महाविद्यालयात होतो तेव्हाची गोष्ट. तापाची साथ होती आणि त्या साथीत मीही सापडलो. पुढचे दोन दिवस अंथरुणाला खिळून राहणार हे माझ्या ध्यानात येताच या दोन दिवसांत एखादं पुस्तक वाचून होईल असा सकारात्मक विचार माझ्या मनात आला. आमच्या घरात कुठेही एखादं तरी पुस्तक हाताला लागतंच अशी स्थिती असते. जे पहिलं पुस्तक हाताला लागेल ते वाचूया, या विचाराने मी पलंगाच्या शेजारच्या खणात हात घातला. माझ्या हाताला जे पुस्तक लागलं ते होतं – ‘कुणा एकाची भ्रमणगाथा’ – लेखक – गो. नी. दांडेकर.
खरं तर माझं सगळं शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून झालं. महाविद्यालयात येईपर्यंत इंग्रजी सोडून माझं इतर वाचनही फार नव्हतं. क्षणभर वाटलं – एखादं इंग्रजी पुस्तक घेऊया का? पण पुस्तकाच्या कपाटापर्यंत जाण्याचेही त्राण अंगात नव्हते. तेव्हा, आळसाच्या प्रेरणेने, जे हातात आहे तेच वाचूया, असा विचार करून मी ते पुस्तक वाचायला घेतलं. आश्चर्य म्हणजे, तापाच्या ग्लानीत खऱ्या खोट्याच्या सीमारेषा पुसट झालेल्या असताना, मला नर्मदा परिक्रमेचा तो अनुभव आपणच जगत आहोत, इतका खरा भासला. पुस्तक वाचून झाल्यावर, मला एक छोटासा का होईना, पण साक्षात्कार झाला. तो असा की इंग्रजीत अथवा इतर युरिपिअन भाषांमध्ये कदाचित जगातलं सर्वोत्कृष्ट साहित्य असेलही पण माझ्याशी थेट नातं सांगणारं किंवा माझ्याबद्दल आणि माझ्या आजूबाजूच्या पर्यावरणाबद्दल बोलणारं साहित्य हे फक्त आणि फक्त मराठी भाषेतच आहे.
पुढे मी संगीतकार झालो आणि बरंचसं माझं काम मराठीतून केलं.
अनेक वर्षं, मराठीत काम करत असूनही मराठीचा म्हणून काही प्रश्न आहे याबद्दल मला कल्पनाही नव्हती पण जेव्हा मुंबईच्या एका खासगी रेडिओ वाहिनीत मला सांगण्यात आलं की आम्ही मराठी गाणी लावत नाही, कारण ती लावली तर आमच्या रेडिओ वाहिनीला एक ‘डाउनमार्केट फील’ येईल, तेव्हा झोपेतून व्हावं तसा मी खडबडून जागा झालो.
दिल्लीत बसलेल्या अधिकाऱ्याला आपली भाषा ‘डाउनमार्केट’ वाटते हा धोक्याचा इशारा नसून, आपल्यालाही ते वाटायला लागतं किंवा कुणाला तसं वाटलं तर त्याची बोच आपल्या मनाला जाणवत नाही, हा आहे! यावर सरकारने, राजकीय पक्षांनी, चळवळीतल्या लोकांनी काय करावं याबद्दल आपल्या सगळ्यांनाच मतं असतात. मला मात्र एका आत्मपीडाकारक प्रश्नाने ग्रासलं – माझ्या मातृभाषेकरता मी काय करतोय? मी काय करू शकतो? मी संगीतकार आहे – मी गाणं करू शकतो. आणि म्हणून मी ठरवलं की आपण जगातलं सगळ्यात भव्य गाणं मराठीत आणि मराठीबद्दल करायचं. सुरेश भटांचे ओजस्वी शब्द होते –
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
पुढचं सव्वा वर्ष, इतर कुठलंही व्यावसायिक काम न करता, मी फक्त हे एकच गाणं केलं.
