती –

छंद ओठातले
गीत गाती नवे
गारवा ह्या नव्या पालवीला…
हात हातातले
सोडवेना सये
गच्च आकाश भेटे भुईला…

‘छंद ओठातले’ हे चित्रपटातलं असं एकमेव गीत होतं जे केवळ पारू आणि गिल या दोघांवर चित्रित होणार होतं. बाकीच्या गाण्यांमध्ये इतर पात्रं तरी होती, नाही तर यांच्यापैकी एकावरच ती चित्रित होणार होती. त्यामुळे या गाण्याचं महत्त्व चित्रपटाच्या दृष्टीने अनन्यसाधारण होतं.

कवितेला चाल लागणं ही प्रक्रिया आवडणार्‍या मुलीशी ओळख करून घेण्यासारखीच असते. तोच रोमांच, तीच हुरहुर, तीच उत्कटता. ओळख करून घेताना असणारा तसाच नात्यातला नवखेपणा आणि ओळख पूर्णपणे पटल्यावर झालेली तीच जवळीक. गाणं आणि संगीतकार यांच्यात असंच प्रियकर – प्रेयसीचं नातं असतं!

‘छंद ओठातले’ या गीताच्या बाबतीत मात्र – आपल्याला एखादी मुलगी आवडते पण आपला बोलण्याचा धीर होत नाही; तिने आपल्याकडे पाहावं; तिने पाहिलं तर आपण हसू; मग ओळखही वाढवता येईल – असं नुसतंच वाटत राहतं पण घडत काहीच नाही! ती आपल्याकडे साधा कटाक्षही टाकत नाही!

ग़ालिब म्हणतो तसं –

हमने माना कि तगाफ़ुल न करोगे लेकिन
ख़ाक हो जाएँगे हम तुमको ख़बर होने तक!

कविता प्रेयसी इतकी कठोर नसते पण या कवितेने मात्र मला चांगलंच हवालदिल करून सोडलं. पळसखेडहून मुंबईला परत आलो आणि ‘अजिंठा’च्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रणावर काम जोरात सुरू झालं. इतर गाण्यांचं ध्वनिमुद्रण सुरू होत असताना एकीकडे मी ‘छंद ओठातले’वर अधूनमधून नजर टाकीत असे; पण चाल काही सुचत नव्हती.

हळूहळू इतर सगळ्या गाण्यांच्या रचना पूर्ण झाल्या, त्यांचं ध्वनिमुद्रणही सुरू झालं तरी हे गीत काही होईना. अनेक तर्‍हांनी या गीताचे शब्द गुणगुणून पाहिले मात्र चालीचं आणि शब्दांचं सूत काही जमेना. या सगळ्या गडबडीत सहा महिने उलटले होते. चित्रपटाचं चित्रिकरण सुरू झालं होतं. गाण्याची रचना आता व्हायलाच हवी होती.

अख्खा दिवस या गीताची रचना करण्याचा विफल प्रयत्न करून रात्री घरी परतलो. जेवण करून पुन्हा पेटी काढून बसलो. दिवसाच्या कोलाहलात अनेकदा जे सुचत नाही ते रात्रीच्या नीरव शांततेत सुचतं या विचाराने पुन्हा एकदा शब्द गुणगुणू लागलो.

या गीताच्या रचनेविषयी माझ्या मनात अनेक संभ्रम होते. पण जो मुख्य पेच होता तो असा – या प्रेमगीताची रचना ही समकालीन ठेवायची का त्याला काळाचा निकष लावायचा. हे प्रेमगीत गिल आणि पारूच्या अगदी खाजगी क्षणांचं वर्णन होतं. या क्षणांना काळाचं कोंदण दिलं तर प्रेमाचा चिरंतन भाव रचनेत उतरेल? आणि काळाचा संदर्भ न देता ह्या गाण्याचं संगीत केलं तर चित्रपटाच्या अनुभवात बाधा तर येणार नाही?

छे! असंख्य विचार मनात दाटून येत होते पण चाल एकही नाही! शेवटी विचारांच्या कोलाहलातून बाहेर पडण्याकरिता मी एक चित्रपट पहायचं ठरवलं. क्लिंट ईस्टवुडचा ‘ब्रिजेस ऑफ मॅडिसन काउंटी’ हा चित्रपट पाहत बसलो. चित्रपटाचं कथानक इतकं चित्तवेधक होतं की मी दोन तास त्यात गुंतून गेलो. चित्रपटात रॉबर्ट किन्‍केड आणि फ्रान्सेस्का जॉन्सन यांच्या चार दिवसांच्या नात्यामध्ये रममाण होताना – गाण्याला चाल लावायची आहे, उद्या ध्वनिमुद्रण आहे, आपल्याला झोपेचीही गरज आहे अशा सर्व भौतिक प्रश्नांचा मला पार विसर पडला.

चित्रपटाचा शेवट आला तेव्हा पहाटेचे चार वाजले होते. शेवटची श्रेयनामावली सुरू झाली आणि त्यामागे एक सुंदर सिंफनिक धुन! मन आभाळासारखं भरून आलं होतं. वाटलं की रॉबर्ट गिल असो वा रॉबर्ट किन्‍केड असो त्यांच्या प्रेमात काय अंतर? वाजणाऱ्या सिंफनीबरोबर मी आपसूक गुणगुणायला लागलो – छंद ओठातले! जसजसा गुणगुणत गेलो तसतसं आभाळागत भरून आलेलं मन मोकळं होत गेलं आणि लख्ख प्रकाश पडला! जे गीत सहा महिने माझ्याकडे साधं कटाक्षही टाकत नव्हतं त्या गाण्याशी आता माझं लव्ह अफेअर सुरू झालं होतं!

