प्रभाकर जोग – संगीताच्या अंगणातलं तुळशी वृंदावन

Prabhakar Jog

प्रभाकर जोग

काही गोष्टी केवळ मराठी मुलुखातच घडू शकतात. तीन संगीतकार वेगवेगळ्या भूमिकेत येऊन एकत्र एक गाणं करतात हे इतर कुठे घडलं असेल असं माझ्या तरी ऐकिवात नाही. एक संगीतकार गाण्याची सुरावट रचतो. त्या संगीत रचनेचे सूर नोटेशनच्या रूपाने तो दुसऱ्या संगीतकाराला पोस्टकार्डावर लिहून धाडतो. दुसरा संगीतकार गीतकाराच्या भूमिकेत शिरून त्या पत्ररूपाने आलेल्या सुरावटीवर फार सुंदर शब्द लिहितो आणि मग ते गाणं एक तिसरा संगीतकार गायकाचा सदरा घालून गातो! प्रतिभेच्या या त्रिधारा एकत्र येऊन जो गीतरूपी प्रयाग झाला आहे ते सुप्रसिद्ध गीत आहे – ‘स्वर आले दुरूनी’!

दुरून पोस्टकार्डावरून आलेल्या नोटेशनवरूनच प्रेरणा घेऊन ते गीत लिहिणारे गीतकार म्हणजे संगीतकार पं. यशवंत देव, गायकाची भूमिका बजावणारे संगीतकार सुधीर फडके आणि अतिशय चित्तवेधक संगीतरचना करणारे संगीतकार म्हणजे सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक आणि संगीत संयोजक – प्रभाकर जोग!

काल ३० ऑक्टोबरला पं. यशवंत देवांचा तिसरा स्मृतिदिन होता आणि आज ३१ तारखेला प्रभाकर जोगांनी या जगाचा निरोप घ्यावा हा एक विलक्षण योगायोग म्हणावा लागेल. या गाण्यातला तिसरा आणि शेवटचा तारा आज निखळला आणि एका पर्वाचा अस्त झाला.

प्रभाकर जोग यांची कारकीर्द व्हायोलिनवादनापासून सुरू झाली. त्यांचं व्हायोलिन ‘गाणारं’ होतं हे आपल्याला माहित आहेच. तरी या ‘गाणार्‍या व्हायोलिन’ला एक पूर्वपिठिका आहे. पूर्वीच्या काळी चित्रपटगीतांच्या ध्वनिमुद्रणांमध्ये एक प्रथा होती. गायक अथवा गायिकेबरोबर गाण्याची धून ही व्हायोलिनवरही वाजवली जायची. या व्हायोलिनला ‘साँग व्हायोलिन’ म्हटलं जायचं. चित्रपटात वाद्यांचा भरणा जसजसा वाढत गेला तसतसा गायकाला त्या भरण्यामध्ये नेमका सूर मिळत नसे. व्हायोलिनचा आवाज मानवी आवाजाच्या जवळ जातो आणि मानवी आवाजात सहज मिसळूनही जातो. म्हणून गायकांबरोबर हे साँग व्हायोलिन वाजवलं जायचं आणि गायकाच्या गळ्यातल्या जागा हुबेहूब व्हायोलिनवादनातही उतरवल्या जायच्या. हे साँग व्हायोलिन वाजवणं अतिशय आव्हानात्मक काम असे कारण लता मंगेशकर, आशा भोसले, रफ़ी यांच्यासारख्या सुरेल गायकांना संगत करणं ही काही सोपी बाब नाही. प्रभाकर जोगांनी अशा शेकडो लोकप्रिय गाण्यांमध्ये हे साँग व्हायोलिन वाजवलं आहे. मदन मोहन यांचं ‘लग जा गले’ हे गीत तुम्ही कान देऊन ऐकलंत तर लताबाईंच्या सुरेल आवाजाबरोबर मंद आवाजात आपल्याला तितकंच सुरेल जे व्हायोलिन ऐकू येईल ते प्रभाकर जोगांचं आहे!

संगीतकार म्हणून प्रभाकर जोगांच्या स्वभावातला साधेपणा आणि सात्विकपणा त्यांच्या संगीतरचनांमधूनही आपल्याला दर्शन देत राहातो. ‘हे चांदणे फुलांनी’ असेल किंवा ‘उर्मिले, त्रिवार वंदन तुला’ असेल – जोगांच्या संगीतरचनांचा गोडवा हा अतिशय निर्मळ होता. अगदी दादा कोंडक्यांच्या चित्रपटाला – ‘आंधळा मारतो डोळा’- त्यांनी संगीत दिलं आणि त्यात ‘हिल पोरी हिला तुज्या कप्पालीला टिला’ सारखं आधुनिक बाजाचं गाणं असलं तरी त्यातही एक निरागसता आहे. ‘कोटी कोटी रूपे तुझी’ सारखं त्यांचं गाणं ऐकताना असं वाटतं की मराठी संगीताच्या अंगणातलं तुळशीवृंदावन म्हणजे प्रभाकर जोग यांचं संगीत. कधी कुठल्या लताबाईंच्या गाण्यातून दुरून येणारे सूर असोत किंवा रात्री कुणाच्यातरी घरी लागलेल्या रेडिओमधून लांबून ऐकू येत असलेलं ‘प्रिया आज माझी नसे साथ द्याया’ हे रितेपणाची जाणीव करून देणारं भावगीत असो – हे स्वर कितीही दुरून आले तरी संगीत रसिकांच्या हृदयाच्या अगदी जवळच प्रभाकर जोगांच्या संगीताचं स्थान राहील. गाणारं व्हायोलिन कधीही अबोल होणार नाही.

© कौशल इनामदार

Pic Courtesy – Darshana Jog’s Facebook Wall

What do you think?