हे सगळं सांगण्याचं कारण असं की नुकताच मराठी भाषा दिवस पार पडला. मराठी अभिमानगीताच्या लोकार्पणाला बरोबर दहा वर्षं झाली. हे गाणं का झालं याची कथा मी अनेकदा वेगवेगळ्या माध्यमातून सांगितली आहे, परंतु हे गाणं कसं झालं, त्या मागे काय सांगीतिक प्रक्रिया होती, याबद्दल मात्र फार बोललं गेलं नाही!
अगदी पहिली गोष्ट म्हणजे या गाण्याची चाल. वास्तविक, ह्या गीताचं वृत्त सहा मात्रांत बसणारं आहे. पण मी एक मात्रा वाढवून त्यात जरा जागा वाढवली. गाणं पहिल्यांदा लोकांसमोर आलं तेव्हा त्यावर झालेली एक टीका म्हणजे या गाण्याची चाल जरा संथ वाटते. त्यात जोष नाही. हे गाणं संथ वाटतं ते अगदी खरं आहे पण तो या गाण्यातला दोष नसून त्याचं बलस्थान आहे असं मला वाटतं. का ते सविस्तर सांगतो.
सुरेश भटांच्या मूळ कवितेचं नाव ‘मायबोली’ आहे. ‘अभिमानगीत’ हे नाव नंतर मला सुचलं. ह्या कवितेमध्ये भाषेबद्दलचा अभिमान ठासून भरलाच आहे. पण तो दुरभिमान नाही की पोकळ अभिमानही नाही. अभिमानाबरोबर आहे ती तृप्ती! म्हणून तर – “जाहलो खरेच धन्य” असं सुरेश भट म्हणतात. शिवाय अभिमानासोबत येतो आत्मविश्वास आणि आत्मविश्वासाबरोबर येतो तो धीर आणि शांतपणा. खरा अभिमान असेल तर मन शांत आणि संयत होतं. जसं आपण दुःखी आहोत हे सांगायला आपल्याला दर वेळी रडावंच लागतं असं नाही तसंच जोष दाखवण्याकरिता ओरडावंच लागतं असं नाही! हे गीत काही समरगीत नव्हे की गती वाढली किंवा पट्टी वाढली की जोष वाढेल! त्या एका वाढलेल्या मात्रेमुळे या गाण्यात धीर आणि आत्मविश्वास आला.
या कवितेचं एक वैशिष्ट्य आहे. बहुतेक कविता या विशेषणांच्या कविता असतात. उदा.- हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे. परंतु ही कविता क्रियापदांची कविता आहे. गाण्यात जोष आहे पण तो अप्रगट (latent) आहे. अंगावर येणारा जोष या कवितेत नाही. हे आंतरिक चैतन्य दाखवण्याकरता मी एक सोपा मार्ग अवलंबला. प्रत्येक बंधानंतर मी क्रियापदं एकत्र करून त्यांचा धृवपदाप्रमाणे वापर केला. “बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी!” गाणं संपवताना या कवितेतली बहुतेक क्रियापदं एकत्र करून ‘गर्जते मराठी’ या शब्दांवर गाण्याचा शेवट केला.
वास्तविक पाहता या गाण्याची सुरुवात संथ होत असली तरी या गाण्याच्या प्रत्येक टप्प्यानंतर थोडीशी लय मी वाढवली आहे. गाणं ज्या लयीत सुरू होतं त्यापेक्षा चढ्या लयीत ते संपतं. त्यामुळेसुद्धा या गाण्याला एक गतिशीलता (dynamic) प्राप्त होते.
गाण्याची ही लय ठेवण्याचं अजून एक महत्त्वाचं कारण आहे. आपल्याला रहमानची ‘वंदे मातरम्’ची चाल माहित आहे आणि गुरुदेव टागोरांचीही, जी आपण सर्रास सगळीकडे गातो. रहमानच्या चालीत जोष आणि गती आहे हे आपल्याला अमान्य करताच येणार नाही, पण लहान मुलांना तुम्ही कुठली चाल शिकवाल? ‘वंदे मातरम्’प्रमाणेच ‘लाभले अम्हास भाग्य’ हे गीतसुद्धा लहान मुलांनी गुण्गुणावं, गावं ही माझी तीव्र इच्छा होती.
