‘चैत्रबन’ पुरस्कराच्या निमित्ताने

कोव्हिडने काळाच्या मधोमध पाचर मारली आणि काळाचे दोन तुकडे केले. कोव्हिडपूर्व काळ आणि कोव्हिडोत्तर काळ. एका अर्थाने या महामारीने आख्ख्या जगालाच फॅक्टरी रिसेट मारला. जग बदललं. 

एक अदृश्य, निर्गुण, निराकार विषाणू – पण इतकं आक्राळविक्राळ रूप धारण करेल याची कुणाला कल्पना होती? हा काळ सगळ्यांनाच जसा कठीण होता तसा तो कलाकारांसाठीही कठीण होता.  आपल्या अस्तित्वाचा नेमका अर्थ काय? त्याचा हेतु काय? आपल्या कलेचा नेमका उपयोग काय? आपण कुठे जात आहोत आणि आपली कला कुठे चाललीए? अशा प्रश्नांनी वेढलेल्या अनेक रात्री या काळात मी घालवल्या. पण एखाद्या तत्त्ववेत्त्यामध्ये आणि कलाकारामध्ये कदाचित हाच फरक असतो – तत्त्वज्ञाकडे प्रत्येक उत्तरासाठी एक प्रश्न असतो आणि कलाकाराला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कलेतच दडलेलं असतं. 

आणि म्हणूनच गदिमांच्या नावाने देण्यात येणाऱ्या ‘चैत्रबन’ पुरस्काराबद्दल मला खूप कृतज्ञता वाटते. स्वतःबद्दल, स्वतःच्या क्षमतेबद्दल संभ्रम निर्माण होण्याच्या काळाच्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार मिळणं याचं माझ्यालेखी खूप महत्त्व आहे. आपल्या कामाकडे कुणाचं तरी लक्ष आहे असा वत्सल आशीर्वाद आहे या पुरस्कारामध्ये. सगळे स्पर्धात्मक पुरस्कार एकीकडे आणि आपल्या आवडत्या कवींच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार एकीकडे! 

काही वर्षांपासून माझ्या मनात घोळत असलेल्या विचारला या काळात एक पुष्टी मिळाली. तो विचार असा की माझी कला ही काही करमणुकीपुरती सीमित गोष्ट नाही. मनोरंजनाच्याही पलीकडे जाऊन माणसांच्या मनाला स्पर्श करण्याची तिच्यात क्षमता आहे आणि त्यांच्या आयुष्याला दिशा देण्याची तिच्यात शक्ती आहे. 

पहिली घटना – ‘सकाळ’ या वर्तमानपत्रात वाचली होती. एका रिक्षाचालकाने त्याच्या रिक्षेत सापडलेली रोख पैशाची बॅग तशीच्या तशी मालकाला परत केली. त्याच्या प्रामाणिकपणाची प्रेरणा काय असं त्याला विचारलं तेव्हा तो म्हणाला – “रोज सकाळी घराबाहेर पडताना मी एक प्रार्थना ऐकतो – 

‘हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे’! 

हीच माझी प्रेरणा आहे!”

दुसरी घटना – पहिल्या लॉकडाउनच्या काळात माझ्या इन्बॉक्समध्ये एक संदेश आला जो वाचून माझ्या पायाखालची जमीन सरकली. त्यात लिहिलं होतं – “मी आज आत्महत्या करणार होतो. सगळी तयारी केली आणि स्वतःशी म्हटलं – एक गाणं ऐकून या जगाचा निरोप घेऊ. योगायोगाने जे गाणं लागलं ते तुझं गाणं होतं – परवरदिगार. गाणं संपलं आणि मी खूप रडलो. मी हे काय करायला निघालो होतो! अजून मला खूप काही करायचं होतं. आयुष्याचं ऋण चुकवायचं होतं. कौशल, त्या गाण्याने मी परत आलो.”

तिसरी घटना – एका मैत्रिणीने ऐकवलेली. वयस्क आई शेवटच्या घटका मोजत होती. आपल्या तरूण मुलीला ती म्हणाली – “तुझ्या मांडीवर मला डोकं ठेवून तुझ्याकडून ‘लाभले अम्हास भाग्य’ ऐकायचंय.”

गदिमांच्या गाण्यांनी हेच माझ्यासाठी केलं. 

होसी काय निराश असा तू?
होसी काय निराश
पायतळाशी अचला धरणी
अचल शिरी आकाश!

मार्ग नियोजित हेतू निर्मळ 
आडवील तुज किती वावटळ
धूलिकणांतून आरपार बघ
येतो सूर्यप्रकाश! 

वावटळ बाजूला करून लख्ख सूर्यप्रकाश गदिमांच्या अनेक ओळींनी अनेकदा दाखवला. करमणुकीच्या पलीकडे जाऊन त्यांच्या ओळी रक्तात भिनल्या. 

यंदाच्या ‘अक्षरधारा’ या दिवाळी अंकात मी एक लेख लिहिला आहे. त्याचं शीर्षक आहे – ‘निळे फुलपाखरू’. ते नाव सुचलं तेव्हा ते मलाच फार आवडलं. काय मस्त सुचलं आपल्याला असा थोडासा आत्मकौतुकपर विचारही मनात येऊन गेला. 

हा पुरस्कार मिळाला तेव्हा सत्काराला उत्तर द्यायला उभा राहिलो तेव्हा अचानक त्याची उकल झाली. हे माझं नव्हतं. ते गदिमांचंच पाखरू होतं जे माझ्याकडे उडत येईसतोवर त्याचं फुलपाखरू झालं होतं! 

आठवणींच्या आधी जाते तिथे मनाचे निळे पाखरू

खेड्यामधले घर कौलारू!

एक प्रतिभावंत कलाकार जातो तेव्हा तो केवळ रसिकांच्या स्मरणातच राहतो असं नाही तर त्याच्या कलेचा थोडासा अंश तो पुढच्या पिढीच्या कलाकारांमध्ये ठेवून जातो. रक्ताचं नातं नसतानाही असं ‘जेनेटिक’ प्रसारण होत राहतं हा चमत्कार नाही तर काय म्हणायचं! 

प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट होणार नाही कदाचित पण गदिमा या तेजाची आरती करण्यापुरती ज्योत आमच्यात पेटली तर आयुष्याचं सार्थक झालं असं म्हणायला काय हरकत आहे! 

ⓒ कौशल इनामदार

What do you think?