खरं तर चित्रपटाच्या शेवटी येणाऱ्या धुनेशी या गाण्याचं काहीही साधर्म्य नव्हतं तरी त्या धुनेच्या हार्मनीमध्ये माझी चाल सहज मिसळली होती. माझे सगळे प्रश्न एका झटक्यात सुटले.

या क्षणभंगुर आयुष्यात प्रेम हीच एक अशी भावना आहे की जी चिरंतन आहे. प्रेमाचा एकच क्षण जो अमर्त्य आहे परंतु त्याचा वास हा मर्त्य शरीरात आहे. कुठल्याही प्रेमकथेत आपल्याला हळवी करणारी गोष्ट कोणती? तर या चिरंतनाला क्षणभंगुरतेचा शाप आहे. मग रोमिओ-ज्युलिएट असो, लैला मजनू असो, वासू – सपना असो, किन्केड – फ्रॅन्चेस्का असो की गिल आणि पारू असो. विरोधाभास असा की ‘प्रेमाचा एक क्षण चिरंतन आहे’ हा साक्षात्कार ज्या क्षणी होतो त्याच्याच पुढच्या क्षणी ‘आयुष्य क्षणिक आहे’ हाही साक्षात्कार होतो! म्हणूनच कदाचित जगातल्या सगळ्या  थोर प्रेमकथा या शोकांतिका आहेत.

प्रेमाच्या उत्कट क्षणी मन शिथिल होतं, जग स्लो मोशनमध्ये जातं. वैभव जोशीचा एक शेर आहे –

मनाचा असा वेग मंदावला तर कसे व्हायचे?
जगाचे पुन्हा भान आले मला तर कसे व्हायचे!

हा मंदावलेला वेग मला गाण्यात दाखवायचा असेल तर त्याला बाहेरच्या जगाचा संदर्भ द्यावा लागणार होता. म्हणून गाणं ‘छंद ओठातले’ या ओळीपासून न करता ‘अजिंठा’ या दीर्घकाव्यातलाच एक छंद गाणं सुरू होण्याआधी वापरला –

लाल होरी आई रे लालेरा खेत मां
छुनछुन पायलिया बाजे रे पैर मां

या दोन ओळीत लय जलद ठेवली आणि छंद ओठातले सुरू व्हायच्या आधी संपूर्ण गाण्याची लय अर्ध्याने कमी केली! गाणं स्लो मोशनमध्ये नेलं. तसंच ‘लाल होरी’ या ओळींमध्ये त्या काळाशी सुसंगत अशी वाद्यं वापरली आणि ‘छंद ओठातले’मध्ये शिरताना चिरंतनपणा दर्शवण्याकरिता आधुनिक वाद्यांचाही समावेश केला. थोडक्यात, काळाचं परिमाण या समीकरणातून बाद केलं. भावेश भट्ट या माझ्या संगीत संयोजक मित्राने गाण्याच्या वाद्यमेळातून एक स्वप्नवत वातावरण निर्माण केलं. पहिल्या भागातून मुख्य गाण्यात शिरताना दृश्य वाइड अँगल शॉट पासून क्लोजअप पर्यंत गेलंय असा भास होतो तो या वाद्यमेळामुळेच.

हे गाणं सुरेश वाडकर आणि माझी जिवलग मैत्रीण हम्सिका यांनी गायलं आहे. सुरेशजींचा मृदु तरीही भारदस्त आवाज या गाण्याला लाभला हे मी माझं भाग्य समजतो. त्यांच्या सुरेल, लयदार गायकीमुळे ते गाणं तालावर तरंगत आहे असा भास निर्माण होतो आणि मनाचा मंदावलेला वेग श्रोत्याला कळतो.

चित्रपटात जशी हिरो किंवा हिरोईनची एन्ट्री असते तशी ‘एन्ट्री’ मला या गाण्यात हम्सिकाला द्यायची होती. आधीच स्वप्नवत असलेल्या वातावरणात अचानक फुलांचा दर्वळ यावा असा परिणाम मला त्यातून साधायचा होता. अनेक गाण्यांमधून वापरलेलं एक ओळखीचं परंतु अतिशय परिणामकारक तंत्र मी याकरता वापरलं. ‘सलाम-ए-इश्क़ मेरी जान’ या गाण्यात किशोर कुमारची, किंवा ‘क्या मौसम है’ या गाण्यात रफ़ीची जशी उशीरा आणि अनपेक्षित ‘एन्ट्री’ होते तसंच हम्सिकाला मी सुरेशजींचा एक पूर्ण अंतरा गाऊन झाल्यावर गाण्यात आणलं. तिच्या आवाजाने खरोखर ‘जैसे सेहरा में रात फूलों की’ची अनुभूती येते. 

या गाण्याबद्दल मी त्या चिरंतन क्षणासारखाच अव्याहत लिहू शकतो. तरी जसा त्याच क्षणाला क्षणभंगुरतेचा साक्षात्कार होतो तसाच मला अचानक शब्दमर्यादेचा साक्षात्कार झालेला आहे! पण गाणं हे प्रेमासारखंच चिरंतन असतं हा अधिक महत्त्वाचा साक्षात्कार हे क्षणभंगुर आयुष्य उजळून टाकणारा आहे!

© कौशल इनामदार, २०२१

What do you think?