गाण्याची पट्टी अशी निवडणं क्रमप्राप्त होतं की शास्त्रीय संगीत गाणाऱ्या गायिका, उदा. अश्विनी भिडे – देशपांडे, आरती अंकलीकर – टिकेकर, आशा खाडिलकर, ज्या खालच्या पट्टीत गातात, त्यांनाही गाता यायला हवं, भावसंगीत गाणाऱ्या स्वप्निल बांदोडकर, मिलिंद इंगळे, अवधूत गुप्ते यांनाही गाता यावं, आणि उंच पट्टीत गाणाऱ्या शंकर महादेवन किंवा लोकशाहीर विठ्ठल उमपांनाही सहजरित्या गाता यावं – नुसतं गाता यावं इतकंच नाही तर त्या एका ओळीत त्यांची गायक म्हणून वैशिष्ट्य दिसावी आणि गाणं अधिक खुलावं.
कुठली ओळ कुठल्या गायकाने गावी हा अजून एक यक्षप्रश्न होता. मी एकूण १२५-१३० गायकांची नावं काढली होती. माझ्या एकट्याच्या मतावर अवलंबून न राहता मी एक तक्ता तयार केला. एका बाजूला गाण्याच्या ओळी आणि त्या ओळींची पुनरावृत्ती आणि एका बाजूला गायकाचं नाव. या तक्त्याच्या प्रती मी कमलेश भडकमकर, मिथिलेश पाटणकर आणि मंदार गोगटे यांना भरायला दिल्या. एक तक्ता मी भरला आणि प्रत्येकाच्या पसंतीची तुलना करून पाहिली. मग प्रत्येक गायकासाठी दोन ओळी निश्चित केल्या. गरज पडली तर आपल्याकडे पर्याय हवा हा त्या मागचा हेतू होता.
गाण्याची पहिली ओळ कुणी गायची या बाबत माझे काही विचार होते. रवींद्र साठे हे माझ्या आवडत्या गायकांपैकी एक. त्यांचा मराठमोळा, भारदस्त आवाज हाच या गाण्याची सुरुवात असावी असा माझा निर्णय झाला. शिवाय रवींद्र साठे यांचा आवाज असा होता की त्यांचा आवाज ऐकला की आपल्याला मराठीच गाणी आठवतात!
काही ओळी अशा होत्या की त्या कुणी गाव्या हे त्या चालीने किंवा कवितेनेच ठरवून टाकलं होतं. उदा. खालच्या पट्टीतल्या गायिकांना मला खाली असलेल्याच ओळी द्याव्या लागणार होत्या. जशी गाण्याची लय हळूहळू वाढत जाते तसा गाण्याचा सूरही हळूहळू वाढत जातो आणि हा वाढता आलेख दाखवण्याकरिता गाण्याची सुरुवात एकल आवाजांनी होते. मग हळूहळू त्यात आवाज वाढत जातात आणि गाण्याचा शेवट ३५६ लोकांच्या भव्य समूहगानावर होतो.
या समूहगानाची एक छोटीशी गंमत आहे जी फारशी कुणाला माहिती नाही. गाण्याचं ध्वनि आरेखन विश्वदीप चॅटर्जी या सुविख्यात ध्वनियंत्याने केलं. समूहगानाचं मिश्रण सुरू होतं तेव्हा विश्वदीप म्हणाला की त्या समूहगानाला अपेक्षित असा खर्ज मिळत नाहीए. विश्वदीपच्या सांगण्यावरून आम्ही रवींद्र साठे यांना पुन्हा पाचारण केलं आणि समूहगानाचा संपूर्ण ऐवज त्यांच्याकडूनही गाऊन घेतला. संगीत जाणणाऱ्या रसिकांच्या लक्षात येईल की पांढरी ४ स्वरातला खर्ज म्हणजे किती खाली गावं लागत असेल. कदाचित भारतात इतका खर्ज स्वर लावणारे रवींद्र साठे हे एकमेव गायक असतील. आपल्या बाजूला इतके थोर कलावंत आहेत याची जाणीव होऊन मी कृत्कृत्य झालो!
काही ओळी कुणी गाव्या या कवितेनेच सुचवल्या. उदा. या कवितेत दोन ओळी लागोपाठ येतात –
आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
यातली पहिली ओळ गाण्याकरता एक पोक्तपणा, भारदस्तपणा आणि परिपक्वता अपेक्षित होती आणि दुसरी ओळ गाण्याकरिता एक उत्साह, ताजेपणा आणि निरागसता अपेक्षित होती. मग पहिल्या ओळीकरता साधारण चाळीशी पार केलेल्या गायिकांचा आवाज घेतला ज्यामध्ये वर्षा भावे, भाग्यश्री मुळे, संगीता चितळे, अनुजा वर्तक होत्या आणि लगेच पुढची ओळ गाण्यासाठी आनंदी जोशी, मधुरा कुंभार, अनघा ढोमसे आणि सायली ओक या तरुण, टवटवीत गायिका होत्या! तुम्ही नुसतं ऐकून पहा आणि तुम्हाला या दोन ओळींतल्या आवाजातला फरक ध्यानात येईल!
“येथल्या दरीदरीतून हिंडते मराठी” गाताना मावळ्यांचं रांगडेपण अपेक्षित होतं आणि “येथल्या कळीकळीत लाजते मराठी” म्हणताना एक निरागस आवाज अपेक्षित होता. म्हणूनच पहिली ओळ उमप बंधू, अशोक हांडे, अच्युत ठाकूर यांच्यासारख्या लोकगीताच्या मुशीतून आलेल्या गायकांनी म्हटली तर पुढची ओळ निहिरा जोशी या अतिशय गोड गळ्याच्या गायिकेने सादर केली.
कवितेच्या शेवटच्या कडव्यानंतर गाणं पुन्हा धृवपदावर येतं तिथे मी मुग्धा वैशंपायन आणि नंतर पाचही लिटल चॅंप्सचा आवाज वापरला. इतर सगळ्या गायकांना एकेक ओळ वाट्याला आली आहे पण मुलांनी मात्र तीन ओळी गायल्या आहेत. शेवटी मराठी भाषा टिकवायची आणि पुढे न्यायची जबाबदारी त्यांच्या चिमुकल्या खांद्यांवर होती.
खरं तर या गाण्यातल्या प्रत्येक आवाजाने आपली अशी मोहोर उमटवली आहे. हरिहरन, शंकर महादेवन यांनी छोट्याशा ओळीतही आपलं व्यक्तिमत्त्व दाखवलं. एक वेगळा लेख यातल्या प्रत्येक गायकाने या गाण्याला काय दिलं याबद्दल होईल. तोही कधीतरी लिहिनच.
साडेचारशेपेक्षाही जास्त गायकांनी गायलेल्या गाण्याचं खरं भाग्य मला हे वाटतं की त्यात इतके सारे श्वास मिसळले आहेत. या श्वासांनीच या गाण्याची आयु वाढवलेली आहे. आज दहा वर्षं या गाण्याला झाली तरी चिमुकली पोरं, त्यांचे आई वडिल आणि जगभर पसरलेली समस्त मराठी जनता या गाण्यात आपले सूर आणि श्वास मिसळतच आहे आणि या गीताचं आयुष्य वाढवत आहेत. मराठी भाषेसारखंच या गाण्याला स्वतःचं अस्तित्त्व प्राप्त झालंय. जेव्हा जेव्हा या गाण्याचे सूर माझ्या कानांवर पडतात मला वाटतं – एखाद्या सुरवंटाचं जसं फुलपाखरू होतं, तसं एखाद्या संगीतकाराला कुठलाही प्रश्न पडू दे, त्याचं गाणंच होतं!
©️ कौशल इनामदार